नवाब मलिकांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

माजी मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन मागितला होता. मात्र, सध्या त्यांच्यावर करण्यात येत असलेले उपचार योग्य पद्धतीने केले जात आहेत, असं कोर्टाने म्हटलं.

न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली होती.

तसंच ईडीच्या तपासाबाबत मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर कोर्टाने म्हटलं की ईडीच्या प्राथमिक तपासात तथ्य दिसत आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य दिसत आहे. गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये, तसंच जबाबांमध्येही आरोपांमध्ये तथ्य असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मनी लाँडरिंग झाल्याचं स्पष्ट होतं, असं म्हणत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने नकार दिला.

तूर्तास नवाब मलिक हे सध्या उपचार घेत आहेत त्याप्रमाणे रुग्णालयात राहून उपचार घेऊ शकतात, असंही या निकालात म्हटलेलं आहे.

जामीन फेटाळल्यानंतर मलिक यांच्यासमोर वरीष्ठ न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

मात्र नवाब मलिक यांना ज्यामध्ये अटक झाली, ते प्रकरण नेमकं काय आहे, याची माहिती आपण या बातमीत घेऊ.

अटकेचं दाऊद इब्राहिम कनेक्शन

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू होती.

याप्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.

त्याच संदर्भात ही चौकशी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पण अजूनही याबाबत ED कडून कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

नवाब मलिक यांच्याबाबत हे एकच प्रकरण गाजत होतं आणि भाजप नेत्यांकडूनही याच प्रकरणाचा आता पुन्हा उल्लेख केला जात आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केले होते आरोप

नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर थेट टीका करत होते.

काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणात त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.

त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना (2005-06) त्यांनी अटकेतील दाऊद इब्राहिमच्या साथीदारांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली, असा आरोप केला होता.

नोव्हेंबर 2021 दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील खडाजंगी चांगलीच रंगली होती. याबाबतची बीबीसीने केलेली बातमी इथं क्लिक करून वाचता येईल.

याच प्रकरणात ED कडून मलिक यांची चौकशी करण्यात येत होती. अखेर त्यांना आज अटक करण्यात आली.

फडणवीस काय म्हणाले होते?

नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं.

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, "1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी LBS रोडवर जागा विकत घेतली."

आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं.

सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.

"1 लाख 23 हजार स्क्वेअर फुटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे," असं फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं.

हा व्यवहार आधी एका व्यक्तीच्या नावे मग नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असं करत झाल्याचं फडणवीस म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, मरिअम बाई ऑफ गोवावाला, प्लंबर यांच्या वतीने सलीम पटेल यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्यांना वली खान यांच्याकडून जमीन मिळाली होती. ही जमीन त्यांनी सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली.

नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही कंपनी आहे. सॉलिडसमध्ये नवाब मलिक होते. मंत्री झाल्यावर त्यांनी सॉलिडस कंपनी सोडली. फरहान मलिक यांच्याकडे कंपनीची मालकी गेली.

"एलबीएस मार्गावर फोनिक्स मार्केट आहे. 2000 रुपये स्क्वेअर फूट दराने ही जमीन विकण्यात आली. अंडरवर्ल्डच्या लोकांकडून खरेदी केलेल्या जागेचं मूल्य 30 लाख रुपये इतके होतं. या व्यवहारात 20 लाखांचं पेमेंट झालं आहे. 15 लाख सलीम पटेल यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 10 लाख शाह वली खान यांना दिले आणि 5 लाख नंतर दिले जातील असं लिहिलं आहे," असं फडणवीस म्हणाले होते.

शिवाय, "नवाब मलिकांविरोधातले पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संबंधित एजन्सीजकडे देणार आहे," असं फडणवीस यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

नवाब मलिकांनी काय उत्तर दिलं होतं?

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती.

"मी बॉम्बब्लास्टच्या कोणत्याही आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केलेली नाहीये. त्या जमिनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे,आम्ही भाडेकरू होतो, मालकी हक्क मिळवण्यासाठी पैसे दिले. सलीम पटेल गुंड आहेत याची मला कुठलीही माहिती नाही. मी हसीना पारकरला ओळखत नाही," असं नवाब मलिक म्हणाले होते.

"फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं. आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं. बॉम्बब्लास्टशी नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असं नवाब मलिकांनी त्यावेळी म्हटलं.

"चौकशीला नवाब मलिक घाबरेल असं त्यांना वाटतं पण मी घाबरणार नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी आपण फडणवीसांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने शहर कसं वेठीस धरलं होतं, हे सांगू," असा प्रत्यारोपही त्यावेळी मलिक यांनी केला होता.

हा नवाब मलिक यांच्याविरोधात कट - शरद पवार

नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून राजकीय विश्वात खळबळ माजली आहे. या मुद्द्यावरून राज्य केंद्रातील सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याचं चित्र आहे.

मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.

हे प्रकरण म्हणजे नवाब मलिक यांच्याविरोधातील कट असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती."

"त्यांनी कोणती केस काढली आहे? नवाब मलिक यांच्या वरती कोणत्या प्रकरणात कारवाई केली गेली आहे याबाबत मला माहिती नाही. काही झालं विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस आहे म्हणायची सवय आहे. त्याच्यात काही नवीन नाही," असंही पवार यांनी म्हटलं.

"मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावरही असेच आरोप झाले होते. आता वीस-पंचवीस वर्षं झाली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, सत्तेचा गैरवापर करणं सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे. ते केंद्र सरकारवर बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)