You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंजाब निवडणूक : 'शेतीच राहिली नाही, तर जगून काय फायदा; हा विचार करून आंदोलनात गेलो'
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी, पंजाबहून
'ये हमारी नसलों-फसलों का सवाल था. इसलिए हमने भी बॉर्डर पर जाने का फैसला किया'
'जर आमची जमीनच गेली, तर जिवंत राहूनही काय उपयोग? एकतर जीव जाईल किंवा काळे कायदे रद्द होतील, हा निश्चय करूनच आम्ही गेलो होतो.'
पंजाबमधल्या अमृतसरजवळच्या दोन छोट्या गावातल्या दोन महिला...दोघींचंही नाव सरबजित कौर. या दोघीही जणी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आपलं सगळं काही शेतीवरच अवलंबून आहे, त्यामुळे ती टिकवायची असेल तर पुढं आलंच पाहिजे, या जाणीवेतून त्या आंदोलनासाठी बाहेर पडल्या होत्या.
पंजाबमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने फिरताना तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एखाद्या गावाला भेट द्यायची, या लोकांकडून आंदोलनातले त्यांचे दिवस कसे होते हे जाणून घ्यायचं असं ठरवलं होतं.
एखादं असं कोणतं गाव आहे का जिथे जाता येईल, असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळालं- पंजाबके किसी भी पिंड (म्हणजे गाव) में जाओ. ऐसा कोई पिंड नहीं जहाँ से आंदोलन के लिए कोई गया नहीं हो.
पंजाबमध्ये क्वचितच एखादं गाव असेल जे या आंदोलनात सहभागी झालं नव्हतं.
आंदोलनात ज्या गावातून जवळपास प्रत्येक घरातून एक व्यक्ती गेली होती, अशा गावांपैकी कलानौर आणि जसरौर ही दोन गावं. एक सरबजित कौर होत्या कलानौर गावातल्या आणि दुसऱ्या सरबजित कौर होत्या जसरौरमधल्या. एकीच्या घरी वीस-पंचवीस एकर शेती, तर दुसरीच्या मालकीची चार एकर जमीन. पण दोघींचाही निश्चय सारखाच होता...कृषी कायद्यांना विरोध करायचा, आपला अधिकार मिळवायचा.
'जमीन गेली तर जगून तरी काय उपयोग होता?'
जसरौर गावातल्या छोट्या चणीच्या सरबजित यांच्याकडे पाहिल्यावरच त्यांनी मातीत केलेल्या कष्टांचा अंदाज येत होता.
गावातलं अगदी साधंसुधं घर. अंगणाच्या पलिकडे आडोसा लावून केलेलं स्वयंपाकघर. गॅस नाही, चूलच. कोंबड्या, ससे, दोन कुत्री, पिंजऱ्यात काही पक्षी...असा सगळा बारदाणा होता. कष्टकरी, शेतकरी कुटुंब.
पण हे सगळे जण चक्क स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात गेले होते. स्वतः सरबजितही ट्रॅक्टर चालवतात. बरं या ट्रॅक्टरचं मॉडेलही 1983 सालातलं. जेव्हा आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन जायचं ठरलं तेव्हा सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं.
त्या सांगत होत्या, "गावाचे सरपंच, इतर लोक म्हणत होते, तुमचा हा ट्रॅक्टर पोहोचणार का? पण आमचा ट्रॅक्टर पोहोचला. नुसता दिल्लीपर्यंत गेला नाही, तर जेव्हा दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च काढला, तेव्हा मी स्वतः ट्रॅक्टर चालवत गेले होते."
गावातून जेव्हा आंदोलकांचा पहिला गट गेला होता, तेव्हा सरबजित यांच्या सोबत त्यांचे पती निरंजन सिंहही गेले होते. पण ते दोन महिन्यांनी परत आले. नंतर त्यांचा मुलगाही काही दिवसांसाठी आंदोलनात आला आणि मग परत गेला. स्वतः सरबजित मात्र पाच महिने आंदोलनात थांबल्या होत्या.
