You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि चंद्रशेखर राव: तिघांच्या भेटींचं 9 अर्थ
- Author, आशिष दीक्षित
- Role, संपादक, बीबीसी मराठी
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 7 वर्षांनी पहिल्यांदाच त्यांच्याविरोधात एक राष्ट्रीय आघाडी आकार घेताना दिसतेय.
त्यामुळे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत उतरले तेव्हा देशाचं लक्ष एकाकएकी उत्तर प्रदेश आणि पंजाबकडून महाराष्ट्राकडे वळलं.
चंद्रशेखर रावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी जाऊन तासभर चर्चा केली.
या दोन्ही बैठकांनंतर त्यांनी पत्रकारांसमोर येऊन म्हणणं मांडलं. दक्षिण भारतीय नेते असूनही त्यांनी शुद्ध हिंदीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांचं हे हिंदीचं ज्ञान महत्त्वाचं ठरू शकेल.
या दोन्ही भेटी म्हणजे नव्या मोर्चाची सुरुवात आहे आणि आम्ही लवकरच पुन्हा भेटू असंही ते म्हणाले. पुढची भेट उद्या-परवाच होऊ शकते, असंही ते म्हणाले. या भेटी आताच आणि एवढ्या वेगाने का होत आहेत? त्यामुळे देशाच्या राजकारणात खरंच काही फरक पडेल का? पाहूया या भेटींमागचा अर्थ 9 सोप्या मुद्द्यांमध्ये.
1. विरोधकांची मोट
मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वांत मोठा पक्ष झाला आणि काँग्रेस नेस्तनाबूत झाला तेव्हापासूनच विरोधक एकजुटीची भाषा करत आहेत. पण विरोधकांना एकमेकांपासून दूर ठेवण्यात आतापर्यंत मोदींना यश आलं.
राज्यसभेत बहुमत नसूनही अनेक प्रादेशिक पक्षांची मदत ते मिळवू शकले. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला राज्यात विरोध करत असताना केंद्रात त्यांनी वेगळी समीकरणं ठेवायचा प्रयत्न केला. त्यामुळे कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना, बिजेडी, कधी तेलंगण राष्ट्र समिती असे पक्ष अधूनमधून भाजपला दिल्लीत मदत करत आले.
आता मात्र यातल्या अनेकांना ही तारेवरची कसरत महागात पडत असल्याचं जाणवलं आहे. त्यामुळे आधी यशवंत सिन्हांच्या निमंत्रणाने पवरांच्या घरी विरोधकांची बैठक झाली. पण त्यातून काही हशील झालं नाही. ममतांनीही विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. पण त्यांच्या सादेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
आता मात्र के. चंद्रशेखर रावांच्या बाजून किमान दोन प्रादेशिक पक्ष उभे राहिलेले दिसत आहे - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. द्रमुकेच स्टॅलिनही त्यांच्या बाजून येऊ शकतात. इतर कोणकोणते पक्ष येतील, हे येणाऱ्या दिवसांत कळेलच.
2. तपास संस्थांना वैतागले
कथितरीत्या स्वायत्त असलेल्या केंद्रीय तपास संस्था (म्हणजे ED, CBI वगैरे) या विरोधकांच्याच का मागे लागतात, हे उघड गुपित आहे. केंद्र सरकारच्या पिंजऱ्यातले हे पोपट आहेत आणि त्यांना मोकळं करा, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
तर या संस्थांनी विरोधकांच्या अनेक नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. हा तपास संस्थांचा गैरवापर आहे आणि त्याविरोधात आम्ही एकजूट करत आहोत, असं चंद्रशेखर राव म्हणाले. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करतंय, असं उद्धव ठाकरेही म्हणाले.
या तपास संस्थांचा बडगा आणि राज्यपालांशी होत असलेला संघर्ष यांमुळे उद्धव, ममतांसारखे मुख्यमंत्री त्रासले आहेत. यांचा मुकाबला एकेकट्याने करण्यापेक्षा एकत्र येऊन करावा, असं या नेत्यांना आता वाटत आहे.
3. राजकीय पर्याय
चंद्रशेखर राव आणि इतर मोदीविरोधक केवळ मुख्यमंत्र्यांची मोट बांधून थांबतील असं वाटत असतानाच पवारांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर नवी माहिती पुढे आली.
मोदींच्या विकासाच्या मॉडेलवर टीका कर आम्ही पर्यायी मॉडेल उभं करून असं राव आणि पवार म्हणाले. बेरोजगारी, गरिबी आणि शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही सोडवू, असंही ते म्हणाले.
म्हणजे आम्ही केवळ मोदींना विरोध करण्यासाठी किंवा स्वतःची कातडी वाचवण्यासाठी एकत्र येत नसून लोकांना सक्षम पर्याय देत आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला.
4. केसीआर हेच नेता?
प्रादेशिक पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचा नेता कोण होईल, यावरून एकमत घडवून आणणं नेहमीच जिकिरीचं ठरलं आहे. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न पवार आणि ममतांनी करून पाहिले. पण आता केसीर (के चंद्रशेखर राव) या शर्यतीत एक पाऊल पुढे सरकलेले दिसत आहेत.
मला पवारांचे आशीर्वाद आहेत, असं केसीआर पवारांच्या शेजारी उभे राहून म्हणाले. पवारांनी मग केसीआर यांच्या विकासाच्या मॉडेलची स्तुती केली आणि हे तेलंगण मॉडेल देशासाठी पथदर्शक ठरू शकेल, असं म्हटलं.
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी केलेलं विश्लेषण तुम्ही इथे पाहू शकता.
