You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे : शाळेची फी भरण्यावरून बाऊन्सरकडून पालकांना मारहाण? नेमकं काय घडलं?
पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील क्लाइन मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शाळेची फी आणि इतर मागण्यांसंदर्भात निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना शाळेतील खासगी बाऊन्सरने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
याप्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रकरण काय?
बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळावी या संदर्भातील निवेदन घेऊन काही पालक 9 मार्चला शाळेत गेले होते. शाळेने ते निवेदन स्वीकारल्याची पोचपावती पालकांना दिली नाही.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही पालकांना भेटण्यास नकार दिला. यावेळी गेटवरील काही खाजगी बाऊन्सरनी पालकांवर दादागिरी केली असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
यासंबंधीचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये खाजगी बाऊन्सर पालकांशी अरेरावी करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाला आहे.
पालकांचं म्हणणं काय?
व्हायरल व्हीडिओतील एक पालक म्हणत आहे की, "गव्हर्नमेंटच्या जीआर प्रमाणे ट्युशन फी मध्ये 15 टक्क्यांची सवलत मिळावी हा लेखी अर्ज घेऊन आम्ही 9 तारखेला शाळेत गेलो होतो. शाळेने त्याच्यावर पोच म्हणून सही शिक्का द्यावा असं म्हंटल्यावर, अजिबात याची दखल घेतली गेली नाही.
"उलट प्रिन्सिपलने केबिनमध्ये बसून दोन बाऊन्सर पाठवले. एका लेडीज बाउन्सरने पुरुष पालकांना मारहाण केली. आणि आम्हाला सर्वांना तिथून हाकलण्यात आलं. बाऊन्सरला विचारलं असता त्यांनी वरून आम्हाला ऑर्डर आहे असं सांगत आम्हाला बाहेर काढलं. या शाळेत गेली दहा वर्ष माझा मुलगा शिकत आहे. अशा शाळेत आम्हाला जर ही वागणूक मिळत असेल तर हे मोठं लज्जास्पद कृत्य आहे."
शाळा प्रशासनाची बाजू
शाळेच्या प्राचार्य सुनंदा सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मिटिंग 9 तारखेला ठेवण्यात आली होती. त्याच दिवशी हे पालक हे जबरदस्तीने आत आले. हे दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांचे पालक होते. त्यांचं निवेदन त्यांनी फायनान्स विभागाला दिलं.
"निवेदन स्विकारल्याची पोच पावती सुद्दा त्यांना देण्यात आली होती. तरी ते मुख्याध्यापकांचीच स्वाक्षरी हवी आहे म्हणूनच अडून बसले. हे पालक तीन वर्षांपासून आम्हाला त्रास देत आहेत. हे जे पालक आले होते, त्यांनी तीन वर्षांपासून पैसे भरलेले नाहीत. तरी सुद्धा शाळेने मुलांना सर्व सुविधा दिल्या आहेत."
त्या पुढे म्हणाल्या, "15 टक्के फी अनुदानाबाबतचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तो निर्णय येईपर्यंत आम्ही ही काही करू शकत नाही. ज्या लेडी बाउंसरला मारहाण झाली शिवीगाळ झाली ती खरं तर सिक्युरिटी ऑफिसर आहे. हे पालक मोठ्या संख्येने शाळेत घुसतात म्हणून सिक्युरिटी गार्ड ठेवले आहेत.
"आम्हाला मुलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमच्या शाळेत महिला स्टाफ जास्त आहे म्हणून आम्ही जास्त सिक्युरिटी ठेवली आहे. 70 टक्के पालकांनी फी भरली नाही तर शाळा कशी चालणार?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)