माझी तब्येत बिघडली, अशक्तपणा आला म्हणून मी परत आले. नाहीतर आंदोलन संपेपर्यंत परत येण्याचा माझा विचार नव्हता असं त्या सांगत होत्या.
हे आंदोलन एवढं महत्त्वाचं का वाटत होतं, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, "जमीनच आमच्यासाठी सगळं काही आहे. शेती नसेल, तर जिवंत राहूनही काय फायदा? त्यामुळेच या काळ्या कायद्यांचा निषेध करणं गरजेचं होतं. एकतर जीव जाईल किंवा कायदे रद्द करून परत येऊ हेच आम्ही ठरवलं होतं."
गावातून आधी सरबजित यांच्यासोबत पंधरा महिला आल्या होत्या. नंतर तिथे दिल्लीच्या सीमेवर आंदोलक महिलांची संख्या वाढत गेली.
'मुलीच्या लग्नासाठी दहा दिवस परत आले'
सरबजित जेव्हा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या, तेव्हा त्यांच्या घरात मंगलकार्यही ठरलं होतं. 10 मार्चला त्यांच्या थोरल्या मुलीचं लग्न होतं.
अशावेळी आपण घरी असायला हवं, असं नाही का वाटलं?
या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं,"मी जेव्हा आंदोलनात गेले होते, तेव्हा माझ्या मनात एकदाही घराचा विचार आला नाही. मुलीच्या लग्नासाठी पण मी दहा दिवस आले, तयारी केली आणि लग्न लावून परत गेले.
माझ्या मुलींनी, मुलानं, नवऱ्यानंही मला खूप साथ दिली. त्यांनी एकदाही मला 'आता तू परत ये' असं म्हटलं नाही."
या सगळ्या दिवसांत तिथे असं रस्त्यावर राहताना काही अडचणी आल्या नाहीत का, म्हटल्यावर सरबजित यांनी खूप सहजपणे सांगितलं, "बाहेर पडलोय तर अडचणी येणारच. त्यांचा बाऊ करून कसं चालेल?"
पण काहीही झालं तरी ते दिवस माझ्यासाठी चांगलेच होते, आम्ही हवं ते मिळवूनच आलो, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.
कलानौरमधून गटागटानं जात होते लोक
जसरौरमधल्या सरबजित यांना भेटून नंतर दुसऱ्या दिवशी कलानौरमधल्या सरबजित यांची भेट घेतली.
त्यांच्या गावातून 24 नोव्हेंबर 2020 ला आंदोलनात सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांचा पहिला गट निघाला होता. वीस-बावीस ट्रॅक्टर ट्रॉलींसह तीनशेच्या आसपास लोक कलानौर आणि बाजूच्या गावातून निघाले होते.
सरबजित यांचे सासरे तेव्हा अंथरुणाला खिळून होते. मात्र, तरीही त्यांचे पती गुरिंदरपाल सिंह आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. ते सांगत होते की, 20-25 दिवस झाल्यावर लक्षात आलं की आंदोलन इतक्यात संपणार नाही. त्यानंतर आमच्या गावातून रोटेशननं लोक यायला लागले. गावातल्या महिलाही मागे राहिल्या नाहीत.
'हा आमच्या भविष्याचा प्रश्न होता'
"आम्ही विचार केला की, हा आमच्या भावी पिढ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपणही बॉर्डरवर जायलाच हवं. आमची शेतीच राहिली नाही, तर मुलाबाळांचं पुढं कसं होणार? म्हणून आम्ही आंदोलनात जाण्याचा निर्णय घेतला," सरबजित सांगत होत्या.
अगदी सुरुवातीला फक्त गावातले पुरुषच गेले होते. मग हळूहळू टप्प्याटप्प्यानं आलटूनपालटून लोक जायला लागले. कलानौरमधून दर दहा दिवसांनी एक बस तीस-चाळीस लोकांचा गट घेऊन जायची. ते आंदोलनात पोहोचले की तिथं असलेले लोक परत यायचे. हे चक्रच सुरू होतं.
महिलांसाठीही स्वतंत्र बस जायची.
