पुणे महानगरपालिकेची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण...

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, NARENDRAMODI/TWITTER

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (6 मार्च) पुण्यात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले.यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील काळे कपडे घालून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला.

या दौऱ्यामध्ये पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे आणि फुगेवाडी ते पिंपरी या पहिल्या दोन टप्प्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर पुणे महापालिकेचा जायका प्रकल्प, पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सुद्धा मोदींच्या हस्ते झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रामदास आठवले, भगतसिंग कोशारी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित आहेत.

मोदी पुणे दौऱ्यावर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर

मोदींचा हा दौरा जरी विकासकामांच्या उद्घाटनाबाबतचा असला तरी महापालिका निवडणुकांना काही दिवस राहिले असल्याने राजकीयदृष्ट्या देखील हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

याआधी देखील 2016 मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता होती. त्यानंतर सत्ता परिवर्तन होत पालिकेमध्ये भाजपला शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या.

एकीकडे भाजपकडून पुन्हा पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इतर सर्वच राजकीय पक्ष पुण्यावर अधिक लक्ष देत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात बैठका घेत आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संघटना मजबूत करण्यावर ते भर देत आहेत.

सर्वात मोठं महापालिका क्षेत्र

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आल्याने पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर ठरले आहे. या नव्याने 23 गावांचा समावेश झाल्याने पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 516.18 स्क्वेअर किलोमीटर इतके झाले आहे. तर मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ हे 440 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे. त्यामुळे पुणे राज्यातील सर्वात मोठे शहर झाले आहे तर देशातील सर्वात मोठे सातवे शहर ठरले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यातील आयटी पार्कमुळे पुण्याचं महत्त्व वाढलं आहे. या आयटी पार्कमध्ये काम करणारा वर्ग हा कॉस्मोपॉलिटन आहे. हा वर्ग देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्याने पुण्याची सत्ता मिळविण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे.

कुठलीही मोठी घोषणा करायची असेल किंवा राजकीय भूमिका मांडायची असेल तर राजकीय पक्षांकडून पुण्याचा विचार केलेला पाहायला मिळतो. महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रेस कॉन्फरन्स देखील गेल्या काही काळात पुण्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर देखील पुण्याचं महत्त्व वाढताना दिसत आहे.

राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी पुणं महत्त्वाचं

पुण्याची निवडणुक का महत्त्वाची आहे, याबाबत सांगताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणाले, ''पुणे हे महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने प्रभाव टाकणारं शहर आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून पुणे हे एक राज्याला संदेश देणारं शहर आहे. अनेक चळवळींचा उगम पुण्यात झाला आहे. त्यामुळे पुण्यावर आपली सत्ता असणं हे राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वाचं आहे.''

पुण्यात लकडी पुलावर सुरू असलेलं मेट्रोचं काम

फोटो स्रोत, RAHUL GAIKWAD

''पुणे हे आयटी हब झालं आहे. आयटीमधला बराच मोठा वर्ग हा मोदींचा चाहता आहे. तो त्यांच्या राज्यांमधील मतांवर देखील प्रभाव टाकणारा आहे. नवा पुणेकर मधील एक गट हा कॉस्मोपॉलिटीयन आहे आणि दुसरा गट हा राज्याच्या इतर भागांमधून आलेला वर्ग आहे. या दोन्हींवर प्रभाव टाकण्यासाठी पुणे महत्त्वाचं आहे. अशी परिस्थिती नागपूर किंवा नाशिकमध्ये नाहीये.'' असं देखील दीक्षित सांगतात.

मोदींच्या दौऱ्याविषयी बोलताना दीक्षित म्हणाले, ''महापालिकेची निवडणुक मोदींसाठी महत्त्वाची आहेच त्याचबरोबर 2024 च्या निवडणुकीची त्यांची जी तयारी आहे त्याच्यासाठी तरुण आणि मध्यमवर्गावर प्रभाव टाकण्यासाठी या दौऱ्यांचा ते उपयोग करतात. पुण्यात अनेक शिक्षण संस्था आहेत तिथे भारतातून मुलं आलं आहेत. त्या मुलांमुळे त्यांचे पालक देखील मुलांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील पुण्याच्या निवडणुकांमध्ये रस असू शकतो.''

पुण्यात भूमिका मांडली तर तिचा प्रसार जास्त होतो

''पुण्याच्या निवडणुकांना इतिहास आहे. काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ यांच्यापासून ते प्रकाश जावडेकरांपर्यंत केंद्राच्या महत्त्वाच्या पदांवर पुण्याचा माणूस होता. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आठ आमदार आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर एकत्र केलं तर 14 आमदार होतात. त्यामुळे या आमदारांच्या संख्येमुळे देखील पुण्याचं महत्त्व वाढतं,'' असं सकाळचे संपादक सम्राट फडणीस सांगतात.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फडणीस म्हणाले, ''राज्याचं सांस्कृतिक नॅरेटिव्ह सेट करायचं असेल तर पुण्यात भूमिका मांडणं महत्त्वाचं आहे. गेल्या 30 वर्षात राष्ट्रीय पातळीवर फुले, शाहू, आंबेडकरांबद्दल बोललं जातं त्यांचा पुण्याशी संबंध येतो. सामाजिक चळवळींची पायाभरणी म्हणून पुण्याची ओळख आहे.

उजव्या विचारसरणीचा विचार केला तर संघाचं काम जरी नागपूरमध्ये असलं तरी संघाची वैचारिक बैठक पुण्यात आहे. अशा शहरात एखादी राजकीय भूमिका मांडली जाते तिचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ती इतर ठिकाणी मिळत नाही. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर या सर्व बाजूंनी पुण्याकडे लक्ष दिलं आहे. स्मार्टसिटी सारखा प्रकल्प पुण्यातून सुरु झाला.

त्याचबरोबर शरद पवारांचा राजकीय बेस पुणे आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या पुणे हे राजकारणाचं केंद्रबिंदू गेल्या दहा वर्षांमध्ये होताना दिसत आहे. पुण्यात सर्वच विचारांचे समान लोकं मिळतात त्यामुळे पुण्याची निवडणुक महत्त्वाची ठरते,'' असं देखील फडणीस सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो क

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)