You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तथाकथित भक्त भारताचा पाकिस्तान करतील- जितेंद्र आव्हाड #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.तथाकथित भक्त भारताचं पाकिस्तान करतील -आव्हाड
"जेव्हा एक मुस्लीम मुलगी पीईसी कॉलेजमध्ये आली, तेव्हा तिला अनेक विद्यार्थ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांनी भगव्या रंगाचं उपरणं अंगावर घेतल्याचं दिसतंय. हे तथाकथित भक्त भारताचा पाकिस्तान करून सोडणार आहेत. हे राम,"
अशा शब्दांत महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून टीका केली आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी बुरखा घालून एका महाविद्यालयाच्या आवारात स्कूटीवर आल्याचं दिसत आहे.
स्कूटी पार्क करून ही मुलगी महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन 'जय श्री राम'च्या घोषणा देताना दिसत आहेत.
ही मुलगी पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर 'अल्ला हू अकबर' अशा घोषणा देताना दिसत आहे.
2. केंद्राने ट्रेन पाठवल्या तरी त्या रिकाम्या पाठवण्याची जबाबदारी तुमची होती- चंद्रकांतदादा
"पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे, कामगारांसाठी रेल्वे केंद्राने सोडल्या असतील तरी ती तुमची जबाबदारी होती की या रेल्वे रिकाम्या जातील. तसा विश्वास तुम्ही द्यायला हवा होता की लॉकडाऊन झाला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमचं पोट भरु, काळजी करु, हा कॉन्फिडन्स सरकारने मजुरांना दिला नाही, त्यामुळे राज्य सरकार दोषी आहे", असं भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. 'सकाळ'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रसारासंदर्भात कॉंग्रेसवर केलेल्या टीकेवरून सध्या राजकीय नेत्यांत टोलेबाजी सुरु आहे.
भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत.
3.अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात सात सैनिकांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमधील उंच शिखरांमध्ये हिमस्खलन होऊन सात जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अरुणाचल प्रदेशमधील कामेंग सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून खराब हवामान आणि जोरदार हिमवृष्टी होत आहे.
कामेंग सेक्टरच्या उंच भागात 6 तारखेला हिमस्खलनाची घटना घडली होती. या घटनेनंतर बचाव पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने सात जवानांचा बर्फाखाली अडकून मृत्यू झाला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टर हा चीनच्या सीमेलगत असल्याने या भागात लष्कराला सातत्याने गस्त घालावी लागते.
4.गुजरातमध्ये कोरोनाबळी 10000, मदत 82 हजारांना- काँग्रेसची भाजपवर टीका
"गुजरातमध्ये कोरोनाबळींची संख्या 10 हजारांच्या आसपास असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होत़े मात्र, प्रत्यक्षात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना मदतवाटपावेळी सुमारे 82 हजार जणांना लाभ देण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले त्यामुळे कोरोनाबळींची संख्या आठपटींनी कशी वाढली"?, असा सवाल करत काँग्रेसने तेथील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
कोरोनामुळे गुजरातमध्ये 10 हजारांच्या आसपास मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी राज्य सरकारने दिली होती़ त्यामुळे मृतांचे प्रमाण कमी असल्याबद्दल भाजप नेत्यांनी स्वत:ची पाठही थोपटून घेतली.
परंतु, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्यावर मदतीसाठी आतापर्यंत एक लाख दोन हजार 230 अर्ज दाखल झाल़े तसेच 87 हजार 45 जणांना मदत मंजूर करण्यात आली असून, 82 हजार 605 जणांना मदत वाटप करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या आकडेवारीचा दाखला देत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भाजपवर टीका केली़
5.हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'ने याबाबत बातमी दिली आहे.
दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मुंबई सत्र न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय हिंदुस्तानी भाऊपुढे उपलब्ध आहे.
राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विनंती पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यासाठी जात असल्याचं भाऊने जाहीर केलं. त्यासाठी त्यानं एक व्हिडिओ संदेश जारी करत तमाम मुलांनाही तिथं हजर राहण्यास सांगितलं.
सोशल मीडिया स्टार असलेस्या भाऊच्या या हाकेला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले.
मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत युट्यूबर - व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)