You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत खरंच मुसलमानांचा गुलाम होता?
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बायडन या आडनावाशी संबंधित काही दस्तावेज आपण भारतातून आणले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सांगितलं.
यावर राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी हसत विचारलं, 'म्हणजे आपण नातलग आहोत का?' त्यावर पंतप्रधान मोदींनी हसत होकारार्थी उत्तर दिलं.
मोदी-बायडन भेटीची बातमी ट्विट करत पाकिस्तानातील एक विख्यात पत्रकार हमीद मीर यांनी लिहिलं की, "नरेंद्र मोदी यांनी बायडन यांना त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांशी निगडीत कागदपत्रं दिली, ही चांगली गोष्ट आहे. भारतीय पंतप्रधानांना भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचे अरब सत्ताधाऱ्यांशी असणारे नातेसंबंधसुद्धा शोधता येतील आणि त्याबद्दलही त्यांना अभिमान बाळगता येईल."
असाच एक प्रसंग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान फेब्रुवारी २०२०मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले, तेव्हा झालेल्या पत्रकार-परिषदेत इम्रान अभिमानाने म्हणाले की, 'तुर्कस्तानी लोकांनी भारतावर सहाशे वर्षं राज्य केलं होतं.'
इम्रान खान पुढे म्हणाले, "तुर्कस्तानशी आमचं नातं अनेक शतकांपासून आहे, असं आमची जनता मानते, त्यामुळे तुमच्या (तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष) येण्याने आम्हाला विशेष आनंद झाला आहे. तुर्कस्तानी लोकांनी सहाशे वर्षं भारतावर राज्य केलं होतं."
ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जॉर्ज बायडन या नावाची कोणीतरी व्यक्ती कॅप्टन होती, असं आपल्याला कळल्याचं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले होते.
दुसऱ्या बाजूला मध्ययुगातील मुस्लीम राज्यकर्त्यांना इम्राना खान यांनी अभिनाने तुर्कस्तानी संबोधलं.
खोटा अभिमान आणि आपलेपणा
पाकिस्तानी इतिहासकार मुबारक अली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, गतकालीन गोऱ्या राज्यकर्त्यांविषयी भारतीय नेत्यांनी असा आपलेपणा दाखवणं किंवा मध्ययुगीन मुस्लीम राज्यकर्त्यांविषयी पाकिस्तान्यांमध्ये किंवा मुस्लीम समुदायातील एका वर्गामध्ये दिसणारी अभिमानाची भावना अस्वस्थकारक आहे.
मुबारक अली म्हणतात, "आम्ही भारतावर एक हजार वर्षं राज्य केलं, असं कोणी मुस्लीम माणूस म्हणणार असेल, तर तो स्वतःला भारतातला मानत नाही, असं हिंदू व्यक्तीला वाटणारच. गतकालीन राज्यकर्त्यांविषयीच्या या अनाठायी अभिमानामुळेच मुस्लीम परके आहेत, असं म्हणणं हिंदूंना सोपं जातं."
"मध्ययुगातील मुस्लीम राजवटी सर्वसामान्य मुस्लिमांच्या नव्हत्या, तो एक सत्ताधारी वर्ग होता, हे मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. मुस्लिमांनी शेकडो वर्षं तुमच्यावर राज्य केलं, असं म्हणताना त्यांनी हिंदूंवर दडपशाही केली, असाच सांगण्याचा अर्थ असतो."
"आपल्यावर प्रचंड जुलूम केलेल्या इंग्रजांमध्येसुद्धा ही गोष्ट आता अभिमानाची राहिलेली नाही, आणि मुस्लीम राज्यकर्त्यांनी तर भारताला आपलं मानलं होतं. त्यांनी इथलीच भूमी त्यांची मानली. अशा मुस्लीम राज्यकर्त्यांविषयी कट्टर मुस्लिमांनी अभिमान बाळगणं हिंदूंनी डिवचण्यासारखं होतं. पाकिस्तानी शाळांमधील क्रमिक पुस्तकं पाहिली, तर त्यात सर्व मुस्लीम राज्यकर्ते शूर असतात आणि हिंदू त्यांच्या समोर शरणागती पत्करतात, असंच लिहिल्याचं दिसतं. पण हे खरं नाही."
"पाकिस्तानातील पुस्तकं हिंदू व भारत यांच्याविषयी तिरस्काराची भावना निर्माण करतात. इथल्या सत्ताधाऱ्यांना वाटतं की, मध्ययुगीन मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्यातले होते आणि त्यांनी हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिली. इथल्या क्षेपणास्त्रांची आणि शस्त्रास्त्रांची नावं पाहा- गझनी, घोरी, गझनवी, अशी. अशी मानसिकता उजव्या हिंदू राजकारणासाठी ऊर्जा पुरवत असते आणि त्यामुळे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचं जगणं दुर्धर होतं," असं मुबारक अली सांगतात.
भारत १२०० वर्षं पारतंत्र्यात होता?
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ११ जून २००४ रोजी लोकसभेला पहिल्यांदा संबोधित करत होते. या पहिल्याच भाषणात मोदी म्हणाले, "बाराशे वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे अस्वस्थ व्हायला होतं. अनेकदा आपल्यापेक्षा उंच व्यक्ती भेटली, तर तिच्याशी मान उंचावून बोलण्याची ताकद आपल्याकडे नसते."
पंतप्रधानांच्या या विधानावरून अनेक प्रश्न एकाच वेळी उपस्थित झाले. भारत खरोखरंच बाराशे वर्षं गुलामगिरीत होता का? ब्रिटिश राजवटीआधीसुद्धा भारत गुलामगिरीत होता का?
आठव्या शतकात सिंधमधील हिंदूराजावर मीर कासीमने हल्ला केला (सन ७१२), तेव्हापासून १९४७ सालापर्यंत भारत गुलामगिरीत होता, असा पंतप्रधानांच्या उपरोक्त विधानांचा अन्वयार्थ होता. भारतातील इंग्रजांचा सत्ताकाळ सर्वसाधारणतः १७५७ ते १९४७ इतका, म्हणजे १९० वर्षांचा मानला जातो. या हिशेबाने भारताचा उर्वरित एक हजार वर्षांचा पारतंत्र्याचा काळ मुस्लीम राजवटींमधील होता.
भारत किती वर्षं पारतंत्र्यात होता? या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य भारतीय काय देतील?
