You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
के. चंद्रशेखर रावांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट, काय घडलं या भेटींमध्ये?
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आज (20 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
देश ज्या पद्धतीने चालवला जात आहे ते योग्य नाही, विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करायला हवं, अशी भूमिका तिन्ही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली.
के. चंद्रशेखर राव सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी जाऊन भेटले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषद घेतली.
केसीआर-उद्धव ठाकरे भेटीत काय घडलं?
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी आज भेट झाली. देशातलं वातावरण गढूळ होत चाललं आहे. सुडाचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. बदला घेण्याचं हिंदुत्व आमचं नाही."
"छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती होती. आमची आज भेट होतेय. आतमध्ये एक, बाहेर वेगळं असं आम्ही करत नाही. बैठकीत लपवण्यासारखं काहीही नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच, "देशाचं भवितव्य काय? देशाचा विचार करायला पाहिजे होता. आज नव्याने साक्षात्कार झालेला नाही. संपूर्ण देशात राज्यं शेजारधर्म विसरली आहेत. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यात चांगलं वातावरण राहायला हवं. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्यात हे परवडणारं नाही. आकारउकार यायला थोडा वेळ लागेल. देशाचे मूलभूत प्रश्नांऐवजी, दुसऱ्याला बदनाम करण्याची व्यवस्था तयार झाली पाहिजे. आम्ही दोघांनी एक दिशा ठरवली आहे. आम्ही त्यानुसार वाटचाल करू," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर के. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर म्हटलं की, "देशात अन्य काही लोक आहेत जे आमच्याप्रमाणे विचार करतात. काही दिवसातच हैदराबाद इथे पुन्हा चर्चा होईल. मग पुढचा रस्ता स्पष्ट होईल."
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्र-तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. 1000 किलोमीटरची सीमा लागून आहे. महाराष्ट्र आमचा मित्र आहे. अनेक गोष्टींमध्ये सहकार्याने काम करावं लागतं. दोन नेते भेटतात त्यावेळी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते. देशात परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवा मंडळींना घेऊन काम करायला हवं. देशाचं वातावरण खराब करायला नको. भारताला मजबूत करावं अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करू. लोकशाहीसाठी लढायचं आहे. आमच्या भेटीत जी चर्चा झाली त्याचे सकारात्मक परिणाम. उद्धवजींना हैदराबादचं निमंत्रण देतो. त्यांनी आमचं छान आदरातिथ्य केलं".
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो. केंद्राला याचे परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले.
केसीआर-शरद पवार भेटीत काय घडलं?
के. चंद्रशेखर राव आणि शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. त्यानंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, "देशासमोर ज्या समस्या आहेत त्यावर चर्चा झाली. आरोग्य, रोजगार, शेतकऱ्यांची स्थिती यांच्याशी या विषयांवर चर्चा झाली. राजकीय चर्चा फार झाली नाही. तेलंगणाने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय वेगळे आहेत. त्यांनी देशासमोर उदाहरण पेश केलं आहे. विकास-विकास आणि विकास यावरच चर्चा झाली. देशातील बिघडलेल्या राजकीय स्थितीवर मार्ग काढण्यासाठी यापुढेही चर्चा करून निर्णय घेऊ."
'तेलंगणाच्या निर्मितीत पवारांचा पाठिंबा मोलाचा'
"तेलंगणा राज्य निर्मितीत शरद पवारांची मोठी भूमिका, त्यांचा पाठिंबा मोलाचा होता. तेलंगणाच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते आहेत. देश योग्य पद्धतीने चालवला जात नाहीये. विकास होत नाहीये. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर काही बदल आवश्यक आहेत. शरद पवार अनुभवी नेते आहेत. देशातले सगळ्यात लहान वयाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी मला आशिर्वाद दिला आहे. एकत्र काम करायला हवं यावर आमचं सहमत झालं आहे. देशातील अन्य पक्षांशी आम्ही चर्चा करू. एकत्र बसून निर्णय घेऊ. कदाचित बारामतीला बैठक होईल. आमच्याबरोबर येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांना एकत्र घेऊ. देशातल्या जनतेसमोर अजेंडा ठेऊ".
काही दिवसांपूर्वी जवळपास सर्वच मुंबईकरांनी सकाळी-सकाळी वृत्तपत्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फोटोसह जाहिराती पाहिल्या. जवळपास सगळ्याच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली होती.
पण हे फक्त महाराष्ट्रातच घडत नव्हतं. देशभरातील सर्वच मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये अशा प्रकारची जाहिरात छापून आली होती.
इतकंच नव्हे तर त्याच्या पूर्वीही काही दिवस के. चंद्रशेखर राव आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड शब्दांत टीका केल्यामुळे त्याच्या सर्वच ठिकाणी बातम्या झाल्या होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)