You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनुपमा एस. चंद्रन: हरवलेल्या बाळासाठी झगडणाऱ्या अविवाहित आईची कहाणी
हरवलेल्या बाळाचा शोध घेत असलेल्या एका आईच्या आंदोलानामुळे केरळमध्ये खळबळ आणि राजकीय वादळही निर्माण झालं होतं. अखेरीस या बाळाच्या जन्माच्या तब्बल 13 महिन्यांनंतर मंगळवारी (23 नोव्हेंबर) बाळ आणि आईबाबांची पुन्हा भेट झाली. सौतिक बिस्वास आणि अश्रफ पदन्ना यांचा याबाबतचा रिपोर्ट.
केरळ राज्यातलं एक अविवाहित जोडपं गेल्या 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ एका दत्तक संस्थेबाहेर त्यांचं हरवलेलं मूल परत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होतं.
कोसळणारा पाऊस आणि कॅमेऱ्यांच्या नजरांचा सामना करत हे जोडपं तिरुवनंतरपुरममध्ये या कार्यालयाबाहेर कशाचीही पर्वा न करता ठाण मांडून बसलं होतं. दिवसभर हातात फलक घेऊन आंदोलनानंतर रात्री हे दांपत्य रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या कारमध्ये आराम करत असे.
'माझं बाळ मला परत द्या', असे पोस्टर हातात धरून ही महिला आंदोलन करत होती. कुटुंबानं परवानगीशिवाय आपलं बाळ दत्तक देण्यासाठी संस्थेला दिल्याचा या महिलेचा आरोप आहे. तिच्या वडिलांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.
"आम्ही हा लढा सोडणार नाही. आम्हाला आमचं बाळ परत हवं आहे," या बाळाची आई 22 वर्षीय अनुपमा एस. चंद्रन यांनी सांगितलं होतं.
गेल्यावर्षी 19 ऑक्टोबर रोजी अनुपमा यांनी स्थानिक रुग्णालयामध्ये 2 किलो वजन असलेल्या बाळाला जन्म दिला होता.
22 वर्षांच्या अनुपमा यांनी सामाजिक बंधनं झुगारून लग्नाच्या बंधनात न अडकता विवाहित प्रियकर 34 वर्षीय अजित कुमार याच्या बाळाला जन्म दिला होता. अजित कुमार एका रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात.
अजित कुमार बरोबरचं नातं आणि गर्भावस्था यामुळं अनुपमा यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झालं होतं.
विवाहाशिवाय बाळाला जन्म देणं हे भारतात सहजपणे स्वीकारलं जात नाही. त्यात भारतीय जातव्यवस्थेचा विचार करता अजित कुमार हे अनुपमा यांच्या तुलनेत कनिष्ठ जातीतील (दलित) असल्यामुळं हे प्रकरण अधिक गंभीर बनलं. भारतामध्ये आंतरजातीय अथवा आंतरधर्मिय विवाहांकडेही वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं.
अनुपमा आणि अजित हे दोघेही भारतात प्रगतीशील मानल्या जाणाऱ्या मध्यमवर्गीय, पुरोगामी कुटुंबातले आहेत.
अजित आणि अनुपमा दोघांचीही कुटुंबं ही राज्यातील सत्ताधारी माकप या डाव्या पक्षांचे कट्टर समर्थक होते. केरळमध्ये पारंपरिकरित्या डाव्या पक्षांची मजबूत पकड आहेत.
बँकेचे व्यवस्थापक असलेले अनुपमा यांचे वडील हेदेखील स्थानिक नेते आहेत. तर त्यांचे आजी-आजोबा हे व्यापारी संघटनांचे नेते आणि आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य (नगरसवेक) होते.
अनुपमा यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली आहे. महाविद्यालयातून विद्यार्थी संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तर त्यांचे प्रियकर अजित हे पक्षाच्या युवा संघटनेचे नेते होते.
दोघंही शेजारीच एकमेकांरोबर लहानाचे मोठे झाले. तसंच कम्युनिस्ट पक्षासाठी काम करताना त्यांची भेट झाली. तीन वर्षांपूर्वी त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली. अजित विवाहीत होते. पण तोपर्यंत पत्नीपासून विभक्त झालो होतो, असं त्यांनी सांगितलं. त्यांना लग्नापूर्वी मुलंही नाहीत. "आमचं पहिल्या नजरेतील प्रेम वगैरे नव्हतं. मैत्रीपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर आम्ही विचार करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला," असं अनुपमा म्हणाल्या.
गेल्यावर्षी अनुपमा यांना दिवस गेले आणि त्या दोघांनी बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. "बाळाला जन्म देण्याबाबत आमच्या मनात कधीही शंका नव्हती. आम्ही पालक बनण्यासाठी तयार होतो," असं त्या म्हणाल्या. बाळाला जन्म देण्याच्या दीड महिना आधी त्यांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यामुळं कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी प्रसुतीसाठी अनुपमा यांना घरी येण्यास सांगितलं आणि अजित यांच्याशी संपर्क ठेवण्यास मनाई केली.
प्रसुतीनंतर अनुपमा यांना रुग्णालयातून सुटी मिळाली तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना आणि बाळाला घरी नेण्यासाठी आले. तीन महिन्यांनी अनुपमाच्या बहिणीचं लग्न होतं. तोपर्यंत तिनं मैत्रिणीकडे राहावं आणि बहिणीच्या लग्नानंतर घरी यावं असं कुटुंबीयांनी तिला सांगितलं. घरातील नवजात बाळाला पाहून उपस्थित होणाऱ्या पाहुण्यांच्या प्रश्नाला त्यांना सामोरं जायचं नव्हतं.