भारतातील शालेय पुस्तकांनुसार, १७५७ साली प्लासीची लढाई झाली, त्यात बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव केला आणि भारत पारतंत्र्यात गेला. परंतु, आता भारताचा इतिहास बदलण्याविषयी बोललं जाऊ लागलं आहे आणि मध्ययुगीन मुस्लीम राज्यकर्ते आक्रमक होते व त्यांनी भारताला गुलामगिरीत ठेवलं असंही सांगितलं जातं आहे.
भारत खरोखर मुस्लीम राज्यकर्त्यांचा गुलाम होता का?
मध्ययुगीन भारताचे विख्यात इतिहासकार इरफान हबीब म्हणतात, "मध्ययुगाच्या विविध व्याख्या आहेत. एकोणिसाव्या शतकात सांप्रदायिक इतिहासलेखनाची सुरुवात झाली. इंग्रजांनी यासाठी पुढाकार घेतलाच, शिवाय हिंदू आणि मुस्लिमांनीसुद्धा यामध्ये हातभार लावला. भारतीय इतिहासाची धर्माच्या आधारे वाटणी करणं, ही काही नवीन गोष्ट नाही. भारत हा ब्रिटिश राजवटीचा गुलाम होता, असं स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित लोक म्हणत होते. तर, दुसरीकडे हिंदुत्ववादी लोक तेराव्या शतकापासून किंबहुना त्याही आधीपासून पारतंत्र्य सुरू झाल्याचं म्हणत होते."
"इश्तियाक हुसैन कुरेशी यांच्यासारखे मुस्लीम इतिहासकार मध्ययुगीन कालखंडाला मुस्लीम राजवटीचा काळ मानतात. आपण संपूर्ण भारतावर राज्य केल्याचं मुस्लीम लीगचे लोकही म्हणतात. इतिहासाची अशी व्याख्या दोन्ही बाजूंनी केली जाते आणि अस्सल राष्ट्रवादी या व्याख्यांचं खंडन करत असतात."
"मध्ययुगातील अनेक राज्यकर्त्यांचा जन्म परदेशात झाला, पण त्यांनी स्वतःला भारतीय भूमीमध्ये रुजवून घेतलं होतं. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचं म्हणणं असं होतं की, ब्रिटिश राजवटीपूर्वीच्या मुस्लीम राज्यकर्त्यांचा कालखंड पूर्णतः वेगळा होता, कारण इंग्रज भारतातील संपत्ती बाहेर घेऊन जात होते, तर मुस्लीम बादहशांनी भारतातील संपत्ती भारतातच ठेवली."
"आर. सी. दत्त आणि दादाभाई नवरोजी यांच्या लेखनातसुद्धा ही मांडणी दिसते. इथेच स्थायिक झालेले राज्यकर्ते आणि इथली संपत्ती आपल्या देशात घेऊन जाणारे राज्यकर्ते यांच्यातील तफावत दोन्ही बाजूचे सांप्रदायिक लोक विसरून जातात," असं इरफान हबीब सांगतात.
"आर. सी. मुजुमदार यांच्यासारखे इतिहासकार भारतातील मुस्लीम राजवटीला अन्याय्य मानतात, पण हे त्यांनी तथ्यांच्या आधारेच मांडलं. सर्व गोष्टी तथ्यांच्या आधारानेच मांडण्याच्या या भूमिकेमुळे आर. सी. मुजुमदार यांना गंभीर इतिहासकार मानलं जातं. त्यांची ही तथ्यं इतर इतिहासकारसुद्धा स्वीकारतात. पण तुम्ही निवडलेल्या तथ्यांव्यतिरिक्तसुद्धा काही तथ्यं असतात. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९५०च्या दशकापासून जो इतिहास सांगायला सुरुवात केली तो पूर्णतः वेगळा होता."
इरफान हबीब पुढे म्हणतात, "हा इतिहास तथ्यांबाबत बोलत नाही. काय घडलं, हा त्यांच्या लेखी इतिहास नाही. काय घडायला हवं होतं, याला ते इतिहास मानतात. भारतीय राजकारणात येत्या काळामध्ये हे सर्वत्र पाहायला मिळेल. पाकिस्तानात आपण हे पाहिलं आहे. पाकिस्तानात तक्षशिला आणि मोहेन्जोदारो या ठिकाणांचा इतिहास पुसून टाकण्यात आला आहे."
भारतीय इतिहासाचे तीन कालखंड
भारतीय इतिहास सर्वसाधारणतः तीन कालखंडांमध्ये विभागला जातो: प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. गुप्त कालखंडानंतर प्राचीन भारताचा शेवट झाला आणि मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली.
प्राचीन भारतात हिंदू, बौद्ध व जैन धर्मांचा उदय झाला. मध्ययुगामध्ये मुघल कालखंड- म्हणजे १५२६ ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा काळ- सर्वांत महत्त्वाचा आहे.
औरंगजेबाने जवळपास संपूर्ण भारतावर राज्य प्रस्थापित केलं होतं. औरंगजेबानंतर मुघल राजवटीचा ऱ्हास सुरू झाला. अखेरचे मुघल बादशाह बहादूह शाह जाफर यांना १८५७ साली इंग्रजांनी ब्रह्मदेशात हद्दपार केलं.
बहादूर शाह जाफरनंतर संपूर्ण भारत इंग्रजांच्या हाताखाली आला आणि इथून आधुनिक कालखंड सुरू झाल्याचं म्हटलं जातं. अनेक इतिहासकार ब्रिटिशांच्या सत्ताकाळाला आधुनिक कालखंड मानण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. इरफान हबीब हेच नाव असणारे दुसरे एक इतिहासकार म्हणतात, "ब्रिटिशांची राजवट अत्याचाराच्या घटनांनी भरलेली होती, त्याला आधुनिक कालखंड म्हणणं हास्यास्पद आहे."
मध्ययुगीन भारताचे विख्यात इतिहासकार हरबन्स मुखिया म्हणतात, "ब्रिटिश लेखक जेम्स मिल याने पहिल्यांदा 'हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया' या पुस्तकातून भारतीय इतिहासाला सांप्रदायिक रंग द्यायचा प्रयत्न केला आणि ही प्रवृत्ती विभाजनवादी शक्तींना पसंत पडली. जेम्स मिलने प्राचीन भारताला हिंदू राजवट, मध्ययुगाला मुस्लीम राजवट आणि स्वतःच्या अन्याय्य राजवटीला आधुनिक भारत असं संबोधलं."