"सकाळी दहाच्या सुमारास बस निघायची. रात्री उशीरा दिल्ली बॉर्डरवर पोहोचायची. आमचं कलानौर पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे प्रवास लांब पल्ल्याचा होता. त्रासही व्हायचा. लेकिन हम डटे रहे"
घरातले लोक जेव्हा आंदोलनात जायचे, तेव्हा मागे राहिलेल्या लोकांची काय व्यवस्था असायची? विशेषतः लहान मुलांकडे कोण पाहायचं? या प्रश्नाला उत्तर देताना सरबजित यांनी त्यांच्याच कुटुंबाचं उदाहरण दिलं. सरबजित यांना शाळेत जाणारी मुलं आहेत- मुलगा आणि मुलगी. त्या आंदोलनात जायच्या तेव्हा सासूबाई मुलांकडे लक्ष द्यायच्या. कधीकधी माझी नणंदही येऊन राहायची. मुलांचे वडीलही येऊन-जाऊन असायचेच.
सरबजित यांची सहा वर्षांची मुलगीही एकदा आंदोलनात गेली होती. अगदी ट्रॅक्टर ट्रॉलीतही ती झोपली होती.
आंदोलनात असं उघड्यावर, रस्त्यावर राहताना कधी असुरक्षित नाही का वाटलं, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं,"नाही. कधीही आम्हाला भीती वाटली नाही. हरियाणाच्या शेतकऱ्यांचा कँप आमच्याच बाजूला होते. ते आम्हाला सांगायचे की, तुम्ही झोपा, आम्ही आहोत. पण आम्ही बायकाही रात्रभर जाग्या राहायचो, पहारा द्यायचो."
सरबजित कौर यांची हिरवीगार शेतं दूरपर्यंत पसरलेली दिसत होती. त्यामुळे जेव्हा कुटुंबातले लोक आलटूपालटून आंदोलनात जायचे, तेव्हा ही शेती बघायचं कोण असाही विचार मनात आला.
'जेव्हा शेतीच्या कामाचे दिवस असायचे, तेव्हा पुरुष मंडळी परत यायची आणि आम्ही आंदोलनात थांबायचो. माझे दीर आंदोलनात गेले की त्यांची आणि आमची शेती माझे पती पहायचे. आम्ही आंदोलनात गेलो की ते आमची शेती पाहायचे.'
त्यावेळी बोलताना सरबजित यांनी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. इथला गहू हा एकाच पाण्यावर घेतला जातो. त्यामुळे एकदा पाणी दिलं की नंतर किरकोळ कामंच असतात.
सहा महिन्याच्या तयारीनेच गेलो होतो
शेतकरी आंदोलन किती दिवस चालेल हे माहीत नव्हतं, मग तयारी कशी केली होती? धान्य, पैशांची व्यवस्था काय होती? यावर दोघींचंही उत्तर एकच होतं- आम्ही सहा महिने तरी राहावं लागेल या तयारीनेच गेलो होतो.
गावांमध्ये जेव्हा आंदोलनाला जाण्यासंबंधी तयारी सुरु होती, तेव्हाच आम्हाला सांगितलं होतं की, आपल्याला दहा दिवस लागतील, पंधरा दिवस लागतील किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस लागतील. त्यामुळे तशाच तयारीने गेलो होतो.
गावातल्या प्रत्येक घरानं त्यांच्या परिस्थितीनुसार मदत केली होती. अगदी वीस रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत प्रत्येकानं पैसे दिले होते.
एकूणच या आंदोलनाचे दिवस कसे होते असं विचारल्यावर कलानौरमधल्या सरबजित यांनी एका शब्दांत उत्तर दिलं- बढिया.
"या आंदोलनानं आम्हाला दिलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले हक्क कसं मागायचे हे शिकवलं. आधी आम्ही पण घर-मुलंच सांभाळायचो. पण या आंदोलनानं आम्हाला जागृत केलं."
त्यांचं हे उत्तर ऐकल्यावर जाणवलं की, रद्द झालेले कृषी कायदे एवढंच या आंदोलनाचं फलित नव्हतं. पंजाबचा शेतकरी परत जाताना अजूनही काहीतरी कमावून गेला होता...व्यवस्थेविरोधात ठामपणे उभं राहण्याचं बळ त्यांना मिळालं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)