You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश राज कोण आहेत आणि ते उद्धव ठाकरे-पवार-केसीआर भेटीत काय करत होते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज (20 फेब्रुवारी) एक बैठक झाली.
नियोजित बैठकीसाठी के. चंद्रशेखर राव हे स्वतः ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी राव यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांच्या आदरसत्काराचा कार्यक्रमही रितसर पद्धतीने पार पडला.
पाहुण्यांच्या यादीत चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समिती (TRS) पक्षातील नेते-कार्यकर्ते अशी काही नावे होती.
पण त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त लक्ष कुणी वेधून घेतलं असेल तर ते अभिनेते प्रकाश राज यांनी. विशेष म्हणजे, प्रकाश राज हे चंद्रशेखर राव यांच्या TRS पक्षाचे ते प्राथमिक सदस्यही नाहीत.
शिवाय, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो, मात्र त्यांचं कार्यक्षेत्र प्रकाश राज यांचं कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने कर्नाटकात बंगळुरू इथं आहे.
पण देशातील दोन मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचं दिसून आलं. नंतर KCR आणि शरद पवार यांच्या बैठकीदरम्यानही प्रकाश राज यांची उपस्थिती होती.
या दोन्ही बैठकींदरम्यान अभिनेते प्रकाश राज त्याठिकाणी काय करत होते? याचा राजकीय अर्थ काय असू शकतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.
KCR-प्रकाश राज यांची विशेष जवळीक
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला एका हॉटेलमध्ये थांबले होते. प्रकाश राज तिथं येऊन त्यांना भेटले. त्यानंतर सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
पण अशा प्रकारे के. चंद्रशेखर राव यांच्या राजकीय भेटीगाठींदरम्यान जाण्याची प्रकाश राज यांची ही काय पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक प्रसंगी KCR आणि प्रकाश राज यांची जवळीक दिसून आली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार इमरान कुरैशी सांगतात, "KCR आणि प्रकाश राज यांच्यातील मैत्री जुनी आहे. कन्नड चित्रपटांमधून अभिनयास सुरुवात करणाऱ्या प्रकाश राज यांनी पुढे तेलुगू-तमीळसह हिंदीतही चांगला जम बसवला. विशेष म्हणजे तेलुगू चित्रपटांत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे हैदराबाद हे त्यांच्यासाठी दुसरं घरंच आहे. साहजिकच के. चंद्रशेखर राव यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत."
कुरैशी यांनी यावेळी प्रकाश राज-KCR-कुमारस्वामी यांच्या भेटीबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले, "2018 सालीही के. चंद्रशेखर राव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय जुळवाजुळव सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवीगौडा यांची बंगळुरूत येऊन भेट घेतली होती. त्यावेळीही प्रकाश राज यांची राव यांच्यासमवेत उपस्थिती होती."
"आता उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीदरम्यानही प्रकाश राज उपस्थित होते. म्हणजेच यातून दोघांमधील जवळीक दिसून येते," असं कुरैशी सांगतात.
प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं होतं KCR यांचं भाषण
KCR-देवीगौडा-प्रकाश राज भेटीचा वरील प्रसंग एप्रिल 2018 मधला आहे. त्याच्या एका महिन्याआधीही प्रकाश राज-KCR यांच्या भेटीविषयी माध्यमांमध्ये चर्चा होती.
टाईम्स ऑफ इंडिया वेबसाईटवरील 30 मार्च 2018 च्या एका बातमीनुसार, त्यावेळी प्रकाश राज यांनी चक्क प्रेक्षक गॅलरीत बसून KCR यांचं विधानसभेतील भाषण पाहिलं होतं.
त्या दिवशी प्रकाश राज हे सर्वप्रथम प्रगती भवन या मुख्यमंत्री KCR यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना जाऊन भेटले.