अल्लामा इक्बाल विरुद्ध सावरकर
मुस्लिमांना परके व मुस्लीम राज्यकर्त्यांना वसाहतवादी सत्ता मानण्यासंदर्भातील वाद नवीन नाही. या सगळ्याची सुरुवात इंग्रजांनीच केली आणि हे कथन हिंदू-मुस्लीम या दोन्ही बाजूच्या सांप्रदायिकतावादी पक्षांनी उचललं, कारण त्यांना स्वतःचं राजकारण चालवण्यासाठी यातून आधार उभा करता येत होता, असं मुखिया व हबीब यांसारखे इतिहासकार सांगतात.
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचं आंदोलन शिखरावर पोचलं होतं, तेव्हा अल्लामा इक्बाल मुस्लीम राष्ट्राबद्दल आणि सावरकर हिंदुत्वाबद्दल बोलत होते, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे.
अलाहाबाद विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक हेरंब चतुर्वेदी म्हणतात की, पंतप्रधानांनी संसदेत भारताच्या बाराशे वर्षांच्या पारतंत्र्याचा उल्लेख केला, तेव्हा त्यांचा निर्देश भारतातील मुस्लिमांकडे होता. "मुसलमान परके आहेत आणि त्यांच्या देशनिष्ठेवर शंका घेता येऊ शकते, असं पंतप्रधानांना सुचवायचं होतं," असं चतुर्वेदी म्हणतात.
परंतु, हा वाद स्वातंत्र्याआधीच सुरू झाला होता. अशी विधानं करणारं पंतप्रधान मोदी काही पहिली व्यक्ती नाहीत. स्वातंत्र्यानंतरही मुघलांना वासाहतिक शक्ती ठरवण्यासाठी प्रयत्न झाले होते.
भारताने रस्त्यांची व शहरांची नावं बदलायला सुरुवात केली. सुरुवातीला ब्रिटिश राज्यकर्त्यांनी दिलेली नावं बदलण्यात आली. बॉम्बेचं मुंबई झालं, कॅलकटाचं कोलकाता झालं, त्रिवेंद्रमचं तिरुअनंतपुरम झालं आणि मद्रासचं चेन्नई झालं.
यानंतर मुघल राज्यकर्त्यांनी दिलेली नावं बदलण्यात आली. अकबराने १५८३मध्ये ज्या अलाहाबाद शहराची स्थापना केली होती, त्याचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलं. हा बदल २०१८ साली सत्तेत आलेल्या राज्य सरकारने केला. मुघलसुद्धा इंग्रजांसारखे वसाहतवादी शक्ती होते, असा संदेश या नामबदलातून देण्यात आला.
पण अशा तऱ्हेचे बदल केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही झालेले आहेत. पाकिस्तानात हिंदू, शीख व बंगाली ओळख असलेल्या खुणा पुसण्याची मोहीम चालवण्यात आली.
पाकिस्तानमधील पुस्तकांमधून व दस्तावेजांमधून पूर्वक पाकिस्तानचं अस्तित्व पुसण्यात आलं. १९७१ साली हिंसाचाराची मालिका पार पडल्यानंतर बांग्लादेशाचा जन्म झाला, ही गोष्ट मोजक्याच पाकिस्तान्यांच्या लक्षात आहे.
कोलंबिया विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक मनान अहमद आसिफ यांनी 'द लॉस ऑफ हिंदुस्तान'मध्ये 'हिंदुस्तान'चं 'इंडिया'मध्ये झालेलं रूपांतर आणि वाढता बहुसंख्याकवाद यांचा उहापोह केला आहे. हे स्पष्ट करून सांगण्यासाठी आसिफ एक दाखला देतात-
हरदयाल नावाच्या एका तरुण क्रांतिकारकाने १९०४ साली लाहोरमधील फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजसमोर काही लोकांना गोळा केलं. यामध्ये त्यांनी त्यांचे मित्र व तरुण कवी मोहम्मद इक्बाल यांनाही बोलावलं.
त्या वेळी इक्बाल एका सरकारी महाविद्यालयात शिकवत असत. इक्बाल यांनी त्या सभेत त्यांची एक नवीन कविता ऐकवली. सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा, ही ती कविता होती. ही कविता सभेतील सर्वांनी उत्साहात गायली.
एका श्रोत्याने ती कविता ऐकून लिहिली आणि इत्तेहाद या तत्कालीन अग्रगण्य उर्दू नियतकालिकाकडे पाठवली. ही कविता १९०४ साली इत्तेहादच्या मे महिन्यातील अंकात छापून आली.
कालांतराने, १९२४ साली इक्बाल यांच्या पहिल्या कवितासंग्रहामध्ये ही कविता समाविष्ट करण्यात आली. 'हिदोस्तां' सर्वांचा असेल असं सांगितलं जाणाऱ्या चळवळीत इक्बाल यांचा सहभाग होता. त्यांच्या या कवितेमध्ये हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असणाऱ्या गंगा व हिमालय यांसारख्या तपशिलांचा वापर आहे.
लोक पहिल्यांदा हिंदुस्थानी होते आणि त्यानंतर हिंदू किंवा मुसलमान होते, याची पुष्टी इक्बाल यांच्या कवितेतून होत होती. इक्बाल यांच्या कल्पनेतला हा हिंदुस्थान शेकडो वर्षांपासून अस्तित्वात होता. त्यांची कविता इतकी लोकप्रिय झाली की शेवटी तिला लोककवितेचं स्थान प्राप्त झालं.
काँग्रेसच्या अधिवेशनांमधील उद्घाटन समारंभांमध्ये ही कविता म्हटली जाऊ लागली. स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांच्या ओठांवरील गीत म्हणून ही कविता वातावरणात गुंजत होती. महात्मा गांधींनासुद्धा ही कविता आवडली होती.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात 'हिंदुस्थानच्या संकल्पने'बाबत इक्बाल यांचं मतही बदललं. त्यांच्या कवितासंग्रहात 'तराना-ए-मिल्ली' या शीर्षकाची एक कविता समाविष्ट होती. या कवितेत इक्बाल यांनी मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला आहे.
