You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फाळणीनंतर दुरावलेल्या भावाला पाकिस्ताननं दिला व्हिसा
भारत पाकिस्तान फाळणीदरम्यान एकमेकांपासून विभक्त झालेले भाऊ मोहम्मद सिद्दीक आणि मोहम्मद सिका खान आता पुन्हा एकदा एकमेकांना भेटू शकणार आहेत.
नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयानं सिका खान यांना त्यांच्या भावाला भेटण्यासाठी व्हिसा मंजूर केला आहे.
व्हिसा मिळाल्यानंतर मोहम्मद सिका खान पाकिस्तानात नातेवाईकांना भेटण्यासाठी जाऊ शकतील.
याच महिन्यात दोन्ही भावांची करतारपूर दरबार साहीब मध्ये 74 वर्षांनंतर काही काळासाठी भेट झाली होती.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयानं मोहम्मद सिका खान यांना व्हिसा जारी केल्याचं सांगितलं आहे. करतारपूर साहीब 2019 मध्ये सुरू केल्यानं लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मदत होत असल्याचं, दोन्ही भावांची ही गोष्ट पाहून स्पष्ट होतं, असंही उच्चायुक्तालयानं म्हटलं.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त करत, इम्रान खान सरकारचे आभारी असल्याचं मोहम्मत सिका यांचे भाऊ मोहम्मद सिद्दीक म्हणाले. "आम्हाला खूप आनंद आहे. संपूर्ण गावालाच आनंद झाला आहे. ज्यांनी कोणी यासाठी मदत केली आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. आम्हाला एवढा आनंद आहे की, ते येतील तेव्हा आम्ही ढोल मागवू आणि संपूर्ण गाव गोळा होईल," असं ते म्हणाले.
वेगळं झाल्याचं दुःख
"सिका खान यांची सीडीए (चार्ज डी अफेयर्स) आफताब हसन खान आणि उच्चायुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांशी भेट झाली. त्यांनी सीडीए यांचे सहकार्यासाठी आभार मानले आहेत," असं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयानं सांगितलं.
हे दोघं भाऊ फाळणीच्या वेळी एकमेकांपासून विभक्त झाले होते. त्यावेळी सुरू असलेल्या गोंधळादरम्यान त्यांचं कुटुंब जालंधरहून पाकिस्तानसाठी रवाना झालं होतं. त्यांच्या वडिलांचं निधन झालं. सिद्दीक त्यांच्या बहिणीसह पाकिस्तानला पोहोचले तर सिका खान उर्फ हबीब खान त्यांच्या आईसह इथंच राहीले. नंतर त्यांच्या आईचं निधन झालं.
हे सगळं नेमकं कसं घडलं होतं, हेही त्यांना नीट लक्षात नाही. मात्र जवळपास 75 वर्षांनंतर करतारपूर कॉरीडोरद्वारे दोन्ही भाऊ पुन्हा भेटले. विभाजनामुळं अगणित कुटुंबांबरोबर घडलेल्या घटनांपैकी ही एक घटना आहे.
"एकमेकांपासून दुरावलेल्या दोन भावांची पुन्हा भेट होण्यासाठी माझा भाऊ मोहम्मद हबीब यांना पाकिस्तानचा व्हिसा द्यावा असी विनंती मी इम्रान खान यांना करत आहे. जीवनातील अखेरचे काही क्षण आम्ही एकमेकांबरोबर घालवले तर कदाचित आई-वडील आणि भावंडांपासून दूर गेल्याचं दुःख काही प्रमाणात तरी कमी होईल," असं पाकिस्तानात पंजाबच्या फैसलाबाद जिल्ह्याच्या चक 255 चे राहणारे मोहम्मद सिद्दीक यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहम्मद झुबेर खान यांच्याशी बोलताना म्हटलं होतं.
छोटीशी भेट
करतारपूरमध्ये या दोघांची भेट झाली तेव्हा नासीर धिल्लो हे त्या भेटीचे साक्षीदार होते. त्यांची ही भेट अत्यंत भावनिक होती असं धिल्लो यांनी सांगितलं. त्यावेळी जवळपास 100 जण त्याठिकाणी उपस्थित होते.
सगळ्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावलेले होते. काही तासांच्या भेटीनंतर दोघे भाऊ जेव्हा एकमेकांपासून दूर चालले होते, त्यावेळी पुन्हा एकदा सर्वांचे डोळे पाणावले होते.
दोन्ही भावंडांमध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच दोन वर्षांपूर्वी संपर्क झाला होता. त्यानंतर दोन वर्षात असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा हे दोघं एकमेकांशी व्हीडिओ कॉलवर बोलले नसतील.
मोहम्मद सिद्दीक यांना मोबाईल फोन वापरता येत नव्हता. पण त्यांची मुलं आणि गावातील इतर लोक त्यांना मदत करतात.
