पंजाबमधील तरुण मुली ड्रग्ससाठी जेव्हा सेक्स गुलाम होतात...

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

ड्रग्सच्या आहारी गेलेल्या प्रत्येक मुलीला सेक्स स्लेव्ह म्हणून वागवलं जातं, हे प्रत्येक मुलीबरोबर घडतं, नशामुक्ती केंद्रातून सुटून बाहेर आलेल्या आणि आता चांगलं आयुष्य जगणाऱ्या एका मुलीनं मला हे सांगितलं.

तिचं हे वाक्य ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला...

ड्रग अत्यंत महाग असतं, मग त्याच्या आहारी गेलेल्या मुली ते मिळवण्यासाठी, 'सेक्स स्लेव्ह' होण्यासाठीसुद्धा तयार असतात, जालंधरच्या बॉईस्टर या रिहॅब सेंटरमध्ये समुपदेशन करणाऱ्या डॉक्टर जसबीर ऋषी यांनी माझ्या ज्ञानात आणखी भर टाकली.

दिल्लीतल्या सिंघू सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाचं वेळोवेळी कव्हरेज करताना मला तिथल्या अनेक शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये चिट्टा नावानं फेमस असलेल्या ड्रग्जबाबत सांगितलं होतं. त्याच्या आहारी जाऊन 14-15 वर्षांची मुलं कशी जीव गमावतात याच्या कहाण्या सांगितल्या होत्या.

हे चिट्टा प्रकरण नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचं मग मी ठरवलं. याचा मागोवा घेताना मी जालंधरच्या बॉईस्टर रिहॅब सेंटरच्या परविंदर सिंग यांना भेटलो. त्यांचं हे नशामुक्ती केंद्र पाहाताना माझ्या लक्षात आलं की त्यांनी मुलींसाठी एक वेगळा वॉर्डच तयार केलाय. आणि इथूनच मला ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलींच्या कथा समजल्या.

आतापर्यंत मी फक्त मुलांच्या ड्रगच्या आहारी गेलेल्या कथा ऐकल्या होत्या. पण हे मात्र माझ्यासाठी नवीन होतं. नशामुक्ती केंद्रातून बाहेर पडलेल्या मुलं आणि मुलींशी चर्चा करताना तर समोर एक अत्यंत भयंकर वास्तवच उभं राहीलं.

पण पुढे जाण्याआधी चिट्टा म्हणजे काय ते सांगतो. तर चिट्टा म्हणजे हेरॉइन. त्याला पंजाबमध्ये चिट्टा म्हणतात. कारण ते पाढऱ्या रंगाचं असतं. पंजाबीमध्ये पांढऱ्या रंगाला चिट्टा म्हणतात. पंजाबमध्ये चिट्टा देण्याआधी म्हणजेच हेरॉइन येण्याआधी ब्राऊन शुगरचं सेवन केलं जात होतं त्याला लोक काळं ड्रग म्हणतात.

तर अशा या चिट्ट्याच्या आहारी गेलेल्या मुलींची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव इथं मी सांगत नाहीये.

आता पूर्णपणे सुस्थितीत असलेल्या एका मुलीनं मला सांगितलं, "आता माझं लग्न झालंय मी एक चांगलं आयुष्य जगतेय, पण आधीच्या आयुष्यात मी खूप काही गमावलं आहे.

"मी एका चांगल्या कुटुंबातून येते, माझे आईवडील उच्चशिक्षित आहेत. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधून त्यांनी मला काढून टाकू नये, त्यांनी मला रिजेक्ट करू नये म्हणून मग ग्रुपमध्ये कायम राहण्यासाठी मी नशा करायला सुरूवात केली. अकरावीपासूनच मी नशा करायला लागले."

एका सधन कुटुंबातून येणाऱ्या या तरुणीनं नशेच्या 11 वर्षांमध्ये तिचं सगळं विकून खाल्लं. आईवडिलांनी घेऊन दिलेलं घरसुद्धा विकून खाल्लं. घरच्यांनी आर्थिक पाठबळ देणं बंद केलं, संबंध तोडले तेव्हा मग तिनं नशामुक्ती केंद्रा गाठलं.

"आता 4 वर्षांपासून मात्र मी सगळं ठीक केलं आहे. लग्न करून ठिकठाक आयुष्य जगत आहे. आईसुद्धा आता माझ्याशी बोलते," तिच्या सुधारलेल्या आयुष्याबाबत सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची किनार होती.