त्यांना स्थानिक व वैश्विक अशा दोन्ही पातळ्यांवरील मुस्लीम समुदायाबद्दल चर्चा केली. 'तराना-ए-मिल्ली' या कवितेमधील एक ओळ अशी आहे- चीन ओ अरब हमारा, हिन्दुस्तां हमारा, मुस्लीम हैं हम, सारा जहाँ हमारा.
१९३०च्या दशकात इक्बाल यांचे विचार आणखी बदलले. त्यांनी ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या मंचावर अध्यक्षीय भाषण दिलं. या भाषणात त्यांनी भारतात मुस्लीम भारत निर्माण करण्याचा मुद्दा मांडला. त्यांनी भारताला 'जगातील सर्वांत महान मुस्लीम देश' असं संबोधलं.
इक्बाल या भाषणात म्हणाले, "भारतात इस्लामची सांस्कृतिक शक्ती एका विशिष्ट क्षेत्रातील मुस्लिमांच्या केंद्रीकरणावर अवलंबून राहील. मुस्लिमांची ताकद जास्त आहे अशा भागांमध्ये हे केंद्रीकरण व्हायला हवं. ब्रिटिश सेनेत व पोलिसांमध्येसुद्धा मुस्लीम आहे, त्यांच्या आधारावर इंग्रज राज्य करत आहेत. विशिष्ट क्षेत्रात मुस्लिमांचं केंद्रीकरण झालं, तर त्यातून भारत व आशिया यांची समस्या सोडवता येईल."
इक्बाल मुस्लिमांच्या वैश्विक समुदायाचा कैवार घेऊ लागले होते. १९४७ साली भारताची फाळणी झाली आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान स्थापन झालं. फाळणीनंतर लगेचच दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं.
कालांतराने १९७०च्या दशकात पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा झिया-उल-हक यांनी अल्लामा इक्बाल यांना 'राष्ट्रीय तत्त्वज्ञा'ची उपाधी दिली. इक्बाल १९३८ साली मरण पावले. मुस्लीम राष्ट्र पाहण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण झालं नाही.
हरबन्स मुखिया सांगतात, "जर्मनीला गेल्यानंतर अल्लामा इक्बाल पूर्णतः बदलले होते. ते जर्मनीमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गेले, तेव्हा तिथल्या राष्ट्रवादाच्या प्रभावमुळे त्यांच्या मनात इस्लामी राष्ट्रवादाचा विचार आला. जर्मनीला गेल्यानंतर इक्बाल पूर्णतः बदलले आणि 'सारे जहाँ से अच्छा हिंन्दुस्तां हमारा'वाला विचार त्यांनी सोडून दिला."
युरोपात गेल्यानंतर अल्लामा इक्बाल रूढिवादी मुस्लीम झाले होते, असं मुबारक अली यांनाही वाटतं.
मुस्लिमांच्या एकनिष्ठेवर शंका
परंतु, अल्लामा इक्बाल यांच्यापेक्षाही स्पष्ट भाषा वापरून विनायक दामोदर सावरकर हिंदुराष्ट्राबद्दल मांडणी करत होते. "भारताबाबत केवळ हिंदूंनाच एकनिष्ठा वाटू शकते," असं सावरकर उघडपणे म्हणत होते.
भारतात सावरकर हिंदुवर्चस्व आणि हिंदुत्व यांच्या राजकारणाचे कैवारी राहिले आहेत. हिंदुत्व या शब्दाचा वापर पहिल्यांदा त्यांनीच केला.
सावरकरांना लंडनमध्ये राजद्रोहाच्या खटल्यासंदर्भात अटक करण्यात आलं आणि १९११ साली त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानातील तुरुंगात पाठवण्यात आलं. १९२४ साली इंग्रज सरकारविरोधात राजकारण न करण्याचं अभिवचन आणि माफीनामा दिल्यानंतर सावरकरांची सुटका झाली. त्यानंतर १९३७ सालापर्यंत ते रत्नागिरीत राहिले. महात्मा गांधींच्या हत्याप्रकरणात सावरकर सहआरोपी होते, पण 'पुराव्यांअभावी' त्यांची सुटका करण्यात आली.
गांधीहत्या करणारा नथुराम गोडसे सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीने प्रभावित झालेला होता.
भारताला एक वैभवशाली हिंदुराष्ट्र करणं, हे सावरकरांचं स्वप्न होतं. त्यांनी १९०८ साली 'अमुचे प्रियकर हिन्दुस्थान' अशी कविता लिहिली होती.
ही कविता लिहिली तेव्हा सावरकर लंडनमध्ये होते. अल्लामा इक्बाल पाकिस्तानबद्दल बोलत होते, त्याचप्रमाणे सावरकर हिंदुस्थानाला सर्व देशांहून श्रेष्ठ म्हणत असल्याचं दिसतं. सावरकरांच्या कवितेतसुद्धा हिमालय आणि गंगा यांचा उल्लेख आहे. पण त्यांनी या कवितेत मुस्लीम व ब्रिटिश यांना परके व वसाहतवादी शक्ती संबोधलं आहे.
पहिल्या शतकात विक्रमादित्याकडून पराभव पत्करलेल्या ग्रीकांसाठी सावरकरांनी या कवितेत म्लेन्छ असा शब्दप्रयोग केला आहे. म्लेन्छ हा शब्द अशुद्ध व घाणेरड्या गोष्टीसाठी वापरला जातो. कालांतराने मुस्लिमांविषयी तिरस्कार दर्शवण्यासाठी हा शब्द वापरला जात आला आहे.
१९२३ साली सावरकरांचा 'इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व' हा लेख प्रकाशित झाला. मुस्लीम परके आक्रमक होते, हा विचार सावरकरांनी या लेखात विस्ताराने मांडला. या लेखात त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्व हा शब्द वापरला.
यात त्यांनी 'हिंदुस्थाना'ची कल्पना मांडली. सावरकरांनी 'हिंदुस्तान'ऐवजी 'हिंदुस्थान'ची बाजू घेतली. सावरकरांनी 'हिंदू' या शब्दाला 'स्थान' या संस्कृत शब्दाची जोड दिली, त्यातील 'स्तान' हा फारसी शब्द काढून टाकला. 'हिंदुस्तान' हे नाव परक्यांनी दिलं, हे सावरकरांना मान्य नव्हतं.
