You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणजितसिंह डिसलेंच्या फुलब्राईट स्कॉलरशीपवरून वाद का निर्माण झाला?
ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या अमेरिकेला PHD करिता जाण्यासाठीच्या रजेवरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात खुद्द राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्यस्थी करावी लागली आहे.
वर्षा गायकवाड यांच्या सूचनेवरून अखेर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून आवश्यक ती रजेची मंजुरी रणजितसिंह डिसले यांना मिळाली आहे. त्यामुळे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेला PHD साठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले गुरूजी यांना अमेरिकेत फुलब्राईट स्कॉलरशीप मिळाली होती.
ही स्कॉलरशीप 6 महिन्यांची आहे. त्यासाठी रणजितसिंह डिसले यांनी रितसर जिल्हा परिषद प्रशासनाकडे रजेचा अर्ज केला होता. पण याच अर्जावरून वाद निर्माण झाला.
रणजितसिंह डिसले गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने कामाच्या ठिकाणी गैरहजर राहत आहेत. त्यांची प्रतिनियुक्ती झालेल्या ठिकाणीही ते सतत गैरहजर असतात. त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, तसंच अर्जातही त्रुटी असल्याचं कारण देत डिसले यांचा अर्ज मंजूर करण्यात येत नव्हता, असा आरोप सोलापूरचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार केला होता.
काय होते प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांचे आरोप?
सोलापूरचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी विविध माध्यमांशी बोलताना डिसले गुरुजींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. किरण लोहार म्हणाले, "डिसले गुरुजींनी सोलापूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं असं तुम्ही म्हणता, पण त्यासाठी त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला हवं होतं. मुळात त्यांची जिल्हा परिषद शाळेत नेमणूक होती. त्यांची प्रतिनियुक्ती 'डायट' या ठिकाणी होती. आयटी विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची डायट येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. म्हणजे प्रत्यक्षात ते शाळेत नव्हते आणि प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर. मग जिल्हा परिषदांच्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावला असं कसं म्हणता येईल?
डिसले गुरुजी यांच्या रजेच्या अर्जाबाबत स्पष्टीकरण देताना डॉ. लोहार म्हणाले, "त्यांच्या रजेचा अर्ज त्रुटीच्या पूर्ततेसाठी परत पाठवलेला आहे. कारण ते परदेशात जाणार आहेत. त्यांनी PHD साठी रजेची मागणी केली आहे. परवा ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सहीसाठी आले होते. शिक्षण अधिकाऱ्यांना न भेटता ते थेट तिथे गेले. न भेटता म्हणजे माझी सही न घेता. या प्रक्रियेतून त्यांनी जायला हवं होतं. त्यामुळे CEO साहेबांनी त्यांना परत माझ्याकडे पाठवून दिलं.
त्यानंतर त्यांनी मला अर्ज दिला. पण त्यांच्या अर्जासोबत कोणतीच कागदपत्रे जोडलेली नव्हती. मी त्यांना त्यासंदर्भात विचारलं. कोणत्या विद्यापीठात PHD करणार आहात, त्यांचं प्रवेशपत्र, प्रॉस्पेक्टस, कोणत्या विषयाची PHD आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती विचारली असता त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. अशा प्रकारे सही मिळू शकत नाही.
दीड महिन्यापासून अर्जावर निर्णय नाही, असं ते म्हणत आहेत. पण अशा प्रकारे अर्जावरची कार्यवाही होत नसते. त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्याचं इतर कोणतंच कारण नाही. जिल्हापरिषदेत बहिःस्थ शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी कार्यासनच आहे. ती परवानगी देणं त्या टेबलचं कामच आहे. त्यांचा अर्ज फक्त कागदपत्रांमधील त्रुटींमुळे परत पाठवला होता. आपण कागदपत्रे जोडायची नाहीत, दीड महिने अर्ज पेंडींग ठेवला म्हणायचं, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न डॉ. लोहार यांनी विचारला.
