तामिळनाडू : शाळकरी मुलीचा मृत्यू, एकामागोमाग समोर येणारे व्हीडिओ आणि अनुत्तरीत प्रश्न

तामिळनाडूतील शाळकरी मुलीच्या मृत्यूच्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं आहे. या घटनेला धर्मांतराची पार्श्वभूमी असल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केला आहे. 'बीबीसी तामिळ'च्या मुरलीधरन काशीविश्वनाथन यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.

तामिळनाडूतील एका खाजगी ख्रिस्ती मिशनरी शाळेत बारावीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीने 9 जानेवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला आणि दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

ही शाळा तंजावर जिल्ह्यातील तिरुकट्टुपल्ली या ठिकाणी म्हणजे तामिळनाडूची राजधानी चेन्नई इथून सुमारे 355 किलोमीटरवर आहे.

सदर विद्यार्थिनी मूळची अरियलूर या जिल्ह्याची रहिवासी होती आणि आठवीपासून ती या शाळेत शिकायला आली. या शाळेच्याच वसतिगृहात ती राहत होती.

नऊ जानेवारीला या मुलीला उलट्या व्हायला लागल्या तेव्हा शाळेच्या प्रशासनाने तिच्या पालकांना कळवलं. तिला तिचे पालक गावी घेऊन गेले आणि स्थानिक रुग्णालयात तिच्यावर उपचार होत होते. तिची तब्येत आणखी खालावल्यावर तिला जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु या उपचारांचा फारसा उपयोग झाला नाही आणि 19 जानेवारीला मुलीचा मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी या प्रकरणासंदर्भात ट्वीट केलं की, "शाळेने धर्मांतराची सक्ती केल्यामुळे त्या मुलीने आत्महत्या केली."

या आरोपानंतर हा मुद्दा भडकायला सुरुवात झाली.

या ट्वीटसोबत अण्णामलाई यांनी एक व्हीडिओदेखील शेअर केला होता, त्यात तीच मुलगी बोलताना दिसत होती.

"माझ्या समोरच त्यांनी माझ्या आई-वडिलांना विचारलं की, मला ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू देण्याची त्यांची तयारी आहे का, आणि तसं झालं तर माझ्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली जाईल. यानंतर ते मला कायम ओरडायला लागले," असं ती मुलगी या व्हिडिओत बोलताना दिसते. या व्हीडिओची स्वतंत्र पडताळणी करता आलेली नाही.

या व्हीडिओत ती मुलगी एका ननचं नाव घेते आणि तिने आपल्याला धर्मांतराची सूचना केल्याचंही म्हणते.

विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदू संघटनांशी संबंधित लोकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला. पण पोलीस या व्हीडिओबाबत तपास करत असून त्याचा स्त्रोत काय आहे याबद्दल इतर काही संघटनांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

पोलीस काय म्हणत आहेत?

उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केलेल्या दाव्यांना पूर्णतः छेद देणारी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तंजावरच्या पोलीस अधीक्षक रावली प्रिया यांनी या संदर्भात माध्यमांसमोर निवेदन केलं होतं. "संबंधित मुलगी उपचार घेत असताना तिने दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिलेला आहे. या वेळी तिने धर्मांतराचा काहीही उल्लेख केलेला नाही. तसंच तिच्या पालकांनीसुद्धा याबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही. दंडाधिकाऱ्यांनीही अशी काही बाब नोंदवलेली नाही. त्यामुळे एफआयआरमध्ये धर्मांतचाराचा आरोप नोंदवण्यात आलेला नाही," असं त्या म्हणाल्या.

या विद्यार्थिनीने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबाची प्रत 'बीबीसी तामिळ'ने मिळवली. यात ती मुलगी म्हणते की, वसतिगृहाच्या अधीक्षकांनी तिला वारंवार शाळेच्या खतावणीचा तपशील लिहायची सक्ती केली आणि तिचा छळ केला, तसंच तिला अभ्यास करू दिलं नाही. कोणाच्या काही वस्तू गहाळ झाल्या तर अधीक्षक तिच्यावर संशय घ्यायची आणि तिला ओरडायची.

नाताळसाठी घरी जायला सुट्टी मिळाली नाही आणि शाळेच्या खर्चविषयक तपशिलाची तपासणी करायला लावली, म्हणून या विद्यार्थिनीने 9 तारखेला आत्महत्येचा प्रयत्न केला, असं जबाबात म्हटलं आहे.

