You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लता मंगेशकर अनंतात विलीन, भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांचे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बंदुकीच्या फैरींची सलामी देत लतादीदींना अखेरचा निरोप देण्यात आला.
लतादीदींचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या.
8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर आले होते. यावेळी त्यांनी लतादीदींच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
लतादीदींच्या अंत्यविधीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती शिवाजी पार्कवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान, आमिर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार जावेद अख्तर आणि इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लतादीदींचं अंत्यदर्शन घेतलं.
शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्याआधी लतादीदींचं पार्थिव 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं.
त्यानंतर सैन्य दल, नौसेना, वायुसेने दलातील शिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.
पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल
लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "लतादीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत पोहोचतायेत."
त्याचसोबत फडणवीस म्हणाले, "लतादीदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी म्हटली. इतक्या मोठ्या प्रमाणात गाणी म्हणण्याचा विक्रम नोंदवला. सगळ्या भाषांमध्ये त्यांची गाणी प्रसिद्ध होती. अनेक दशकं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारा हा आवाज कधी शांत होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. अर्थातच तो आवाज अजरामर आहे. शतकानुशतकं तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील."
"लतादीदी या उत्तम गायिका तर होत्याच, पण व्यक्ती म्हणूनही त्या अतिशय संवेदनशील होत्या. विशेषत: प्रचंड राष्ट्रभक्त असं कुटुंब आहे. लतादीदी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असीम श्रद्धा लतादीदींची होती. कुठल्याही राष्ट्रकार्यात आपलंही समर्पण असलं पाहिजे, अशा प्रकारच्या भावनेनं त्या जीवनभर कार्यरत होत्या," असं फडणवीस म्हणाले.
नितीन गडकरींनी 'या' शब्दात केली घोषणा
लतादीदींच्या निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी हे आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आले आणि रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊन लतादीदींच्या निधनाची माहिती दिली.
नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो."
महिन्याभरापासून सुरू होते उपचार
आठ जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
या अगोदर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांच्या तब्येत खालावली आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
लता दीदींच्या निधनाची माहिती देताना ब्रिच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं की, "कोव्हिडंचं निदान झाल्याने लता दीदी गेल्या 28 दिवसांपासून आजारी होत्या. अनेक अवयवांचं कार्य बंद पडल्याने सकाळी 8.12 वाजता त्यांचं निधन झालं."
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारत सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन केली होती विचारपूस
गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांनीही शनिवारी (5 फेब्रुवारी) ब्रीच कँडी रुग्णालयात जात लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
काही तासांपूर्वीच भेटल्या होत्या आशा भोसले
आपल्या मोठ्या बहिणीची तब्येत खालावलेली बघताच काल (5 फेब्रुवारी) आशा भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना लतादीदींची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
आशा भोसले म्हणाल्या होत्या, "लतादीदींसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. आम्हीही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे."
एका स्वर युगाचा अंत झाला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
"लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील," अशा भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लतादीदींना विकसित आणि सक्षम भारत पाहायचा होता - मोदी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"लतादीदींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसंच, नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, "चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या",
हेमा ते लता
मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं.
तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे 'लता' हे नाव त्यांना मिळालं.
त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.
लतादीदी त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना एकदा म्हणाल्या होत्या, "मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)