पण प्रत्येत मुलीच्या नशिबात असं सुधारलेलं जीवन येतंच असं नाही.

"माझं नशीब चागंलं होतं म्हणून मला योग्य ट्रिटमेंट मिळाली, नाहीतर अशा अनेक मुली आहेत ज्या कधी ट्रिटमेंटपर्यंत पोहोचतच नाहीत. कुटुंबातली माणसं मुलांच्या ट्रिटमेंटसाठी आकाशपाताळ एक करतात. पण मुलींच्या ट्रिटमेंटला ते घाबरतात. इज्जत जाईल याची त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते मुलींना घरीच ठीक करण्याचा प्रयत्न करतात," त्या तरुणीनं मला सांगितलं.

नशामुक्ती केंद्र चालवणारे परविंदर सिंगसुद्धा हे मान्य करतात. मुलींना घरीच ठीक करण्याचं प्रमाण खूप जास्त असल्याचं ते सांगतात.

"नशा करणाऱ्या मुलींची संख्या आता वाढली आहे. आमच्या नशामुक्ती केंद्रात सध्या फक्त 2 मुली आहेत आणि 50 मुलं आहेत. मुलींना नशामुक्ती केंद्रात पाठवण्याला समाजात योग्य नजरेनं पाहिलं जात नाही. कुटुंबाचीसुद्धा इच्छा नसते की मुलीची सत्य परिस्थिती समोर यावी."

अनेक कुटुंबानी त्यांच्या मुलींना नाकारलं आहे. कुठल्यातरी आश्रमात नेऊन ठेवलं आहे. माझ्या अनेक पूर्वाश्रमीच्या मैत्रिणींना त्यांच्या कुटुंबानी नाकारलं आहे, त्या तरुणीनं सांगितलं.

पण, खरंच ड्रग्जसाठी मुलींना पेडलर्स सेक्स स्लेव्ह म्हणून वागवतात का, असा प्रश्न मी जेव्हा या मुलीला विचारला तेव्हा एका क्षणात तिनं हो असं उत्तर दिलं.

त्याबाबत सांगताना ती पुढे म्हणते, "फक्त ड्रग पेडलर्सच नाही तर पोलीससुद्धा अनेकदा मुलींना भीती दाखवून सेक्स स्लेव्ह करतात. पण अनेक मुली त्याबाबत बोलत नाहीत. खरंतर हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या प्रत्येक मुलीबरोबर घडतं. अनेकदा मुलींसमोर अशी स्थिती तयार केली जाते की त्या त्याला नाही म्हणू शकत नाहीत."

तर अनेकदा मुली त्यांची ड्रग्जची गरज पूर्ण करण्यासाठी पेडलर्सबरोबर काम करायला सुरुवात करतात. त्यातूनच मग पेडलर्स त्यांचा सेक्स स्लेव्ह म्हणून वापर करतात, असं परविंद सिंग सांगतात.

ड्रगच्या आहारी गेलेल्या मुलामुलींचं समुपदेशन करणाऱ्या डॉ. जसबीर ऋषी यांनी हे नेमकं कसं घडतं याचा क्रम सांगितला.

मुलींच्या ड्रग्ज सेवनाची सुरुवात अनेकदा दारूपासून होते. पुढे जाऊन मग त्या इतर गोष्टींकडे वळतात. मुलंमुली एकत्र पार्टी करतात तेव्हा त्याची खरंतर सुरुवात होते, डॉ. जसबीर ऋषी सांगतात.

अनेक मुली आमच्याकडे अशा आल्या ज्यांना त्यांच्या चुलत भावांमुळे किंवा कुटुंबातल्या इतर पुरुषामुळे सवय लागली होती. यामध्ये बिझनेस फॅक्टरसुद्धा फार मोठा आहे. मुलींच्या माध्यमातून ड्रग्जची डिलेव्हरी करणं सोपं जातं. त्यामुळे अनेकदा मुलींना या कामात जुपलं जातं.

मुलींचा पेडलर म्हणून वापर

आता ड्रगच्या विक्रीत मुलींची सख्या वाढत असल्याचं सांगितलं जातं.

डॉ. जसबीर ऋषी याबाबत अधिक सांगतात, "ड्रग्ज विक्रीच्या धंद्यात मुलींचा कसा वापर होतो हे आमच्याकडे आलेल्या अनेक मुलींनी आम्हाला सांगितलं आहे. आमच्याकडे फारच कमी मुलंमुली उपचार घेण्यासाठी येतात. मुख्यतः अप्पर क्लासमधली मुलंमुली येतात. पैशांमुळे अनेक मुली उपचार करू शकत नाहीयेत."