सावरकरांनी 'हिंदुत्व: हू इज अ हिंदू' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की, "मोहम्मदाचा जन्म व्हायचा होता आणि अरब लोकांना जग ओळखत नव्हतं, त्याच्या आधीपासूनच या प्राचीन देशाला बाहेरचे लोक हिंदू किंवा सिंधू म्हणून ओळखत होते. हे नाव अरब लोकांना दिलेलं नाही."
याच पुस्तकात सावरकर म्हणतात, "हिंदुस्थान म्हणजे हिंदूंची भूमी. हिंदुत्वासाठी भौगोलिक ऐक्य अत्यावश्यक आहे. हिंदू मूलतः इथला नागरिक आहे किंवा त्याच्या पूर्वजांमुळे हिंदुस्थानचा नागरिक आहे."
सावरकर हिंदुत्वाची मांडणी करण्यापूर्वी हिंदुस्थानची मांडणी करतात. याची सुरुवात ते भौगोलिक संदर्भात करतात. प्रादेशिक अखंडत्वानंतर ते धार्मिक व सांस्कृतिक मुद्द्यांची चर्चा करतात.
पाच हजार वर्षांपूर्वीच्या हिंदुस्थानबद्दल बोलून ते म्हणतात की, गझनीने हल्ला केला नसता, तर ही भूमी सौंदर्यासह शांततेमध्ये राहिली असती. वर्षानुवर्षं, दशकानुदशकं आणि शतकानुशतकं मुस्लीम आक्रमक आणि हिंदू प्रतिकार यांच्यात संघर्ष होत राहिला.
या आक्रमणांमुळे आणि त्यांना झालेल्या प्रतिकारामुळे हिंदुत्वाचा उगम झाला आहे, असं सावरकर म्हणतात. त्यांच्या मते, मुस्लीम राज्यकर्त्यांशी झालेला संघर्ष हिंदुराष्ट्राची व्याख्या पुरवतो.
सावरकर मुस्लिमांना कायमच परके मानत होते. 'हिंदुत्व: हू इज अ हिंदू' या पुस्तकात सावरकर लिहितात, "आपल्या मुस्लीम व ख्रिस्ती लोकांपैकी काही जण असे आहेत ज्यांना सक्तीने बिगरहिंदू धर्मात धर्मांतरित करण्यात आलं आहे. त्यांची पितृभूमीसुद्धा हीच आहे आणि त्यांच्या संस्कृतीचा बराचसा भागही असाच आहे. पण त्यांना हिंदू मानता येणार नाही. पण हिंदूंप्रमाणे त्यांचीसुद्धा पितृभूमी हिंदुस्थानच आहे, परंतु ही त्यांची पुण्यभूमी नाही. त्यांची पुण्यभूमी दूर अरबस्तानात आहे. त्यांच्या धारणा, धर्मगुरू, विचार व नायक या भूमीतून निपजलेले नाहीत. यामुळे त्यांची नावं आणि दृष्टिकोन मूलतः परदेशी आहेत. त्यांच्या प्रेमाचं विभाजन झालेलं आहे."
सावरकरांच्या या युक्तिवादावर इतिहासकार इरफान हबीब म्हणतात, "भगत सिंग नास्तिक होते आणि त्यांची कोणतीही पुण्यभूमी नव्हती. राष्ट्रवाद आणि धर्म यांच्यात अशी सरमिसळ करता येणार नाही. धर्म पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. धर्माचा प्रभाव कोणाच्याही राष्ट्रवादावर पडायला नको."
मुस्लिमांबद्दल असं मत केवळ सावरकरांनीच मांडलं होतं असं नाही, तर ब्रिटिश राज्याचे प्रशंसक इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनीसुद्धा अशाच प्रकारची मांडणी केली आहे.
जदुनाथ सरकार यांनी मुघल कालखंडाबद्दल केलेली मांडणी आजच्या भाजपच्या साच्यात पुरेपूर बसणारी हे, असं हरबन्स मुखिया म्हणतात.
जदुनाथ सरकार यांनी १९२८मध्ये मद्रास इथे एक व्याख्यान दिलं होतं. 'इंडिया थ्रू द एजेस' या मथळ्याखाली हे भाषण छापून आलं. यामध्ये जदुनाथ सरकार यांनी मुस्लीम सत्तेला परदेशी व सांस्कृतिक अर्थाने भिन्न मानलं.
या भाषणात सरकार म्हणाले, "भारतावरील मुस्लिमांचा विजय आधीपेक्षा पूर्णतः वेगळा होता. भारतीय लोकांसाठी मुसलमान पूर्णतः वेगळे होते आणि इथल्या लोकांनी कधीही त्यांना आपलं मानलं नाही. हिंदू व मुसलमान, आणि नंतर हिंदू व ख्रिस्ती एकत्र राहत असूनसुद्धा त्यांच्यात कधी सरमिसळ झाली नाही. मुसलमान आजही चेहरा मक्केकडे वळवून नमाझ अदा करतात."
सरकारने यांनी 'इंडिया थ्रू द एजेस'मध्ये लिहिलं आहे की, १२०० ते १५८० या काळात (म्हणजे अकबाराचं राज्य येण्यापूर्वी) मुस्लीम सत्ताधीश भारतीय भूमीवर सैन्यदलांच्या छावणीसारखे होते.
जदुनाथ सरकार यांचा हा युक्तिवाद अतार्किक असल्याचं हरबन्स मुखिया व हेरंब चतुर्वेदी म्हणतात. "बाबर आणि हुमायून मध्य आशियातून आले होते. अकबराचा जन्म उमरकोटमध्ये एका राजपूत राजाच्या घरी झाला होता. अकबर कधीही भारताबाहेर केला नाही. अकबरानंतर जे कोणी मुघल सत्ताधीश झाले, त्यांचा जन्म भारतातच झाला आणि त्यांनी कधीही भारताबाहेर पाऊलसुद्धा ठेवलं नव्हतं," असं मुखिया सांगतात.
भक्ती व सुफी संप्रदायांमुळे धर्मांमधील दुरावा संपुष्टात आला होता, असं हेरंब चतुर्वेदी म्हणतात. मुस्लीम कवी कृष्णभक्तीच्या कविता लिहीत होते, तर राजपुतांच्या घरी मुस्लिमांचे विवाह होत होते. याहून आणखी सरमिसळ काय हवी, असा प्रश्न चतुर्वेदी विचारतात.
मुस्लीम सत्ताधीशांनी हिंदूंवर अत्याचार केले होते का?