त्याचप्रमाणे, मोहम्मद हबीब यांनादेखील मोबाइल फोनचा वापर करता येत नव्हता. पण त्यांचे शीख मित्र त्यासाठी त्यांची मदत करतात. मोहम्मद हबीब एका शीख कुटुंबाबरोबरच राहतात.
एकमेकांपासून कसे दुरावले?
मोहम्मद सिद्दीक यांना कुटुंबापासून विभक्त झाल्याची घटना पूर्णपणे आठवते. त्यावेळी त्यांचं वय अंदाजे 10 ते 12 वर्ष होतं. तर मोहम्मद हबीब यांना त्यांचे आई, वडील, भाऊ-बहीण यांची नावं आणि सध्या ते ज्या परिसरात राहतात त्याठिकाणच्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींशिवाय काहीही लक्षात नाही. त्यावेळी त्यांचं वय अंदाजे दीड-दोन वर्ष असेल.
जालंधरमध्ये जागरावां हे आमचं गाव होतं, असं मोहम्मद सिद्दीक सांगतात.
"माझे वडील जमीनदार होते. आमच्या शेतांमध्ये खूप टरबूज पिकायचे हे मला चांगलं आठवतं. मला आमची आईदेखील आठवते," असं ते म्हणाले.
त्यांच्या आई लहान भाऊ मोहम्मद हबीबला घेऊन फूलवालामध्ये माहेरी गेल्या होत्या. त्या गावाचं नाव आजही फुलवाला असून ते भारताच्या बठिंडा जिल्ह्यात आहे, अशी आठवण ते सांगतात.
मोहम्मद सिद्दीक सांगतात की, फाळणीनंतर जे ताफे येत होते, त्यांच्याकडून थोडी फार माहिती मिळत होती.
"आमच्या काळात ओळखपत्र तर न्वहते. मात्र, मी पाकिस्तानच्या वयापेक्षा 10-12 वर्षांनी मोठा आहे. मी जीवनातील अनेक महिने आणि वर्ष भावाच्या आठवणीत घालवली. आईचा मृत्यू झाला याची खात्री पटली होती. बहीण आणि वडिलांचे मृतदेह पाहिले होते. पण भावाबाबत आयुष्यभर हीच खात्री होती, की माझा भाऊ जिवंत आहे, असं मोहम्मद सिद्दीक यांनी सांगितलं.
मोहम्मद हबीब त्यांच्या बालपण आणि भूतकाळाबाबत फार काही बोलायला तयार झाले नाही. "आई-वडील नसलेल्या मुलाबरोबर काय झालं असेल आणि काय होत असेल? माझी आई मला ज्या गावात सोडून मृत्यू पावली होती, तिथंच मी माझं आयुष्य घालवलं, एवढंच," असं ते म्हणाले.
मोहम्मद हबीब त्यांनी लग्न का केलं नाही यावरही काही बोलत नाहीत. "माझे सरदार मित्र आणि फुलवालाचे लोक हेच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांनी मला माझ्या भावाशी भेटवलं," असं ते सांगतात.
संपर्क कसा झाला?
मोहम्मद सिद्दीक सांगतात की, त्यांना भावाची खूप आठवण येत होती.
"माझं मन नेहमी मला सांगायचं की माझा भाऊ जिवंत आहे. मला त्याला भेटण्याची प्रचंड इच्छा होती. मी अनेक पीर, फकीर यांच्याकडेही गेलो. सगळ्यांनीच मला प्रयत्न केला तर भाऊ नक्की भेटेल असं सांगितलं," असं ते म्हणाले.
"संपूर्ण गावाला माझी कहाणी माहिती आहे. मी माझी कहाणी नंबरदार (गावातील प्रमुख) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद इशराकला सांगितली होती. मोहम्मद इशराक जवळपास दोन वर्षांपूर्वी नासीर धिल्लो यांच्यासह माझ्याकडे आला होता. त्यांनी मला सर्वकाही विचारलं. त्याचं रेकॉर्डींग केलं आणि ते प्रसारित केलं.
"त्यानंतर काही दिवसांनी मोहम्मद इशराक पुन्हा आले. माझा भाऊ भेटला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्या भावाशी माझं बोलणंही करून दिलं होतं," असं ते सांगतात.
फुलवालाचे डॉक्टर जगफीर सिंह सांगतात की, मोहम्मद हबीब किंवा हबीब खान यांना आम्ही सगळे सिका नावाने ओळखतो. त्यांचं खरं नाव कदाचित पूर्ण परिसरात फार कमी लोकांना माहिती आहे. त्यापैकी मी एक आहे. मी आमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून सिका यांची कहाणी ऐकली होती. सिका यांनीही मला स्वतः अनेकदा त्यांची कहाणी सांगितली होती," असं ते म्हणाले.
कॉपी - विभुराज
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)