You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी पुणे दौरा: शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचा भाग तुटला, विरोधक आक्रमक
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
काल नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही तुटल्याने पुण्यात गदारोळ उडाला आहे. यावर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.
प्रसिद्धीसाठी लवकर उदघाटन करण्यात आलं असा आरोप करण्यात येत आहे.
बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते फुगेवाडी या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल करण्यात आले.
मेघडंबरीच्या बाजूला असलेली सजावट काढताना मेघडंबरीला धक्का लागल्याने ही घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काल काय झालं?
मोदींनी गरवारे स्टेशनमध्ये तिकीट काढून आनंदनगर स्टेशनपर्यंतचा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी विकलांग आणि शालेय विद्यार्थींशी संवाद साधला. त्यानंतर एमआयटी कॉलेजच्या मैदानावर त्यांनी इतर प्रकल्पांचे उद्घाटन केले.
यावेळी भाषण करताना मोदी म्हणाले, ''पुण्याच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मला तुम्ही बोलावलं आणि उद्घाटनला सुद्धा बोलवला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण आधीच्या काळात आधी भूमिपूजन व्हायचं आणि प्रकल्प पूर्ण कधी होणार हे कळायचं नाही. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो हे मेट्रोने दाखवून दिले.
''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या पुणे मेट्रोसाठी ते अनेकदा दिल्लीला यायचे. त्यांच्या प्रयत्नांबद्ल मी आभार मानतो. मेट्रोमुळे प्रदूषण आणि ट्रॅफिकपासून पुणेकरांना दिलासा मिळेल.''
एकीकडे मोदी मेट्रोच्या उद्घाटनासाठी आलेले असताना दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात निदर्शने केली. अलका टॉकीज चौकात कॉंग्रेसकडून काळे झेंडे घेऊन निदर्शने करण्यात आली.
अर्ध्या मेट्रोचं उद्घाटन करत मोदींनी हा फक्त पब्लिसिटी स्टंट केला आहे, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. तसेच मोदींनी लोकसभेत केलेल्या विधानाबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळे कपडे घालून निदर्शने केली. राष्ट्रवादीकडून देखील मोदींनी अर्धवट मेट्रोचे उद्घाटन केल्याचा आरोप केला.
'केवळ असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे हे उद्घाटन होत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या अजूनही अपूर्ण आहेत. तरीसुद्धा निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 54 किलोमीटर पैकी अवघ्या 5 किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे भासवत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला आहे.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांना दिली.
शरद पवार यांनी देखील अर्धवट असलेल्या मार्गाचं मोदी उद्घाटन करत असल्याचे दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
पुण्याचा विकास विरोधकांना पाहावत नाही - महापौर
अर्धवट मेट्रोचं उद्घाटन होत असलेल्या आरोपावर महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले.
मोहोळ म्हणाले, ''मला यावर हसू येतं. अर्धवट मेट्रो असती तर ती आज सुरू झाली नसती. देशात जिथे जिथे मेट्रो सुरू झाली तिथे तिथे ती टप्याटप्यानेच सुरू होते. पूर्ण मेट्रो देशात लगेच कुठेच सुरु झाली नाही. यांनी आयुष्यात पुणेकरांसाठी काही केलं नाही आणि आता पुण्याचा विकास होतोय तर यांना पाहवत नाही.
''पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवतील. महापालिकेच्या निवडणुका आणि आजच्या कार्यक्रमाचा काहीही संबंध नाही. मेट्रो ही टप्याटप्यानेच सुरु होते. लोक आता तिकीट काढून प्रवास देखील करायला लागले आहेत. पुणेकरांसाठी मोठी भेट आहे.''
खरंच अर्धवट मेट्रोचं उद्घाटन झालं का?
पुण्यात सध्या दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरु आहे. वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गावरील काम सध्या सुरु आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरचा वनाझ ते गरवारे हा टप्पा पूर्ण झाला. तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी ते फुगेवाडी हा टप्पा पूर्ण झाला आहे.