त्यानंतर वडिलांनी बाळाला कारमधून दुसरीकडे नेले. बाळाला सुरक्षित ठिकाणी नेत आहे, मला त्याला नंतर भेटला येईल असं वडिलांनी सांगितल्याचा दावा अनुपमा यांनी केला आहे.
"माझ्या बाळाला मी तेव्हा अखेरचं पाहिलं. त्यानंतर माझा आनंदच जणू माझ्यापासून दूर गेला."
त्यानंतर त्यांनी अनुपमाला शहरापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजीच्या घरी नेलं. त्यापूर्वी काही महिने दोन घरांमध्ये त्यांना कोंडून ठेवण्यात आलं.
त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा त्या बहिणीच्या लग्नासाठी घरी परत आल्या, त्यावेळी त्यांनी अजित यांना कॉल करून त्यांचं बाळ बेपत्ता असल्याचं सांगितलं. आई-वडिलांनी त्यांचं बाळ दत्तक देण्यासाठी दिल्याचं अनुपमा यांनी सांगितलं. अखेर अनुपमा यांनी मार्च महिन्यात घर सोडलं आणि अजित आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर राहू लागल्या. त्या दोघांनी बाळाचा शोधही सुरू केला.
मात्र बाळाचा शोध ही त्यांच्यासाठी परीक्षा ठरली.
रुग्णालयात बाळाच्या वडिलांच्या नावाच्या जागी अनोळखी व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आलं होतं. पोलिसांनी सुरुवातीला बाळ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायला नकार दिला. त्याउलट अनुपमा यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अनुपमा घरून बेपत्ता झाल्याच्या तक्रारीचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ऑगस्ट महिन्यात पोलिसांना या दाम्पत्याला एक धक्कादायक बातमी दिली. अनुपमा यांनी स्वतः त्यांचं बाळ दत्तक देण्यासाठी दिल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं होतं.
यानंतर या दाम्पत्यानं सत्ताधारी पक्ष, मुख्यमंत्री, संबंधित दत्तक संस्था आणि राज्याचे पोलिस प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. केरळ राज्याचे सांस्कृतिक मंत्री साजी चेरियान यांनी एका वृत्त वाहिनीबरोबर बोलताना, "इतरांनी जे केलं असतं तेच अनुपमा यांच्या आई वडिलांनी केलं," असं वक्तव्य केलं. त्यावरही या दाम्पत्यानं चेरियान यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या महिन्यात अनुपमा आणि अजित यांनी वृत्त वाहिन्यांवर त्यांचे अनुभव सर्वांसमोर मांडले. त्यानंतर अखेर नेते आणि अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. विरोधकांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करत हा "ऑनर क्राईम"चा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. "राज्यातील यंत्रणेच्या सहाय्याने केलेला हा ऑनर क्राईमचा प्रकार आहे," असं केके रेमा या विरोधी महिला आमदार म्हणाल्या.
अनुपमा यांच्या वडिलांनी मात्र त्यांचं वर्तन योग्य असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या कुटुंबात असं काही घडलं, तर आपण ते कसं हाताळणार? अनुपमाला हवं होतं तिथं मी बाळाला पोहोचवलं. मुलाला मोठं करण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी तिच्याकडे काहीही नव्हतं. आम्हीही त्याचा सांभाळ करू शकत नव्हतो," असं त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं.
"बाळाच्या वडिलांना आधीची पत्नी आहे, असं अनुपमानं सांगितलं. मग मी माझी मुलगी त्यांच्याकडे कशी पाठवू शकतो? प्रसुतीनंतर तिची तब्येतही ठिक नव्हती. त्यामुळं बाळाची काळजी घेण्यासाठी मी बाळाला दत्तक संस्थेत ठेवलं."
अशा प्रकारे अवैध बाळाला कुटुंबात कसं ठेवता येईल, असंही जयचंद्रन म्हणाले. कम्युनिस्ट पार्टी आणि वकील यांचा सल्ला घेतल्यानंतर बाळाला दत्तक संस्थेकडे सोपवल्याचं ते म्हणाले. पत्रकारांनी तुम्हाला मुलीला काही सांगायचं आहे का, असं विचारलं. त्यावर, "मला तिच्याकडून काहीही ऐकायचं नाही," असं ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणानंतर उठलेल्या वादळानंतर पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यात अनुपमा यांचे आई-वडिल, बहीण, बहिणीचा नवरा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर चोरी, अपहरण, डांबून ठेवणे अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्या सर्वांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.
दत्तक संस्थेनं हे बाळ ऑगस्ट महिन्यामध्ये आंध्र प्रदेशातील एका दाम्पत्याला दत्तक दिले होते. बाळाला या दत्तक पालकांकडून परत आणण्यात आलं आहे. तसंच कोर्टानं या प्रकरणी डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते.
दत्तक पालकांकडून या बाळाला त्रिवेंद्रमला परत आणण्यात आलं. अनुपमा आणि अजित यांचा डीएनए या बाळाशी जुळल्याचं त्यांना मंगळवारी - 23 नोव्हेंबरला सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांना एका संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका बालकाश्रमात या बाळाला थोडा वेळ भेटताही आलं. पण आपल्या बाळाची अशी गैरमार्गाने 'तस्करी' करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करतच राहणार असल्याचं या जोडप्याने म्हटलंय.
हे वर्ष अतिशय कठीण गेल्याचं अनुपमा सांगतात. त्यांचं बाळ आता वर्षभरापेक्षा मोठं आहे.
"मी कोणाबरोबर राहायचं? आणि कुणाबरोबर बाळाला जन्म द्यायचा? हे निवडणं हा माझा अधिकार नाही का?" त्या विचारतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)