मध्ययुगातील मुस्लीम सत्ताधीशांना अनेक लोक आक्रमक म्हणतात. इतिहासाच्या अभ्यासिका आणि जहाँगीरवर 'इंटिमेट पोर्ट्रेट ऑफ अ ग्रेट मुघल' हे पुस्तक लिहिलेल्या पार्वती शर्मा सांगतात की, सत्तेसाठी दुसऱ्या राज्यावर आक्रमण करणं ही त्या काळी वेगळी गोष्ट नव्हती.
"मोर्यांचं राज्य अफगाणिस्तानापर्यंत होतं, त्या अर्थी तेसुद्धा आक्रमक होते. सत्तेचा विस्तार आणि सत्ता मिळवण्याची इच्छा, याकडे आपण कसंही पाहिलं तरी त्याचा विशिष्ट धर्माशी काही संबंध नाही."
मुस्लीम राज्यकर्त्यांवर अत्याचाराचे आरोप लावले जातात तेव्हा पहिल्यांदा जिझिया कराचा उल्लेख होतो. अकबराने जिझिया कर रद्द केला होता, पण औरंगजेबाने १६७९ साली हा कर पुन्हा सुरू केला. बिगरमुस्लिमांना हा कर द्यावा लागत असे.
औरंगजेबाचा हा निर्णय त्याच्या धार्मिक कट्टरतावादाचा पुरावा मानला जातो. त्याच्या या निर्णयामुळे राजपूत व मराठे अस्वस्थ झाले. काही इतिहासकारांचं असंही म्हणणं आहे की, मुघल राज्याविषयी हिंदूंमध्ये विरोध वाढत असल्यामुळे औरंगजेबाने जिझिया कर लावला आणि ते एक राजकीय पाऊल होतं.
जिझिया कर पुन्हा लागू करण्यामागे तत्कालीन राजकीय व आर्थिक पैलूंची भूमिका महत्त्वाची आहे, असं इतिहासकार सतीश चंद्रा यांनी लिहिलं आहे. जिझिया कर पुन्हा लागू झाल्यासंदर्भात अनेक समकालीन इतिहासकारंनी आपापली मतं मांडली आहेत.
सतीश चंद्र लिहितात, "औरंगजेबाच्या सत्ताकाळात अधिकृत इतिहासकार मानल्या जाणाऱ्या मोहम्मद साकी मुस्तैद खानच्या म्हणण्यानुसार, इस्लामी कायद्याचा प्रसार करावा आणि काफिरांशी त्यानुसार वर्तन करावं, असा हुकूम मुस्लीम राज्यकर्त्यांना देण्यात आला होता. याच कारणामुळे औरंगजेबाने दिवाळी अधिकाऱ्यांना आदेश दिला की, २ एप्रिल १६७८पासून कुरआनचं पालन केलं जावं आणि काफिरांकडून जिझिया कर वसूल केला जावा."
"शरियाचं ज्ञान असलेल्या औरंगजेबाने सत्तेत आल्यानंतर २२ वर्षांनी जिझिया कर का लावला, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तत्कालीन युरोपीय प्रवासी आणि व्यापारी कंपन्यांचे दलाल यांचं जिझियाबद्दलचं मत पूर्णतः वेगळं होतं," असं सतीश चंद्र लिहितात.
सूरतमधील एका इंग्रज कारखान्याचे प्रमुख थॉमस रोल यांनी १६७९मध्ये लिहिल्यानुसार, "जिझिया कर केवळ औरंगजेबाची रिकामी तिजोरी भरण्यासाठी लागू करण्यात आला नव्हता, तर गरिबांना मुस्लीम व्हायला भाग पाडणं हा त्यामागचा उद्देश होता."
औरंगजेबाने गरीब हिंदूंना मुस्लीम करण्यासाठी जिझिया लादला, हा तर्क सतीश चंद्र यांना पटत नाही. ते म्हणतात, "देशाची बहुतांश भागात ४०० वर्षं मुस्लीम राजवट असतानाही हिंदूंचा धर्म टिकून राहिला. या काळात बहुतांश सत्ताधीशांनी जिझिया कर वसूल केला होता. जिझिया परत लावल्याने काहीही परिणाम होणार नाही, म्हणजे गरीब हिंदू अशाने मुस्लीम होणार नाहीत, हे औरंगजेबालाही माहीत असणार."
"या करामुळे गरिबांना त्रास झाला हे उघड आहे, पण जिझियामुळे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याचा कोणताही पुरावा नाही. असं काही झालं असतं, तर मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दरबारी लोकांनी त्याचा मोठा विजय म्हणून कुठेतरी उल्लेख केला असता."
"या आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर असं म्हणता येतं की, औरंगजेबाने सत्तेत आल्यानंतर तेराव्या वर्षी आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा आधीच्या बारा वर्षांमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. परिणामी, सुलतान, बेगम आणि शहाजाद्यांच्या खर्चात कपात करण्यात आली. १६७६नंतर सातत्याने दक्षिणेला स्वाऱ्या होत असल्यामुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली होती. पूर्वेला आघाडीवरील युद्धासोबतच सिसोदिया व राठोड यांच्याशीही संघर्ष होत होते. या लढायांमुळे औरंगजेबाचा साम्राज्यविस्तारही झाला नाही आणि आर्थिक फायदाही झाला नाही."
या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या उपकरांवर देण्यात आलेल्या सवलतीचाही परिणाम औरंगजेबाच्या तिजोरीवर झाला होता. इस्लामी कायद्यामध्ये जे उपकर लागू करण्याची मुभा देत नाही, ते उपकर औरंगजेबाने रद्द केले, असंही काही लोक म्हणतात. या पार्श्वभूमीवर त्याने शरिया कायद्यानुसार जिझिया कर लादण्याचा पर्याय स्वीकारला.
इतिहासाचे अभ्यासक आणि धार्मिक राष्ट्रवादावर पुस्तक लिहिलेले राम पुनियानी म्हणतात, "संपूर्ण मध्ययुगीन कालखंडाकडे केवळ औरंगजेबाच्या संदर्भात पाहता येणार नाही. औरंगजेबाने हिंदूंकडून जिझिया कर घेतला, तसंच मुस्लिमांकडून जकातसुद्धा वसूल केली. जिझिया १.५ टक्के होता, तर जकात यापेक्षा जास्त होती. जिझिया व्यक्तिगत स्वरूपाचा कर होता. त्यातून लहान मुलं-मुली, महिला व वृद्धांना सूट होती. आधी अकबराने जिझिया कर रद्दच केला होता."