आई-वडिलांकडून वेगळी तक्रार

दुसऱ्या बाजूला, ही मुलगी रुग्णालयातील पलंगावरून बोलत असल्याचा व्हीडिओ पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या संदर्भात तपास सुरू केला आहे. 'पॉस्को अधिनियमा'नुसार असा व्हिडिओ पसरवणं हा फौजदारी गुन्हा आहे.

दरम्यान मुलीच्या आईवडिलांनी आणखी एक तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. या मुलीवर धर्मांतराची सक्ती होत होती त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्रिची क्षेत्राचे महानिरीक्षक बालकृष्णन बीबीसीला म्हणाले, "इतर कामांसाठी मुलीचा छळ केला जात होता, अशी पहिली तक्रार तिच्या आईवडिलांनी केली होती, त्या आधारे वसतिगृहाच्या अधीक्षकाला अटक करण्यात आलं आहे. यासंबंधी तपास सुरू होता. आता मुलीच्या आई-वडिलांनी दुसरी तक्रार केली आहे, त्यात त्यांनी धर्मांतराच्या सक्तीचा उल्लेख केला आहे. त्याबाबतसुद्धा तपास सुरू आहे."

या संदर्भातील व्हीडिओ शेअर करणाऱ्यांविरोधात तपास केला जात असून विश्व हिंदू परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुसऱ्या व्हीडिओमुळे प्रकरणाला निराळं वळण

आता संबंधित मुलीच्या आईवडिलांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीसीआयडीकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विश्व

हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुथुवेल यांनी मुलीचा मृत्युशय्येवरील व्हीडिओ चित्रीत करून प्रसिद्ध केल्याचं मानलं जातं, तर त्यांनी स्वतःचा मोबाइल फोन पोलिसांच्या ताब्यात देऊन तपासात सहकार्य करावं, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर मुथुवेल यांनी त्यांचा मोबाइल फोन पोलिसांच्या ताब्यात दिला.

दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा आणखी एक व्हीडिओ प्रकाशात आला. आपण स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल ती मुलगी स्पष्टपणे बोलत असल्याचं या व्हीडिओत दिसतं.

"हॉस्टेलमधली सिस्टर कायम मला हिशेब लिहायला सांगायची. हे मी नंतर करते, असं सांगितलं तर ती ऐकायची नाही. ती मला पूर्ण हिशेब लिहायला लावायची. आधी हे काम करूनच मी स्वतःचं काम करू शकते, असं ती म्हणायची," असं ही मुलगी या व्हीडिओमध्ये म्हणताना दिसते.

"तुला टिकली न लावायची सक्ती शाळेने केली होती का, किंवा तसं दुसरं काही घडलं का?" असं व्हिडिओ चित्रीत करणारा मनुष्य त्या मुलीला विचारतो. त्यावर मुलगी म्हणते, "नाही, तसं काही तिथे करत नाहीत."

शिक्षण विभागाच्या तपासातून काय उघड झालं?

दुसऱ्या व्हीडिओनंतर आणखी गदारोळ उडाला असताना, जिल्हा शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीचा अहवाल सादर झाला आहे. हा अहवाल माध्यमांमधून प्रकाशित झाला आहे.

या अहवालात म्हटल्यानुसार, "गेल्या 10 वर्षांमध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी व मुख्य शिक्षण अधिकारी यांनी या शाळेची 16 वेळा थेट तपासणी केली आहे. कोणत्याही वेळी विद्यार्थ्यांकडून धर्मासंदर्भात काही तक्रारी आलेल्या नाहीत. ही शाळा एका अल्पसंख्याक समुदायाकडून चालावली जात असली, तरी तिथे शिकणारे बहुतांश विद्यार्थी हिंदू धर्माचे आहेत. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी कोणतीही धार्मिक मोहीम चालवलेली नाही."

दुसऱ्या व्हिडिओमध्ये संबंधित मुलीने आत्महत्येचं वेगळं कारण दिलं आणि शिक्षण विभागाच्या चौकशीचा अहवालही समोर आला, या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीविरोधातील संघटनांनी व राजकीय पक्षांनी धर्मांतराच्या आरोपांचा तीव्र निषेध केला आहे.

