शरद पवार यांच्यावर लवासा प्रकरणी कोर्टाचे ताशेरे, 'पवारांना प्रकल्पात स्वारस्य होते' #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टाकडून निकाली

लवासा प्रकल्पाबाबत केलेले आरोप योग्य असले तरी त्यासाठी कायद्यात करण्यात आलेले बदलही बेकायदेशीर आहेत असं म्हणता येणार नाही. तसेच सध्या तिथं खूप मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेलं आहे.

त्यामुळे त्यावर हातोडा चालवत ते जमीनदोस्त करण्याचे निर्देश देता येणार नाहीत. याचिकाकर्त्यांनी बराच उशिर केलाय, असं निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं लवासाला विरोध करणारी जनहित याचिका अखेर निकाली काढली, असं वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी यासंदर्भात राखून ठेवलेला आपला निकाल शनिवारी जाहीर केला. नाशिकमधील पत्रकार आणि वकील नानासाहेब जाधव यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल करत गेली अनेक वर्ष आपला न्यायालयीन लढा जारी ठेवलाय.

खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं, असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं. या प्रकल्पासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं, हा आरोपही कोर्टानं मान्य केला. 'पवारांनी आपला प्रभाव आणि शक्ती प्रकल्पासाठी वापरली असं देखील हायकोर्टाने म्हटले आहे,' असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

या निकालानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं मात्र तरीही ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाहित त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पर्यटन हा उद्योगक्षेत्राचाच एक भाग आहे.

2. मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रामध्येच, अभिजात दर्जाच्या मुद्द्यावरून राऊतांचा भाजपवर हल्ला

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून टीका केली आहे. मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच असल्याचं राऊत यांनी या माध्यमातून म्हटलं आहे.

"मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्यावर पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे हे या शत्रूंना मान्य नाही. मुंबई-ठाण्यात मराठी माणसाचा टक्का घसरला. पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडपर्यंत ही घसरण झाली. नागपूरसारखी शहरं हिंदीची शाल पांघरून आहेत. त्यामुळं मराठी भाषेचं भवितव्य काय हा प्रश्न पडतो," असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी भेटून मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली. पण मंत्र्यांनी केवळ आश्वासन दिलं, असंही राऊत म्हणाले.

या मुद्द्यावरून राऊतांनी भाजपवरही हल्ला चढवला. भाजप मुंबई मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठी कट्टा राबवत आहेत. पण त्यांचेच लोक मराठी पाट्यांच्या मुद्द्याला विरोध करतात. शाळांत मराठी सक्तीची नको म्हणून सोमय्यांसारखे लोक न्यायालयात जातात, असं राऊत म्हणाले.

बेळगावात मराठी माणसावर अत्याचार होत असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतील. पण भाजप नेते मूग गिळून गप्प बसतील. हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

3. राजा उपाशी असताना घरात कसं बसणार, मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार-धैर्यशील माने

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार धैर्यशील माने याठिकाणी आले होते.

"माझा राजा उपाशी आहे, अशावेळी असताना घरात कसा बसू. छत्रपतींच्या वंशजांचं कुटुंब उपाशी असणं हा काळा दिवस आहे," अशी प्रतिक्रिया माने यांनी यावेळी दिली. 'टीव्ही 9 मराठी'नं हे वृत्त दिलं आहे.

सन्मानानं जगणं शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाची संकल्पना सांगणारे राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज उपोषणाला बसले असल्याचंही ते म्हणाले.

मी शिवसेनेचा खासदार म्हणून नव्हे तर छत्रपतींचा मावळा म्हणून पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचंही, खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी म्हटलं आहे.

छत्रपतींचं घराणं शौर्याची परंपरा देशाला घालून देणारं आहे. तुमच्या आशीर्वादनंच मी खासदार झालो. आपली ही भूमिका निश्चितपणे मंत्रिमंडळासमोर नेईल, मुख्यमंत्र्यांपर्यंत नेईल असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं.

4. राज्याचे मंत्रिमंडळ पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांचं, आशिष शेलार यांची टीका

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ हे पाकिस्तानी समर्थकांचं असल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. 'एबीपी माझा'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

बॉम्बस्फोटातील आरोपींनी 30 कोटी किंमत असलेली जागा 20 लाखांत विकली आणि त्याची खरेदी राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केली. त्यामुळं पाकिस्तानातून रसद घेऊन भारतावर हल्ला करणाऱ्यांच्या समर्थकांचं मंत्रिमंडळ असल्याचं शेलार म्हणाले.

बॉम्बस्फोट करणाऱ्या शहावली खाननं हसीना पारकरच्या हस्तकाच्या मदतीने जागा बळकावली. ज्याच्याशी करार झाला तो आजन्म तुरुंगात आहे. मग करारावर एवढ्या सह्या कशा झाल्या. जेलमधला माणूस बाहेर कसा आला? असे प्रश्नही शेलारांनी उपस्थित केले.

राज्याचे मंत्री असलेल्या नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीशी सलगी केली. त्यांनी बॉम्बस्फोटासाठी त्यांचा पैसा वापरायला दिला असा गंभीर आरोपही शेलारांनी केला.

धर्माचा दाऊदशी सबंध लावणं योग्य नसल्याचं पवार म्हणतात. पण हिंदु आतंकवादाशी सबंध लावणं तुमच्या डोक्यातून निघालं, असं म्हणत शेलारांनी पवारांवरही टीका केली.

5. अमजद खान नावाने टॅप झाला होता नाना पटोलेंचा फोन, वळसे पाटलांची माहिती

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणात नवी माहिती उघड केली आहे. कोणत्या नेत्यांचे फोन टॅप झाले याबाबत त्यांनी माहिती दिली.

त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावाने त्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 'न्यूज 18 लोकमत'नं हे वृत्त दिलं आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडी सरकार कारवाई करत आहे. त्याअंतर्गत पुण्यातील तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबरच बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.

पटोले यांचा नंबर अमजद खान, बच्चू कडू यांचा नंबर निजामुद्दीन बाबू शेख, तर संजय काकडे यांचे दोन नंबर परवेज सुतार आणि अभिजीत नायर आणि आशिष देशमुख यांचे रघू सोरगे आणि महेश साळुंखे या नावाने दाखवत त्यांचे कॉल टॅप केले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)