त्यांनंतर दोघेही राव यांच्या शासकीय वाहनातून विधानभवनात गेले. तिथं चंद्रशेखर राव यांचं भाषण सुरु असताना प्रकाश राज प्रेक्षकांच्या गॅलरीत बसून होते.
आपल्या बैठकीदरम्यान काय चर्चा झाली, याविषयी कोणतीही माहिती प्रकाश राज किंवा KCR यांनी त्यावेळी माध्यमांना दिली नव्हती.
KCR यांच्याकडून वातावरण निर्मिती
याविषयी बोलताना बीबीसी तेलुगूचे संपादक राममोहन सांगतात, "प्रकाश राज हे दक्षिणेतील मोठे अभिनेते आहेत. त्यांच्या नावाला एक वलय आहे. दुसरीकडे KCR यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चाचपणी सुरू आहे. या भेटीमार्फत त्याची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राव यांनी केलेला असू शकतो."
राममोहन पुढे सांगतात, "KCR यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. त्यांनी या दोन्ही भेटींमार्फत देशातील नेत्यांना एक संदेश दिला आहे. सध्या इतकं प्रकर्षाने जाणवत नसलं तरी प्रकाश राज यांच्या प्रतिमेचा वापर करून घेणंही त्यांना सहजशक्य आहे. प्रकाश राज यांच्यामुळे त्यांच्या आघाडीला लिबरल चेहरा प्राप्त होऊ शकतो.
प्रकाश राज यांचा चाहता वर्ग देशभरात आहे, त्यांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते सांगतात, "लिबरल आणि डाव्या विचारांच्या लोकांमध्ये प्रकाश राज यांना चांगला पाठिंबा आहे, हे खरं आहे. पण KCR यांच्या डोक्यात नेमकं काय आहे, हे माहित नाही. कारण प्रकाश राज हे अद्याप पक्षाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे त्याचा किती फायदा त्यांना होईल, हे अद्याप सांगता येत नाही.
KCR यांनी राज यांच्या फॅन फॉलोविंगचा विचार KCR यांनी केला आहे किंवा नाही, हे अद्याप सांगता येणार नाही, असं पत्रकार इमरान कुरैशी यांनाही वाटतं.
ते म्हणतात, "KCR हे तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे नक्की. पण त्यांनी विचारपूर्वक प्रकाश राज यांच्या प्रतिमेचा वापर करण्यासाठी नेलं असण्याची शक्यता कमी वाटते."
"प्रकाश राज हे KCR यांचे मित्र आहेत. एक मित्र म्हणून सदिच्छा भेटीला सोबत ते गेले असतील. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सोबत दिसतात. त्यामुळे त्याच्या राजकीय परिणामांचा विचार झाला असेल किंवा नाही, हे आपल्याला अद्याप सांगता येणार नाही," असं कुरेशी सांगतात.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर घेतली ठाम भूमिका
प्रकाश राज त्यांच्या अभिनयाची जितकी चर्चा होते, तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्या ठाम राजकीय भूमिकेबाबत होताना दिसते.
विशेषतः प्रकाश राज हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. देशात-जगात घडणाऱ्या घडामोडींवर ते आपलं मत सातत्याने आणि स्पष्ट शब्दांत व्यक्त करतात.
बंगळुरू येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या टीकाकार मानल्या जात. त्यांच्या हत्येनंतर देश ढवळून निघाला. त्यावेळी अभिनेते प्रकाश राज यांनी याबाबत ठाम भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
लंकेश यांच्या हत्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगलं आहे, असा प्रश्न प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता.
तेव्हापासून प्रकाश राज यांची मोदीविरोधातील टीकेचा सूर वाढतच गेल्याचं दिसून येतं.
पुढे त्यांनी लोकसभा 2019 ची निवडणूकही अपक्ष लढवली. मात्र त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही ते राजकीय-सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहेत. या कालावधीत त्यांनी सरकारविरोधी आंदोलनांमध्येही सहभाग नोंदवला.
कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांमध्येही प्रकाश राज सहभागी झाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)