बिहारचे शिक्षक घडवत आहेत काश्मीरमध्ये IIT चे इंजिनीयर

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

काश्मीर म्हटलं की हिंसाचार, आंदोलनं, इंटरनेट-बंदी अशा गोष्टींचीच चर्चा होते. मात्र गेल्या काही महिन्यात काश्मीरची मुलं इंजिनियरिंग परीक्षांमध्ये चमकताना दिसत आहेत. या यशात चक्क बिहार कनेक्शन आहे.

मुबीन मसूदी या काश्मीरातील मित्राच्या बरोबरीने इंबिसात अहमद, सलमान शाहीद आणि सैफई करीम या बिहारच्या त्रिकुटाने इंजिनियरिंगचे क्लास सुरू केले. काश्मीरात अभियंत्यांचा टक्का वाढवण्यात या क्लासची भूमिका मोलाची ठरत आहे.

श्रीनगरच्या जवाहर नगरमध्ये राहणाऱ्या काजी फातिमा काही दिवसांपूर्वीच IIT ची मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र फातिमासाठी इथपर्यंतची वाटचाल सोपी नव्हती.

काश्मीरातील अस्थिर वातावरणामुळे फातिमाच्या अभ्यासात अडथळे निर्माण झाले. या कठीण काळातच बिहारच्या त्रिकुटाने सुरू केलेल्या क्लासबद्दल फातिमाला कळलं. आणि यातूनच तिला यशाचा मार्ग सापडला.

फातिमा आता IIT अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करते आहे.

फातिमाप्रमाणेच श्रीनगरमधल्या इंदिरा नगरातली 20 वर्षीय महरीन सुद्धा बिहारच्या या त्रिकुटाच्या सहाय्यानं IIT मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झाली.

इंबिसात, सलमान आणि सैफई हे तिघेही बिहारचे तर मुबीन काश्मीरचा. हे चौघेही IIT चे पदवीधर आहेत. पाच वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर राज्यात असं प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजवर या क्लासच्या 42 विद्यार्थ्यांनी IIT मेन्स यश मिळवलं आहे. यात सहा मुलींचा समावेश आहे.

मुबीनने क्लास सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणतो, "काश्मीरच्या मुलांना योग्य दिशादर्शनाची आवश्यकता होती. मुलांमध्ये IIT सारख्या शैक्षणिक संस्थांच्या परीक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज होती. हे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी काश्मीरमधल्या अनेकांनी मदत केली आहे."

25व्या वर्षी चांगल्या नोकरीची संधी सोडून बिहारमधून काश्मीरमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत इंबिसात ठाम होता. "इथं येऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हा अनुभव खूपच समृद्ध करणारा आहे. फिरण्याच्या निमित्ताने मी अनेकदा काश्मीरमध्ये आलो होतो. इथली मुलं हुशार आहेत, हे लक्षात आलं होतं, पण त्यांना योग्य माहिती नव्हती. आपल्या प्रतिभेनुसार शिक्षण आणि काम त्यांच्या नशिबी नाही. या गोष्टीकडे आम्ही एक प्रश्न म्हणून पाहू लागलो. तो सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू झाला. आणि पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काश्मीरमध्ये पूर्णवेळ क्लास सुरू करायचं आम्ही ठरवलं."

27व्या वर्षी बिहार सोडून काश्मीरात येण्याबाबत सैफईने वेगळा मुद्दा मांडला. "काश्मीरमध्ये मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात. बिहारमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे."

24 वर्षीय सलमानला वाटतं की काश्मीरमध्ये मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आणि तयारी तर आहे, मात्र सुविधा पुरेशा नाहीत.

फातिमाने या क्लासबद्दलचे आपले अनुभव मांडले. "गेल्यावर्षी काश्मीरमधले वातावरण अनेक महिन्यांसाठी अस्थिर होतं. त्यावेळीही क्लासमधले शिक्षक आमच्यासाठी उपलब्ध असायचे. क्लासला प्रत्यक्ष जाऊ शकत नसू तर फोनवरून शिक्षक मार्गदर्शन करत होते. परिस्थिती कशीही असली तरी माझा अभ्यास सुरू राहिला. शिक्षक स्वत: IIT पदवीधर असल्याने त्यांना परीक्षेची सखोल माहिती आहे'.

महरीन सांगते, "क्लासमधल्या शिकवण्याने प्रचंड फरक पडला नाही. मात्र IIT मेन्स परीक्षेच्या धर्तीवर क्लासमध्ये परीक्षा घेण्यात येते. यामुळे प्रत्यक्ष परीक्षेसारखं वातावरण अनुभवता आलं. परीक्षेच्या वेळी दडपण आलं नाही. इथल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे असंख्य अडचणी निर्माण होतात."

आतीर शिफात आता अकरावीत आहे. परंतु तिला IITमध्येच शिकायचं आहे. त्यासाठी तिने आताच क्लासला जायला सुरुवात केली आहे. तिला वाटतं, "काश्मीरमधल्या मुली आता अधिक आत्मविश्वासपूर्ण झाल्या आहेत. इथल्या मुली शिक्षणात तसंच खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत."

गेल्यावर्षी इथं शिकलेल्या चार मुलांनी IIT तून शिक्षण पूर्ण केले. तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (NIT) संस्थेत प्रवेश मिळवला. याच क्लासचा विद्यार्थी असलेल्या 19 वर्षीय शेख मोअज्जिनला अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागात शिकण्याची संधी मिळाली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)