You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंसाठी मुंबईच महाराष्ट्र, मग टॉप 5 मध्ये आलेच कसे? - चंद्रकांत पाटील #5मोठ्या बातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. उद्धव ठाकरेंसाठी मुंबईच महाराष्ट्र, मग टॉप 5 मध्ये आलेच कसे?-चंद्रकांत पाटील
देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समावेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. सव्वा दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाही. मग कोणत्या निकषावर ते टॉप 5 मध्ये आले असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
इंडिया टुडे आणि आणि सी व्होटर यांनी देशाचा कल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं असून त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश केला आहे. त्यावर पाटील यांनी टीका केली.
"उद्धव ठाकरे यांच्यासाठी महाराष्ट्र फक्त मुंबईत आहे. गेल्या 80-90 दिवसांपासून ते लोकांसाठी उपलब्ध नाहीत. त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? कदाचित त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील," असंही पाटील म्हणाले.
"पंतप्रधानांच्या कोरोना आढावा बैठकीला ते उपस्थित नसतात आणि मनपाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावतात. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेर त्यांना महाराष्ट्र माहीत नाही," अशी टीकाही पाटील यांनी केली.
2. पटोलेंनी मोदी म्हणून उल्लेख केलेला गावगुंड माध्यमांसमोर, म्हणाला-'मीच तो..'
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं होतं. मात्र, आपण पंतप्रधानाबाबत नव्हे तर एका गावगुंडाबाबत बोललो अल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता.
त्यानंतर खरंच मोदी नावाचा असा गावगुंड आहे का याचा तपास सुरू झाला. त्यात मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना सापडला असून त्याची चौकशी करून पोलिसांनी अहवाल पाठवला आहे. सकाळनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
नागपूरमध्ये उमेश घरडे नावाच्या व्यक्तीला एका वकिलानं माध्यमांसमोर उपस्थित केलं. पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी हाच आहे असा दावा करण्यात आला. पटोले माझ्याबाबतच बोलले असं तो माध्यमांसमोर म्हणाला.
भंडारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी, 'मी मोदीला मारू शकतो, शिवी देऊ शकतो,' असं वक्तव्य केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
3. अल्पवयीन मुलीच्या बलात्कारातील आरोपीला पीडितेच्या वडिलांनी घातल्या गोळ्या
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या पित्यानं दिवाणी न्यायालयाच्या आवारामध्येच आरोपीची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दिलशाद हुसेन असं आरोपीचं नाव होतं. बलात्कार प्रकरणाच्या पहिल्याच सुनावणीला दिलशाद कोर्टाजवळ आला त्यावेळी त्याला पीडितेच्या वडिलांनी गोळ्या घातल्या.
दिलशाद वकिलांना भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या प्रकाराने कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. गोळ्या झाडणाऱ्या पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
30 वर्षीय दिलशादवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप होता. तो जामीनावर बाहेर होता. पहिल्याच हजेरीसाठी तो कोर्टात आला असता, पीडितेच्या वडिलांनी त्याच्यावर गोळ्या घातल्या.
4. 30 हजारांसाठी सावकारानं उचलून नेली दीड महिन्याची चिमुकली, 4 महिने स्वतःकडे ठेवलं बाळ
साताऱ्यामध्ये एका सावकारानं कर्जाच्या वसुलीसाठी एका कुटुंबातील दीड महिन्याच्या चिमुकलीलाच घरातून उचलून नेल्याची घटना घडली आहे. दिव्य मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं.
जवळपास चार महिने या सावकारानं बाळ त्याच्याजवळच ठेवलं. सावकार ते बाळ परत देत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत बाळाला पुन्हा आईच्या ताब्यात दिलं आहे.
साताऱ्याच्या अभिषेक कुचेकर कुटुंबीयांबरोबर हा प्रकार घडला. त्यांनी सावकाराकडून 30 हजार रुपये घेतले होते. त्याची व्याजापोटी 60 हजारांची फेड केल्यानंतर सावकार पैशाची मागणी करत होता.
या प्रकारातून चार ते पाच महिन्यांपूर्वी सावकाराने कुचेकर यांच्या दीड महिन्याच्या मुलीला घरातून उचलून नेलं. वारंवार मागणी करूनही बेकायदेशीररित्या मुलीला सावकारानं ताब्यात ठेवलं होतं.
कुचेकर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसंच मुलगी परत हवी असेल तर चार-पाच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
5. प्रियंका गांधींनी स्पष्ट केलं, प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी न झाल्याचं कारण
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस एकत्र येण्यात नेमका काय अडथळा ठरला यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी यामागचं नेमकं कारण सांगितलं.
"एकत्र न येण्यामागे अनेक कारणं होती. त्यात काही त्यांच्या बाजूनं होती, तर काही आमच्या बाजुनं होती. त्यामुळं चर्चेअंती काही मुद्द्यावर सहमती न झाल्यानं, एकत्र आलो नाही," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येण्याची दाट शक्यता होती, मात्र काही मुद्द्यामुळं ते होऊ शकलं नाही असंही त्या म्हणाल्या.
प्रशांत किशोर यांनी गेल्यावर्षी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या सर्वांशी अनेकदा चर्चा केली. पण काँग्रेस प्रवेशावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोलही केला होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)