प्रतिनियुक्तीच्या कालावधीत ते डायटमध्ये अनुपस्थित होते. त्याबाबतची चौकशी समिती नेमण्यात आली होती. हा सगळा प्रकार मी येण्यापूर्वीचा आहे. मी आल्यानंतर माझ्यासमोर ती फाईल आल्यामुळे या गोष्टी समजल्या. डायटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांचाही अहवाल आमच्याकडे आहे. कामाच्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यामुळेच ही चौकशी समिती नेमण्यात आली होती. हे सर्व तथ्य आम्ही जिल्हा परिषद CEO दिलीप स्वामी यांच्याकडे पाठवून देऊ. जिल्हा परिषद प्रशासन यावर योग्य ती कार्यवाही करेल.
या प्रकरणावरून माझ्यावर टीका होत आहे. पण टीका होते म्हणून मी त्यांना बोलवून अर्ज मंजूर करावा, असं नाही. डिसले यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यास त्यांचा अर्ज मंजूरही केला जाईल. पण राजीनामा देण्याचं त्यांचं नेमकं कारण काय, हे मला समजलं नाही. राजीनामा देणारा माणूस आधी सांगत नाही,असं डॉ. लोहार म्हणाले.
रणजितसिंह डिसले काय म्हणाले?
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं डिसले यांनी म्हटलं होतं.
डॉ. लोहार यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली असून त्यासाठी त्यांना तेथे जाण्यासाठी रजा हवी आहे.
शिक्षण विभागाकडे अर्ज करूनही रजा मंजूर होत नसल्याने आपण वैतागलो आहोत, त्यामुळे शिक्षक म्हणून काम करणार मात्र जिल्हा परिषद शिक्षक नोकरीचा राजीनामा देण्याची मनस्थिती आहे.
शिक्षण विभाग व प्रशासकीय व्यवस्था त्रास देत असल्याने व्यथित झाल्याने लवकरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले होते.
शिवाय, राज्यपालांच्या दौऱ्यावेळी त्यांच्याशी थेट संपर्क साधल्यामुळे इर्षेपोटी आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही डिसले यांनी म्हटलं. गेल्या दोन दिवसांत विविध माध्यमांमध्ये रणजितसिंह डिसले यांनी यासंदर्भात भूमिका मांडल्याचं दिसून येतं.
शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी
ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त डिसले गुरुजी यांच्याबाबतचा हा वाद गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये तसंच सोशल मीडियावर खूपच चर्चेत होता.
शैक्षणिक तसंच इतर क्षेत्रातून यासंदर्भात विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही उमटत होत्या.
अखेर, राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला रणजितसिंह डिसले यांचा रजेचा अर्ज मंजूर करण्याची सूचना केली.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली.
आपल्या ट्वीटमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात, "सोलापूरच्या परितेवाडी जि.प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितलं आहे."
त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या ट्विटवर रणजितसिंह डिसले यांनीही प्रतिक्रिया दिली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. या निर्णयामुळे फुलब्राईट स्कॉलरशीपची संधी हुकणार नाही, याचा आनंद आहे."
रणजितसिंह डिसले कोण आहेत?
रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक आहेत. हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण बार्शीमधल्याच सुलाखे विद्यालयामध्ये झालं. ते 2009 पासून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत.
युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना गेल्या वर्षी देण्यात आला होता.
या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात रणजितसिंह डिसले यांचंही नाव होतं.
या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 10 शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं आहे.
डिसले यांच्यासोबतच इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि यूकेमधील शिक्षक हे या यादीतल्या टॉप 10 मध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास 40 लाख रुपये मिळणार आहेत.
"माझ्या मते अंतिम यादीतल्या सगळ्या शिक्षकांकडं एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त एक निमित्त आहे. दुसरं म्हणजे 10 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरतील तेव्हा मोठा बदल घडेल," असं रणजितसिहं डिसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये या पुरस्काराचं वितरण झालं. त्यावेळी हॉलीवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले यांच्या नावाची घोषणा केली.
"हा पुरस्कार माझ्या एका कामासाठी मिळालेला नाहीये. यात अनेक वर्षांची मेहनत आहे. ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण, अशांत देशातल्या मुलांसाठीचं काम, तसंच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी केलेले प्रयत्न यात सामिल आहेत," असं डिसले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)