भारतीय इतिहास संशोधन परिषदेशी संलग्न असणारे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक उमेश अशोक कदम यांच्या म्हणण्यानुसार, मध्ययुगात मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले होते आणि जिझिया कर त्याच भेदभावाधारित राज्याचा दाखला आहे.
उमेश कदम म्हणतात, "भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचं आगमन सांस्कृतिक धक्का देणारं होतं. मध्ययुगीन कालखंड म्हणजे केवळ दिल्लीतील सुलतानशाही आणि मुघलांचा इतिहास नाही. आठव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत हिंदूंचीसुद्धा राज्यं होती आणि ती उत्तमरित्या सुरू होती. मुस्लीम राज्यकर्त्यांनी भारतीय भाषा पूर्णतः बाजूला सारल्या आणि सर्वांवर फारसी भाषा लादली. मुस्लीम राज्यकर्त्यांनी बिगरमुस्लिमांची श्रद्धास्थानंसुद्धा काबीज केली. हिंदू राज्यं ताब्यात घेणं हा मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दृष्टीने जिहाद होता."
स्वतंत्र भारतातसुद्धा अनेक लोक इंग्रजी भाषेला वासाहतिक भाषा म्हणतात, पण सर्व कारभार याच भाषेत होतो. वास्तविक इथल्या बहुसंख्य जनतेला ही भाषा कळत नाही. सत्तेची कायमच एखादी भाषा असते. मध्ययुगीन कालखंडात मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंना मुस्लीम होण्यासाठी भाग पाडलं होतं, असं उमेश कदम म्हणतात.
धर्मांतर
मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंना सक्तीने मुस्लीम केलं होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना हेरंब चतुर्वेदी म्हणतात, "धर्मांतरं नक्कीच झाली. यात काही शंका नाही. पण धर्मांतरं सम्राट अशोकाच्या कालखंडातसुद्धा होत होती. मोठ्या संख्येने हिंदूंना बौद्ध करण्यात आलं होतं."
"मध्ययुगामध्येसुद्धा तीन प्रकारांनी धर्मांतरं होत होती. एक तर लोकांना त्यांची जमीन वाचवण्यासाठी धर्म बदलावा लागला, काही जण सुफी पंथाच्या प्रभावाखाली मुस्लीम झाले, तर तिसरा प्रकार म्हणजे युद्धात हरल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोक मुस्लीम धर्म स्वीकारत होते. भारतात मुस्लीम राज्यकर्ते आले तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचा धर्मही आला, आणि त्यांच्या राजकारणामध्ये धर्मविस्ताराचाही समावेश होता. राज्यकर्त्याच्या धर्माचा प्रभाव तिथल्या जनतेवर पडतोच."
चतुर्वेदी पुढे सांगतात, "ब्रिटिश राजवटीमध्येसुद्धा ख्रिस्ती मिशनऱ्यांचं आगमन झालं आणि धर्मांतरं झाली. ख्रिस्ती लोक इथे एक हजार वर्षं राहिले असते, तर त्यांची भारतातील लोकसंख्या १५ टक्के झाली असती."
मुघलकाळामध्ये औरंगजेब हा सर्वांत निष्ठूर राज्यकर्ता होता, असं काही इतिहासकार मानतात. आर. सी. मुजुमदार राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय विद्या भवनने 'द मुघल एम्पायर' या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात संपूर्ण मुघल कालखंडावर विविध लेखकांनी लेख लिहिले आहेत. या पुस्तकाचं संपादन आर. सी. मुजुमदार यांनी केलं होतं.
या पुस्तकामागील भूमिका नोंदवताना मुजुमदार लिहितात, "अकबराचा अपवाद वगळता सर्व मुघल राज्यकर्ते कुख्यात आणि धर्मांत होते. अकबराने हिंदूंसोबत संवाद वाढवला आणि हिंदूंविरोधातील अनेक गोष्टी संपुष्टात आणल्या. हिंदूंवर इस्लामी कायदा थोपवण्यात आला होता. मुस्लिमांच्या तुलनेत त्यांचं सामाजिक व राजकीय स्थान खालचं ठेवण्यात आलं होतं. हिंदूंविरोधातील हा अन्याय मुघलांनी दिल्लीतील सुलतानांप्रमाणे सुरू ठेवला होता. पण औरंगजेबाच्या काळात हा अन्याय पराकोटीला पोचला. औरंगजेबाने जाणीवपूर्वक हिंदू मंदिर व मूर्ती नष्ट केल्या. अशा तऱ्हेचं सत्य आमच्या काही नेत्यांना रुचत नाही, पण प्रिय असो वा अप्रिय असो, सत्य सांगणं हे इतिहासकाराचं एकमेव लक्ष्य असायला हवं."
"एक प्रकारचं इतिहासलेखन राष्ट्रीय काँग्रेसच्या सावलीमध्ये झालं, त्यात इस्लामी राज्यकर्त्यांनी मंदिरं फोडली हे मान्य केलं जात नाही. मुस्लीम राज्यकर्ते धार्मिक बाबींमध्ये खूप सहिष्णू होते, असं दाखवायचा प्रयत्न या इतिहासामध्ये केला जातो. काही लोक तर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबासंदर्भात केलेलं संशोधन नाकारतात आणि औरंगजेबाचा बचाव करतात. एन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाममध्ये सर विल्यम एर्विन यांनी लेख लिहिला आणि औरंगजेबाने मंदिरं फोडल्याचा आरोप विवादास्पद असल्याचं त्यात नोंदवलं, ही एक रोचक बाब आहे," असं मुजुमदार लिहितात.
न्यूजर्सीस्थित रकर्स विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहासाच्या प्राध्यापिका ऑड्री ट्रूश्के यांनी 'औरंगजेब: द मॅन अँड द मिथ' या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत्या, पण बहुतेकदा लोक उत्साहात त्याला काळ्या अथवा पांढऱ्या रंगात रंगवू पाहतात आणि त्याची वैशिष्ट्यं बाजूला राहतात.
