पिलबरा : पृथ्वीवर तयार झालेली पहिली जमीन, इथेच जन्मला जगातला पहिला जीव

    • Author, डॅन अव्हिला
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

या जागेचं वय साडेतीन अब्जाहून जास्त आहे. तसं पृथ्वीचं वय त्यापेक्षा जास्त असेल मग हीच जागा खास का? तर याच जागेवर पृथ्वीची जीवसृष्टी जन्माला आली. पिलबरा नावाची ही जागा ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात आहे.

पहिल्यांदा या भागात कोणी आलं तर इथली एकाकी शांतता पाहून दडपूनच जाईल. ब्रिटनच्या दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या या भागात लोकसंख्या आहे फक्त 61 हजार.

जगातली सगळ्यात जुनी भूमी

वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे की पिलबराच्या भूमीत लोहयुक्त खडक आहेत. हे खडक पृथ्वीवर ऑक्सिजन तयार व्हायच्या आधी तयार झालेत. म्हणजे तेव्हा जेव्हा पृथ्वीचा तप्त गोळा थंड होत होता आणि भूमी तयार होत होती.

पिलबरा जगातली सगळ्यात आधी तयार झालेली भूमी आहे. जगातली इतर जमीन नंतर तयार झाली, तीही साधारण एकाच वेळेस.

साडेतीन अब्ज वर्षांत कितीही संकट आली आणि जगात उत्पात माजवणाऱ्या घटना घडल्या तरी पिलबराची भूमी आहे तशीच राहिली असं म्हटलं जातं.

"पिलबराच्या भूमीचं वैशिष्ट्य फक्त वय नाही तर इतक्या प्रचंड कालावधीनंतरही ही भूमी आहे तशीच राहिली हे आहे," मार्टीन व्हॅन क्रॅन्डोंक म्हणतात. मार्टीन न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष पिलबराचा अभ्यास केलेला आहे.

जगातली सगळ्यांत जुनी जीवसृष्टी

व्हॅन क्रॅन्डोंक यांच्यामते पिलबरा खडक इतके जुने आहे की त्यांच्यात किंवा त्यांच्या आसपास जीवाश्म सापडणं अशक्य आहे कारण त्या काळात पृथ्वीवर जीवसृष्टी असणं शक्यच नव्हतं.

तरीही त्यांच्यावर स्ट्रॉमटॉलोटिस म्हणजेच बॅक्टेरियासारख्या सुक्ष्मजीवांचे जीवाश्म सापडले आहेत.

1980 साली पिलबराजवळच्या मालबरा भागात या सुक्ष्मजीवांचे जीवाश्म सापडले. हे सुक्ष्मजीव पृथ्वीवर तेव्हा अस्तित्वात होते जेव्हा पृथ्वीवरच वातावरण कोणत्याही सजीवाला पुरक नव्हतं. इथे कोणताही सजीव जिवंत राहू शकत नव्हता.

स्ट्रॉमटॉलोटिस हे जीवाश्म प्रवाळांसारखे दिसतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन सोडत असतात.

या सूक्ष्मजीवांनी कोट्यवधी वर्ष ऑक्सिजन तयार केला तेव्हा सृष्टीत इतर जीव तयार होऊ शकतात असं म्हणतात.

पिलबराच्या जरासं दक्षिणेला गेलात की हॅमलिन पूल आहे. तिथे आजही जगातलं सगळ्यांत मोठा आणि 'जिवंत' सुक्ष्मजीव जीवाश्म आहे. इथे गेलात की खडकातून आजही सळसळ ऐकू येते कारण समुद्रातल्या या खडकात आजही सुक्ष्मजीव ऑक्सिजन तयार करत असतात आणि वातावरणात सोडत असतात.

मंगळावरही अशीच जीवसृष्टी असेल का?

2019 साली नासाच्या वैज्ञानिकांनी पिलबराचा बारकाईने अभ्यास केला. यात त्यांनी व्हॅन क्रॅन्डोंक यांचीही मदत घेतली. या अभ्यासाचा उद्देश होता नासाच्या मंगळ मोहिमांची तयारी करणं.

