संजय राऊत म्हणतात तसे मुंबईतले 50% लोक हिंदी बोलतात का? आकडेवारी काय सांगते?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

"आम्ही मुंबईत फिरतो तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. अर्धी मुंबई हिंदीत बोलते. मुंबईत सभा घेतो तेव्हा दहा लोकांमधले चार लोक हे सिद्धार्थनगर मधले असतात. हे आमचं उत्तरप्रदेशशी असलेलं नातं आहे."

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेश मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्या प्रचारादरम्यान हे भाष्य केलं.

ते म्हणाले," इथे स्टेजवर आल्यानंतर मुंबईत असल्यासारखं वाटलं." उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना नेत्यांनी उत्तरप्रदेश आणि मुंबईचं कसं नातं आहे हे सांगितलं.

उत्तर प्रदेश आणि मुंबई यांचं जवळचं नातं असलं तरी मुंबईचे अर्धे लोक हिंदी भाषेत बोलतात यामध्ये किती तथ्य आहे? याबाबतचा हा आढावा..

जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचं प्रमाण वाढलं?

एकट्या मुंबईत 60 लाखांपेक्षा जास्त स्थलांतरीत लोकं राहतात. 2001 च्या जनगणनेनुसार फक्त 20 लाख लोक उत्तरप्रदेशातून स्थलांतरीत झाले होते.

2001 आणि 2011 ची जनगणनेतील भाषांनुसार वाढलेल्या लोकांची तुलना केली तर यामध्ये इतर भाषांपेक्षा हिंदी भाषिकांचं प्रमाण वाढल्याचं लक्षात येतं.

मुंबई उपनगर(2001 च्या जनगणनेनुसार)

गुजराती लोकांमध्ये 3.4 % वाढ झाली आहे. उर्दू लोकांमध्ये 3.09% घसरण झाली आहे, मराठी भाषिकांमध्ये 3.74% वाढ झाली तर हिंदी भाषिकांमध्ये 43.46% वाढ झाली आहे.

मुंबई उपनगरांमध्ये सर्व भाषांपैकी सर्वाधिक वाढ ही हिंदी भाषिकांमध्ये वाढ झालेली दिसते.

मुंबई शहरात गुजराती, मराठी आणि उर्दू भाषिकांमध्ये अनुक्रमे 10.90%, 15.7% आणि 18.57% घसरण झाली. तर हिंदी भाषिकांमध्ये 27.24% वाढ झाली आहे.

संपूर्ण मुंबईत गुजराती, मराठी आणि उर्दू भाषिकांमध्ये अनुक्रमे 0.45%, 2.64% आणि 8.09% इतकी घसरण झाली आहे तर हिंदी भाषिकांमध्ये 39.35 % वाढ झाली आहे.

स्थलांतर हे मुख्य कारण?

महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये अधिक स्थलांतरित आल्याचं समोर आलेलं आहे. यापैकी उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक स्थलांतर झालं.

आजही जवळपास 25 % लोकं उत्तरप्रदेशातून स्थलांतर करतात असं Research & Information System For Developing Countries या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे. गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक स्थलांतर मुंबई आणि ठाण्यात झालं आहे.

ही परिस्थिती कशी बदलत गेली? याची कोणती कारणं आहेत? याबाबत आम्ही स्थलांतर तज्ज्ञ शेखर देशमुख यांना विचारलं. ते सांगतात, "1992 - 93 आपल्याकडचं अर्थकारण बदलत गेलं. शहरीकरणाचे आणि उदारीकरणाचे परिणाम 2000 सालानंतर बदलत दिसू लागले.

उत्तरप्रदेश, बिहारमधल्या मजुरांमध्ये push factor पेक्षा pull factor अधिक जाणवतो. शेतीच्या आकारमानाचा भाग जसा कमी होत गेला तसं तसं स्थलांतर वाढू लागलं. जर तुमच्याकडे एखादं कौशल्य असेल त्याचे पैसे मोजण्याची तयारी ही मुंबईसारख्या शहराची असते.

उत्तरप्रदेश, बिहारसारख्या गावांमध्ये जातीयवाद अधिक आहे. मुंबईसारख्या शहरात जातीपेक्षा त्या व्यक्तीच्या कामाला महत्त्व आहे. त्यामुळे हे स्थलांतर वाढत गेलं. त्यामुळेच शहरातील उद्योगात हिंदी भाषिकांची संख्या वाढत गेली."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)