एरव्ही भाजपसोबत जुळवून घेणारे केसीआर आता पक्के भाजपविरोधी झाले आहेत. तेलंगणात भाजपच मुख्य स्पर्धक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि दोन वेळा तेलंगणचे अनभिषिक्त सम्राट झाल्यानंतर आता त्यांना दिल्लीची स्वप्नंही पडू लागली आहेत.
पण इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्या नेतृत्वाला मान्यता देतील का, हा प्रश्न आहे.
5. इतर पक्षांचं काय?
तेलंगण राष्ट्र समिती, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक आणि इतर काही पक्ष सोबत आले तरी अनेक पक्ष कुंपणावर बसणं पसंत करू शकतात.
आम आदमी पार्टीचे केजरीवाल यापूर्वी विरोधकांच्या या एकजुटीच्या प्रयत्नांपासून दूर राहिले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे प्रमुख नविन पटनायकही भाजपला फार दुखावू इच्छित नसतात.
तसंच, एका राज्यातला एकच प्रादेशिक पक्ष या आघाड्यांमध्ये येतो, असं आजवर दिसलं आहे. म्हणजे जर समाजवादी पार्टी आली तर मायावतींची बसप येईल का, हा प्रश्न उरतोच.
या आघाडीत येऊन निवडणुकीआधी फारसा फायदा होत नाही. कारण केसीआर यांच्या नावे महाराष्ट्रात मतं मिळत नाहीत आणि उद्धव ठाकरेंचा तेलंगणात उपयोग नाही. त्यामुळे आधीपासूनच भाजपला शिंगांवर घेण्यापेक्षा निकाल लागल्यावर काय ते पाहू - असा विचार अनेक पक्ष करू शकतात. भाजपच्या चार जागा कमी आल्या तर एडीएमध्ये उडी मारायचीही अनेकांची तयारी आहेच.
6. काँग्रेसचं काय करायचं?
काँग्रेस हा भाजपनंतर दुसरा सगळ्यांत मोठा पक्ष. त्यांचे खासदार पन्नासच्या घरात जरी असले तरी त्यांच्याकडे देशातली सुमारे 20 टक्के मतं आहेत. हा खूप मोठा आकडा आहे.
काँग्रेसला सोबत घेतल्याखेरीज या आघाडीचं बळ वाढत नाही. आणि काँग्रेसला सोबत घेतलं तर गांधींचं नेतृत्व मानायची या प्रादेशिक नेत्यांची तयारी नाही.
मग अशा परिस्थितीत काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष केसीर किंवा पवार किंवा ममतांसारख्या प्रादेशिक नेत्याच्या हाताखाली काम करेल का?
आणि काँग्रेस जर सोबत आली नाही, तर विरोधाकंची एकजूट झाली असं म्हणता येणार नाही. उलट भाजपविरोधात एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे ही आघाडी अशी मतविभागणीही होऊ शकते.
त्यामुळे काँग्रेसचं काय करायचं, हा पेच केसीआर यांना सोडवावा लागेल. त्यांनी आज या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं, पण गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसबद्दल नरमाईची भूमिका घेतना दिसत आहेत.
7. आत्ताचं टायमिंग का साधलं?
2024 लोकसभेची निवडणूक आता दोन वर्षांवर आली आहे. पुढच्या वर्षीपासून निवडणुकांची तयारी सुरू होईल. त्याआधी ही चाचपणी होत आहे. पण त्याही आधी 2022 या सुरू असलेल्या वर्षातच राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे.
उत्तर प्रदेशात जर भाजपच्या जागा 200हून खाली गेल्या आणि विरोधकांनी मिळून एकच उमेदवार दिला, तर राष्ट्रपतिपदाची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यांत महत्त्वाच्या राज्यात प्रचार सुरू आहे. तिथे पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे इतर नेते अडकले असताना विरोधक जुळवाजुळव करत आहेत.
उत्तर प्रदेशात जर भाजपला घवघवीत यश मिळालं तर विरोधकांच्या एकजुटीची प्रक्रिया संथ होऊ शकते. पण जर भाजपच्या जागा घसरल्या तर विरोधकांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल.
8. तेजस उद्धव ठाकरे
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. तब्येतीच्या कारणामुळे ते घराबाहेरही कमी पडतात. अशा वेळी त्यांचे मुलगे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे अनेक दौरे करत आहेत.
त्यातच त्यांनी तेजस या धाकट्या मुलाला केसीआर यांच्यासोबतच्या बैठकीत बोलवल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. आता आदित्यपाठोपाठ तेसजही राजकारणात येईल, याचा हा संकेत मानला जातोय.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर कटू शब्दांत टीका करणाऱ्या बाळासाहेबांच्या तिसऱ्या पिढीतली दुसरी व्यक्ती आता राजकारणाच्या उंबरठ्यावर उभी दिसत आहे.
9. प्रकाश राज काय करत होते?
दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये आणि हल्ली हिंदी सिनेमांमध्ये भूमिका करणारे प्रकाश राजही केसीआर यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये दिसले. शरद पवारांच्या बाजूला त्यांचा हात धरून प्रकाश राज उभे होते.
गौरी लंकेश या हत्या झालेल्या पत्रकाराचे ते मित्र होते. या हत्येनंतर प्रकाश राज जाहीरपणे उजव्या विचारांच्या विरोधात भूमिका घेऊ लागले.
त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. आता या नव्याने तयार होत असलेल्या आघाडीत त्यांची काय भूमिका असेल, याबद्दल अनेकांना कुतुहल वाटत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)