"प्राचीन काळी पृथ्वीवर जीवसृष्टी नक्की कशी होती हे त्यातल्या अनेकांनी पाहिलंच नव्हतं. मंगळावर गेल्यानंतर जर जीवसृष्टीचा शोध घ्यायचा असेल तर नक्की काय शोधायला हवं हे त्यांना अभ्यासायचं होतं," ते म्हणतात.

"हा अनुभव त्यांच्यासाठी डोळे उघडणारा ठरला. सुक्ष्मजीवांचे जीवाश्म कसे असतात त्यांना कळलं, त्यांचा पृष्ठभाग कसा असतो, ते कसे ओळखायचे हेही कळलं. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी शोधताना त्यांना या अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल," व्हॅन क्रॅन्डोंक म्हणतात.

पिलबरा फक्त पृथ्वीवरची सगळ्यात जुनी जमीन आहे म्हणून तिचा अभ्यास होतोय असं नाही, तर पिलबराचे खडक आणि मंगळावरचे खडक यांच्यात कमालीचं साम्य आहे. "या खडकांमध्ये जितकं लोहाचं प्रमाण आहे ते मंगळावरच्या खडकांसारखं आहे. यामुळेच पिलबराचे खडक लाल दिसतात आणि मंगळ ग्रहालाही 'लाल ग्रह' म्हणून ओळखलं जातं," व्हॅन क्रॅन्डोंक म्हणतात.

धोकादायक जागा

पिलबरा ही जागा धोकादायक आहे, नवखा माणूस तिथे गेला तर त्याची कंबख्ती ठरलेली. इथे फार सांभाळून पावलं ठेवावी लागतात पण तरीही ही जागा जगातल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे.

पिलबरा एका शुष्क वाळवंटासारखी भासत असली तरी तिथे जगातल्या अत्यंत सुंदर नॅशनल पार्कपैकी एक पार्क आहे.

अब्जावधी वर्षं दगडांची झीज होऊन इथल्या घळ्या, खिंडी, नाट्यमय भासणारे धबधबे आणि स्वच्छ पाहण्याचे डोह तयार झालेत. हे सगळं वसलंय खडकांच्या मधोमध. कार्जिनी असं या पार्कचं नाव आहे.

परस्परविरोधी जग

कार्जिनी नॅशनल पार्कचे गाईड पीट वेस्ट म्हणतात की इथले प्राणी, वनस्पती, वातावरण यांच्यात प्रचंड विविधता आहे आणि यामुळे पर्यटक आश्चर्यचकित होता.

या गोष्टी जणू काही परस्परविरोधी आहेत. तुम्ही वाळवंटातल्या डोंगरावरून खाली उतरता अचानक हिरव्यागार धरती नजरेला पडते.

"इथल्या खिंडींचं स्वतःचं असं वाचावरण आहे. डोंगरावर ज्या वनस्पती आहेत त्या खाली दरीत नाहीयेत," पीट म्हणतात.

वरती डोंगर कोरडाठाक आहे पण खाली घळीत बारा महिने पाणी असतं. याच पाण्यावर इथल्या वनस्पती, मासे, उडते कोल्हे आणि इतर प्राणी जगतात. इथे सरपटणारे प्राणीही खूप आढळतात. यात छोटे वाळवंटी ड्रॅगन आहेत आणि 5 मीटर लांब असणारे अजगरही.

महिला-पुरुषांच्या वेगवेगळ्या जागा

इथल्या मुलनिवासी लोकांसाठी कार्निजीला वेगळंच सांस्कृतिक महत्त्व आहे. या भागातली काही ठिकाणं ही फक्त महिलांसाठी आहेत तर काही फक्त पुरुषांसाठी.

"एखाद्या महिलेला मुलं हवं असेल तर तिने जावं अशी एक जागा आहे आणि तिला जुळी मुलं हवी असतील तर जायला दुसरी जागा आहे," पिलबरातल्या मुलनिवासी लोकांसोबत काम केलेल्या डॉ अमांडा हॅरिस सांगतात.

विसाव्याचं ठिकाण

संशोधकांना वाटतं की इथले मुलनिवासी असणाऱ्या बांजिमा लोकांसाठी कार्निजी ही जागा खास भेटण्याची जागा होती.