राजकीय लाभासाठी खोटे आरोप केल्याबद्दल भाजपने व इतर संघटनांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपचं तपास पथक आणि गावकऱ्यांची प्रतिक्रिया

दबावानंतरसुद्धा हा मुद्दा सोडून देण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणी तपासासाठी चार सदस्यांचं एक पथक तयार केलं आहे. या पथकामध्ये मध्य प्रदेशातील खासदार संध्या राय, तेलंगणातील विजयाशांती, महाराष्ट्रातील चित्रा वाघ आणि कर्नाटकातील गीता विवेकानंद यांचा समावेश आहे.

दरम्यान, ही शाळा ज्या मिशेलपट्टी भागात आहे, तिथल्या रहिवाशांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अर्ज सादर केला आहे. गावातील सर्व समुदायांमध्ये सध्या जे सौहार्द आहे त्याला अशा प्रकारच्या तपासामुळे बाधा पोचेल, त्यामुळे अशा तपासाच्या आम्ही पूर्णतः विरोधात आहोत, असं गावकऱ्यांनी या अर्जात म्हटलं आहे.

या प्रकरणासंदर्भात शाळेच्या व वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, ही शाळा अतिशय प्रतिष्ठित मानली जाते आणि धर्मांतराचे आरोप गलिच्छ राजकीय प्रचारतंत्राचा भाग आहेत.

अनुत्तरित प्रश्न

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीचं व्हिडिओचित्रण करणं विश्व हिंदू परिषदेच्या मुथुवेल यांना कसं शक्य झालं, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुथुवेल यांनी 4 व्हीडिओ तयार केले आणि पहिला स्वतःच प्रसिद्ध केला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा फोन तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतरच्या दिवशी दुसरा व्हीडिओ काही माध्यमांकडे पाठवण्यात आला.

आपल्याला वसतिगृहात काम करायला लावलं जात होतं, म्हणून आपण आत्महत्या करायचं ठरवलं, असं ती मुलगी या दुसऱ्या व्हीडिओत बोलताना दिसते.

पोलिसांनीच हा व्हीडिओ माध्यमांपर्यंत पोहोचवला, असा आरोप उजव्या संघटना करत आहेत.

विहिंपच्या पदाधिकाऱ्याची असहकाराची भूमिका

या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला असून व्हीडिओमध्ये ज्या ननच्या नावाचा उल्लेख झाला होता तिला अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सीबीसीआयडीकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे करण्यात आली आहे.

तपासादरम्यान मुथुवेल यांनी आपल्याशी सहकार्य केलेलं नाही, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे. या प्रकरणी निकाल तहकूब करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद, हिंदू मुन्ननी व भारतीय जनता पक्ष यांचा अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षांनी या प्रकरणात धर्मांतराचा संदर्भ असल्याचं नाकारलं आहे.

कायदातज्ज्ञ काय म्हणतात?

या खटल्याच्या कायदेशीर बाजूंविषयी बोलताना ज्येष्ठ वकील सुधा रामलिंगम बीबीसीला म्हणाल्या, "कायद्यानुसार मृत्युशय्येवरील जबाब दंडाधिकाऱ्यासमोर किंवा डॉक्टरसमोर द्यावा लागतो. आणि पीडित व्यक्ती अल्पवयीन असेल तर तिची ओळख वा छायाचित्र उघड करायचं नसतं." या प्रकरणी तिसऱ्याच व्यक्तीने व्हीडिओ तयार केला असला, तरी अशा प्रकारच्या व्हिडिओचित्रणाविषया कायद्यात काहीच म्हटलेलं नाही, असं त्या सांगतात.

"पण संबंधित मुलीची ओळख उघड होईल अशा प्रकारे व्हीडिओ प्रसिद्ध करणं हा निश्चितच गुन्हा आहे. त्याचा तपास होईल," असं त्या म्हणाल्या.

परंतु, हे सर्व प्रकरण गैर पद्धतीने हाताळल्याच्या वस्तुस्थितीकडे रामलिंगम निर्देश करतात. "संबंधित मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं असेल, तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला

हवी. तपास पूर्ण झाल्यावरच याबद्दल काही कळू शकेल. पण त्या आधीच या प्रकरणाकडे धार्मिक बाजूने बघणं योग्य नाही," असं त्या म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)