You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरावती : बंदुकीचा धाक दाखवून भरकार्यक्रमातून प्रेयसीला पळवलं
प्रेयसीच्या नातेवाईकाच्या डोक्याला बंदूक लावून, हवेत गोळी झाडून, फिल्मी स्टाईल प्रियकराने प्रेयसीला पळवून नेल्याची घटना अमरावती शहरातील बालाजी प्लॉट येथे पुढे आली आहे.
याप्रकरणी दोन आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे.
नागपूर येथील तरुणी अमरावती शहरातील बालाजी प्लॉटमध्ये एका घरगुती कार्यक्रमासाठी मोठ्या बहिणीकडे आली होती. दरम्यान सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास चार तरुण कार्यक्रम स्थळी दाखल झाले. यात तरुणीच्या प्रियकराचाही समावेश होता.
यावेळी आरोपी प्रियकर गबरू खोटेनी तरुणी प्रेयसीला सोबत येण्यासाठी गळ घातली. मात्र नातेवाईकातील काही सदस्याने याला विरोध केला.
नातेवाईकांचा विरोध पाहून संतापलेल्या प्रियकराने खिशातून बंदूक काढून फिल्मी स्टाईल नातेवाईकांच्या डोक्याला लावून दहशत पसरवली. यावेळी प्रियकराने हवेत गोळीबार करून नातेवाईकांच्या समक्ष प्रेयसीला सोबत नेलं.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली होती.
दरम्यान नांदगाव पेठ टोलनाक्यावर प्रफुल्ल दमाये आणि प्रथमेश आधपाके या दोन आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली असून गबरू खोटे, शानू ठाकूर या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपीचे आणि तरुणीचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीने यापूर्वीही नागपूरमध्ये तरुणीच्या साखरपुड्या दरम्यान धिंगाणा घातला होता त्याप्रकरणी आरोपीवर नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली.
ते म्हणाले याप्रकरणी, "दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर 307 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी आणि तरुणी नागपूरचे रहिवासी आहेत. यापैकी एका आरोपीचे तरुणीसोबत सबंध होते," अशी माहिती ठाकरेंनी दिली.
धामगाव रेल्वे मतदार संघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.