त्या पुढे सांगतात, "ड्रग्जच्या आहारी गेलेला मुलगा कुठल्याही थराला जातो. तो काहीही करू शकतो, काहीही विकू शकतो. तर जेव्हा मुलींची गोष्ट येते तेव्हा त्यांच्याकडे विकण्यासारखं काय आहे तर त्या स्वतःला विकतात. त्यातून त्या सेक्स स्लेव्ह बनतात. कारण त्यांना पैशांची गरज असते. पैसे नाही मिळाले तर त्या ड्रग्ज खरेदी करू शकत नाहीत.

"ड्रग्जच्या किंमती सोन्याच्या बरोबरीनं आहेत, ते नाही मिळालं तर व्यक्ती जगू शकत नाही. परिणमी स्वतःला वाचवण्यासाठी मुली सेक्स स्लेव्ह होण्यास तयार होतात."

नशा करणाऱ्या मुलींचे छोटेछोटे ग्रुप असतात. एका ग्रुपमध्ये 30-35 मुली असतात. त्यात त्या एकिमेकीला मदत करतात. आता नशा नाही केली तर मृत्यू येईल अशी स्थिती येते तेव्हा त्यांना माहिती असतं की कुणाला संपर्क केला की कुठे आणि कसं ड्रग मिळेल ते, डॉ. जसबीर ऋषी पुढे सांगतात.

पण मुलांच्या तुलनेत मुलींवर उपचार करणं फार सोपं आहे, त्यांचा रिकव्हरी रेटसुद्धा चांगला असल्याचं समुपदेशक मान्य करतात.

डॉ. ऋषी सांगतात, एखादी मुलगी यात अडकली की तिचा पहिला प्रयत्न असतो की ती यातून कशी बाहेर पडेल.

14-15 वर्षांच्या मुलांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण

सध्या तर नवरा-बायकोनं एकत्र नशा करत असल्याच्या केसेस वाढल्याचं परविंदर सिंग सांगतात.

पंजाबमध्ये सध्या अशी अनेक गावं आहेत जिथं कुणी तरूण उरलेलाच नाहीत. एकतर ते परदेशात गेले आहेत किंवा मग ड्रगच्या आहरी जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.

पठाणकोट जिल्ह्यातल्या छन्नी बेल्ली गावात तर एकसुद्धा तरूण नाही. तिथं तर 14-15 वर्षांच्या अनेक मुलांचे यामुळे मृत्यू झालेत. याच जिल्ह्यातल्या एका तरुणानं मला याची माहिती दिली.

पंजाबमध्ये ड्रग खूप सहजपणे उपलब्ध आहे, तुम्हाला पानाच्या गादीवरच चिट्टा मिळेल, परविंद सांगतात.

एवढ्या लहान मुलांचे ड्रगमुळे मृत्यू कसे होतात, असं विचारल्यावर परविंदर सांगतात, "अनेकदा मृत्यू होणारा 14-15 वर्षांचा मुलगा हा नशामुक्ती केंद्रातून ठीक होऊन गेलेला असतो. त्याच्यावर उपचार झाले असतात. पण, जेव्हा त्याला पुन्हा नशेची तलफ येते आणि तो नशा करतो तेव्हा तो आधी घेत असलेल्या ड्रग्जच्या प्रमाणातच सेवन करतो.

"पण उपचारांमुळे त्याच्या शरीराची सवय सुटलेली असते. अशावेळी ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू होतो. शिवाय सिंथेटिक ड्रगच्या सेवनामुळेसुद्धा अनेकदा लहान मुलांचे मृत्यू होतात."

कॅप्टर अमरिंदर सिंगांनी सत्तेत आलो तर 4 आठवड्यात ड्रग्जची समस्या सोडवतो असं सांगितलं होतं. पण ही समस्या सोडवण्यासाठी पंजाब पोलिसांना फक्त 4 तास पुरेसे आहेत. त्यांनी विचार केला तर ते हे लगेच कंट्रोलमध्ये आणू शकतात, असा दावा परविंदर सिंग करतात.

शीखांच्या गुरूग्रंथ साहिब या धर्मग्रंथात कुठल्याही प्रकारच्या नशेला वर्ज्य करण्यात आलं आहे. जो नशा करतो तो शीख नाही, असं सांगण्यात आलंय. मुलांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी त्याचासुद्धा आधार घेतला जात असल्याचं परविंदर सिंग यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)