ट्रूश्के लिहितात, "आपण एकविसाव्या शतकात आहोत. स्वाभाविकपणे आपण इतिहासाकडे वर्तमानाच्या चष्म्यातून पाहतो, पण ते योग्य नाही. वर्तमानाच्या संदर्भात आपण इतिहासाकडे पाहिलं तर त्यातून चुकीचं आकलन होतं. औरंगजेबाला आजच्या हिंदू-मुस्लीम वादाच्या संदर्भात पाहणं चुकीचं आहे. काही लोक औरंगजेबाचा वापर फुटबॉलप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत आहेत आणि त्यातून भारतात मुस्लीमविरोधी विचार पुढे न्यायला मदत होते."
त्या म्हणतात, "वर्तमानकाळात औरंगजेबाकडे हिंदूंचा तिरस्कार करणारा धर्मांध इस्लामी राजा म्हणून पाहिलं जातं, पण एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून औरंगजेबाची ही प्रतिमा खरी नही. औरंगजेबाने उचललेली काही पावलं आजच्या काळात घृणास्पद मानली जातात. उदाहरणार्थ, हिंदूंची व जैनांची मंदिरं त्याने फोडली, बिगरमुस्लिमांवर जिझिया कर लादला, इत्यादी. पण औरंगजेबाने अनेक हिंदू व जैन मंदिरांना संरक्षणही पुरवलं होतं आणि मुघल दरबारातील हिंदूंची संख्याही त्याच्या काळात वाढली. औरंगजेब इस्लामी धर्मांध राजा असेल तर त्याने हिंदू व जैन मंदिरांना संरक्षण का पुरवलं, याचंही उत्तर त्याची अशी प्रतिमा करू पाहणाऱ्यांनी द्यायला हवं. सांप्रदायिक दृष्टिकोनातून औरंगजेबाची धोरणं समजून घेता येणार नाहीत. औरंगजेब एक व्यवहारी राजा होता आणि त्याला सत्तेची हाव होती, त्यामुळे त्यानुसार तो पावलं टाकत होता. हिंदूंचा तिरस्कार ही त्याची प्रमुख प्रेरणा नव्हती."
हिंदी साहित्याचा इतिहास लिहिणारे आचार्य रामचंद्र शुक्ल यांच्या मते, मध्ययुगीन कालखंडात हिंदूंमध्ये निराशेचं वातावरण होतं आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून भक्ती चळवळीची सुरुवात झाली. आचार्य शुक्ल यांनी 'गोस्वामी तुलसीदास' या पुस्तकात लिहिलं आहे की, "देशात मुस्लिमांचं साम्राज्य पूर्णतः प्रस्थापित झाल्यानंतर वीरश्री दाखवायला स्वतंत्र क्षेत्र उरलं नही. त्यामुळे देशाने पुरुषार्थ, बळ व पराक्रम यांच्याकडे पाठ फिरवून देवाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित केलं. हा देशासाठी निराशाजनक कालखंड होता, यात देव सोडून दुसरा काहीच आधार लोकांना दिसत नव्हता."
आचार्य शुक्ल यांचा हा युक्तिवाद हिंदीतील विख्यात समीक्षक हजारीप्रसाद द्विवेदी यांनी खोडून काढला आहे. शुक्ल यांचा युक्तिवाद खरा असेल, तर भक्ती चळवळीची सुरुवात दक्षिणेतून नाही, तर उत्तरेतून व्हायला हवी होती, कारण मुस्लीम राज्यकर्ते पहिल्यांदा उत्तरेतून आले, पण भक्ती चळवळ मात्र दक्षिणेला सुरू झाली, असं द्विवेदी यांनी नमूद केलं आहे.
मोदी सरकार इतिहास 'दुरुस्त' करण्याच्या प्रयत्नात आहे का?
अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं आहे. दिल्लीतील औरंगजेब मार्गाचं नाव बदलण्यात आलं आहे. मुगलसराय स्थानकाचं नावही दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री तिथल्या हैदराबाद शहराचं नाव बदलण्याची इच्छा राखून असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे, हल्दीघाटीमधील लढाईत राणा प्रताप विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
ही नावं मुस्लीम आक्रमकांनी ठेवली होती, त्यामुळे ती बदलणं गरजेचं आहे, असं भाजपचे नेते म्हणतात. इतिहासाची पुस्तकंही बदलण्याची मागणी होते आहे. भाजपची सरकारं भारतामधील बहुविधता नष्ट करण्याची खटपट करत असल्याचाही आरोप होतो आहे. मुघल भारतीयांचे नायक असू शकत नाहीत, आणि त्यांनी बांधलेल्या इमारती आपला वारसा असू शकत नाहीत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
उमेश कदम म्हणतात, "योग्य इतिहास लिहिला जायलाच हवा. मध्ययुगाचा इतिहास योग्य तऱ्हेने लिहिला गेलेला नाही. मध्ययुगीन कालखंडाकडे केवळ दिल्ली सुलतानशाही व मुघल राजवटी यांच्याच संदर्भात पाहिलं गेलं आहे. परंतु ते वस्तुस्थितीला धरून नाही. मध्ययुगीन इतिहासलेखनाचे स्त्रोत फारसी व अरबी भाषांमधील साहित्यात आहेत. त्या काळात भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या साहित्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं. मोदी सरकार इतिहास दुरुस्त करतं आहे. शहरांची व रस्त्यांची नावं बदलली जात असतील, तर ते लोकांच्या इच्छेमुळेच होतं आहे. एक लोकप्रिय नेता लोकांच्या इच्छापूर्तीसाठी काम करतो आहे."
कदम पुढे म्हणतात, "आपल्याला गुलामगिरीची प्रतीकं मोडून काढायला हवीत. लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा का फडकावला जातो, असा विचार मी लहानपणापासून करत आलो आहे आणि त्याचा मला खूप त्रासही व्हायचा. मला हे सगळं बरोबर वाटायचं नाही."
प्राध्यापक कदम भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्यसुद्धा आहेत. परिषद इतिहासावर काम करते आहे आणि मध्ययुगीन इतिहास दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे, असं ते म्हणाले.
लाल किल्ला मुघल बादशहा शहाजहानने बांधून घेतला होता, त्यामुळे ही इमारत भारताच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे, असं कदम यांना वाटतं. त्यांच्या मते, भारतीय इतिहासामध्ये डाव्यांनी तथ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि इतिहासलेखन केलं; आता त्यात बदल करण्याची गरज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)