स्थानिक भाषेत कार्निजीचा अर्थ होतो, 'टेकडीवरचं ठिकाण'. बांजिमा लोक ही जागा गेले 30 ते 40 हजार वर्षं एकत्र भेटण्यासाठी या जागेचा वापर करत आहेत.

पिलबरातल्या भटक्या आदिवासींचं आयुष्य अवघड होतं. त्यांना जगण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागायचा. अशात कार्निजी त्यांच्यासाठी विसाव्याचं ठिकाण होतं. इथल्या गुहांमध्ये आश्रय घेता येत होता आणि पाण्याची सोय होती.

पीट म्हणतात, "कार्निजी म्हणजे लोकांनी एकत्र यायची जागा होती, इथे कधी बाजार भरायचा, कधी गप्पा रंगायचा, लग्न जुळायची. हे सगळं आजही होतं."

पिढीजात ज्ञान

पिलबरा पृथ्वीच्या जन्माची आणि जीवसृष्टीच्या अस्तित्वाची अनेक रहस्य लपलेली आहेत. या भागात सगळ्यात पहिले जीव कसे आणि का जन्माला आले हे रहस्यही त्यातलंच एक.

पिलबरा संशोधकांना नवनवीन धक्के देत असलं तरी इथल्या मुलनिवासींसाठी ही रहस्य नवीन नाहीत.

"आपण जे जीवन जगतो त्याची सुरुवात इथे झालीये, आणि हे आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे," यिंन्डजीबारांडी तसंच नागरलुमा जमातींचे जेष्ठ सदस्य आणि पिलबराचे टूर गाईड क्लिंटन वॉकर म्हणाले.

"आमचं पिढीजात ज्ञान आहे की माणसाचा जन्म इथलाच. त्यामुळे आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही बाहेरून कुठून आलो आहोत. या डोंगरदऱ्यांमध्ये आपल्याहीपेक्षा प्रगत शक्ती आहेत आणि त्यांनीच आपल्याला जन्माला घातलं. त्यांनीच आम्हाला ज्ञान दिलं."

जुने अवशेष

याच वर्षी वॉकर ओहोटी असताना फिरत होते आणि त्यांना एक प्राचीन दगड सापडला ज्यावर कांगारूची पावलं कोरलेली होती.

वॉकर यांना विश्वास आहे की पाण्याखाली सापडलेली अशा प्रकारची ही पहिलीच मानवी कलाकृती आहे. यामुळे आता संशोधकांनाही यात रस निर्माण झाला आहे.

वॉकर त्यांची थिअरी समजावून सांगतात. "हा दगड शेवटच्या हिमयुगानंतर कोरला गेला आहे. त्यावेळी पाण्याची पातळी आताच्या तुलनेत 100 मीटरपेक्षाही कमी होती. हा दगड साधारण 7 ते 18 हजार वर्षं जुना आहे."

"मी जेव्हा टूर घेऊन जातो तेव्हा मला जर वेळी काहीतरी नवं सापडतं. या ठिकाणी मी 100 वेळा आधी गेलो असलो तरी नवीन काहीतरी गवसतं. कधी कधी तर माझ्यासोबत आलेल्या पाहुण्यांना काहीतरी नवीन सापडतं जे मी आधी कधीही पाहिलेलं नसतं."

स्वप्नवत जागा

पिलबरा एक स्वप्नवत जागा आहे जिची मुळं प्राचीन आहेत. इथे ना गर्दी आहे, ना मोठमोठी कुंपणं, ना इमारती ना मॉडर्न जगाची कोणतीही चिन्हं.

"शोध घेणाऱ्यांची ही जागा आहे. मग ते फोटोग्राफर असतील, कलाकार, चित्रकार किंवा निसर्गप्रेमी," पीट वेस्ट म्हणतात.

"तुम्ही कार्जिनीच्या घळीमधून वाट काढत असाल तेव्हा ज्या दगडांना तुम्ही स्पर्श कराल ते जगाच्या आरंभीला तयार झालेले, सगळ्यांत जुने दगड असतील. जेव्हा तुम्ही याचा विचार कराल, या पृथ्वीच्या आदी-अंताचा विचार कराल तेव्हा तुम्हाला आपले प्रश्न, आपल्या चिंता, आपल्या महत्त्वकांक्षा, सगळं खुजं वाटायला लागेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)