या दोन टप्प्याचे मोदींनी उद्घाटन केले. दोन्ही मार्ग मिळून साधारण 32 किलोमीटरचा मार्ग आहे. सध्या दोन्ही मार्ग मिळून साधारण 12 किलोमीटरची मेट्रो सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे खरंच अर्धवट मेट्रोचं उद्घाटन झालं का ? मेट्रोचं उद्घाटन हा येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेला कार्यक्रम आहे का ? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पुण्याच्या लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम म्हणाले, ''मेट्रो प्रकल्प हा भारतीय जनता पक्ष राज्यात आणि महापालिकेत सत्तेत आल्यानंतरच सुरु झाला. मेट्रो ही भाजपाची कल्पना होती आणि त्यांनी ती आमलात आणण्याचा प्रयत्न केला. ती अर्धवट असताना उद्घाटन केले हे शंभर टक्के खरं आहे. परंतु मेट्रो हा महापालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा होणार होता. उद्घाटन झालं नसतं तर मुद्दा आला असता की तुम्ही मेट्रो आणतो म्हणाला होतात आणि ती आणली नाही.
''त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन राजकीय आहे यात काही वादच नाही. उद्घाटन झाल्यानंतर गरवारे ते वनाझ एवढंच अंतरावर प्रवास करता येणार आहे. कुठलाच संपूर्ण रुट पूर्ण झालेला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की काहीच झालं नाही. काहीप्रमाणात मार्ग सुरु झाला.''
''मेट्रो होऊ नये भाजपाला त्याचं क्रेडिट मिळू नये यासाठी देखील अनेक प्रयत्न झाले. या प्रकल्पाला आडकाढी करण्यात आली. तरी सुद्धा हा प्रकल्प काही प्रमाणात सुरु झाला आणि त्याचा राजकीय फायदा भाजपाने घेतला'' असं देखील संगोराम म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी हा कार्यक्रम भाजपाला करायचा होता. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केले आहे. असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले.
''2014 साली मोदी निवडूण आले त्यानंतर सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. विधानसभेची निवडणुक लागण्याआधी नागपूर आणि पुणे मेट्रोचे प्रस्ताव देण्यात आले होते. त्यातल्या नागपूर मेट्रोला हिरवा कंदील देण्यात आला तर पुण्याची मेट्रो रखडली. ''
''सुरेश कलमाडी आणि अजित पवार यांची अनेक वर्ष पुण्यात सत्ता असताना मेट्रो प्रकल्प होऊ शकला नाही, हे वास्तव आहे. जरी प्रकल्प अर्धवट असला तरी याचा फायदा भाजपाला होणार आहे. पाच सहा किलोमीटर का होईना प्रत्यक्ष मेट्रो सुरु होतीये हे खरं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो सुरु व्हावी ही मागणी होती. अजित पवारांनी आजच्या भाषणात सावध भूमिका घेत मेट्रो वाढविण्याची मागणी केली. पण दुसरीकडे या प्रकल्पात राज्यसरकारचा पन्नास टक्के वाटा आहे हे सुद्धा अजित पवारांनी अधोरेखित केलं.
''कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आज जरी निदर्शने करण्यात आली असली तरी मेट्रो हा मुद्दा निवडणुकांमध्ये गेम चेंजर होऊ शकतो हे त्यांना माहित आहे. पुणेकरांच्या दृष्टीने हे मार्ग सुरू होणं ही चांगली गोष्ट देखील आहे. भाजपासाठी मेट्रो हा मुद्दा गेमचेंजर ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे,'' असं देखील मेहता यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्सचे महापालिका बीट सांभाळणारे प्रशांत आहेर म्हणाले, ''जेवढा मार्ग सुरू झाला आहे तो सुरू होणं गरजेचं आहे कारण त्या मार्गावर लगेच नागरिकांना सुविधा मिळते. हे उद्घाटन राजकीय आहेच पण हा टप्पा पूर्ण झाला तर सुरू का नाही करायचा ,असा देखील प्रश्न उपस्थित होतो. नागरिकांना सुविधा मिळत राहीली तर चांगली गोष्ट आहे परंतु हा टप्पा सुरु करुन काही दिवसांनी बंद केला तर हा केवळ राजकीय विषय राहील.''
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो क
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)