You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साताऱ्यात गरोदर वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"माझी पत्नी 3 महिन्यांची गरोदर आहे, असं असताना ते दोघं माझ्या पत्नीला मारत होते. ते खूप मारत असल्याने मी मध्ये पडून पत्नीला बाजूला केले."
साताऱ्या जिल्ह्यातील पळसवडे गावात कामावर असताना मारहाण झालेल्या वनरक्षक सिंधू सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे सांगत होते.
पळसवडे या गावातील वनविभागाच्या जागेत प्राणी गणना करुन परतणाऱ्या वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती वनरक्षक सूर्याजी ठोंबरे यांना मारहाण करण्यात आली.
पळसवडे गावचे माजी सरपंच आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी प्रतीभा जानकर यांनी वनरक्षक दांपत्याला मारहाण केली.
मारहाणीच्या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरला झालाय. ज्या पद्धतीने जानकर यांनी सिंधू यांना मराहाण केली ती पाहता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. या घटनेचा आढावा घेण्यासाठी आम्ही साताऱ्यात गेलो.
साताऱ्याच्या वनविभागाच्या कार्यालयात सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे आम्हाला भेटले. या घटनेचं गांभीर्य पाहता वनविभागातील अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सानप यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. सिंधू यांना आम्ही घटनेविषयी विचारल्यानंतर त्यांनी सर्व घटना सांगितली.
सिंधू म्हणाल्या, "माझी चार महिन्यापूर्वी त्या भागात नियुक्ती झाली आहे. मी रुजू झाल्यापासून जानकर मला त्रास देत होते. वनविभागाच्या कामाचे चेक मी सोडत नव्हते म्हणून वारंवार धमक्या देत होते. मला न विचारता मजूर महिलांना प्राणी गणनेसाठी कसे नेले असं ते म्हणत होते."
"17 तारखेला प्राणी गणनेसाठी दोन कामगार घेऊन गेल्याने जानकर यांच्या पत्नीने मला मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मी माझ्या पतीला माहिती दिली होती. 19 तारखेला प्राणी गणेनेहून परत येताना मजूर महिलांना मला न विचारता का नेले असं म्हणत त्यांनी माझ्या पतीला चपलेने मारहाण करायला सुरुवात केली. मी मध्ये सोडवायला गेले तर त्या दोघांनी मलाही मारहाण केली," सिंधू सांगत होत्या.
मजुरांना देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये सानप या जानकर यांना भ्रष्टाचार करु देत नव्हत्या म्हणून त्यांना राग होता. त्याचबरोबर त्यांना विचारल्याशिवाय वनक्षेत्रात यायचं नाही असंही ते सानप यांना म्हणायचे, असा आरोप त्यांनी केला आहे.
सानप यांच्या चेहऱ्याला लागलं आहे. त्या 3 महिन्याच्या गरोदर असल्याने त्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.
शासकीय कामासाठी मजूर घेऊन जाण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या परवानगीची गरज नाही. त्याचबरोबर शासनाचे तसे कुठलेही निर्देश नाहीत, असं सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनावले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
17 तारखेला जानकर यांच्या पत्नीने सानप यांना मारण्याची धमकी दिल्याने त्या त्यांच्या पतीला 19 तारखेला सोबत घेऊन गेल्या होत्या. याआधी देखील अनेकदा जानकर यांनी शिवीगाळ आणि धमक्या दिल्याने सानप यांचे पती त्यांच्यासोबत आले होते, असं त्यांनी सांगितलं.
त्याचं प्राणी गणनेचे काम झाल्यानंतर परतत असताना जानकर यांच्या पत्नीने सानप यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे म्हणाले, "19 तारखेला प्राणी गणना करून परत येत असताना जानकर आणि मी बोलत असताना त्यांची पत्नी चप्पल घेऊन आली आणि तिने मला चपलेने मारहाण केली. तेव्हा माझी पत्नी मध्ये आल्यानंतर मला सोडून ते माझ्या पत्नीला बेदम मारहाण करू लागले. यापूर्वी देखील ते अनेकदा शिवीगाळ आणि धमकी देत होते, आणि ते कुठेच समोर येत नव्हतं. म्हणून मी मोबाईल काढून त्याचं शूटींग केलं. परंतु ते खूप मारहाण करत असल्याने मी मध्ये पडून पत्नीला बाजूला केलं."
या घटनेनंतर जानकर पती-पत्नी फरार झाले होते. पोलिसांची पथकं त्यांचा शोध घेत होती. 19 तारखेला रात्री 3 च्या सुमरास पोलिसांनी जानकर यांना शिरवळवरुन अटक केली. त्यानंतर 20 जानेवारीला त्यांच्या पत्नीला देखील अटक केली. दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केल्याचं साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी सांगितलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. 'अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. आरोपीला कडक शिक्षा होईल' असं ट्वीट केलं आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या घटनेची दखल घेत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
सानप यांच्यासोबत काम करणारे सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनावले म्हणाले, "अखिल भारतीय व्याघ्र जनगणना सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. सकाळच्या वेळेत ही जनगणना असते. प्रत्येक वनरक्षकाने त्याच्या भागात वाघ आणि इतर वन्यजीवांचे काही अवशेष तसेच प्रत्यक्ष सायटिंग होते का याची माहिती घ्यायची असते. त्याचे तपशील पुढे पाठवायचे असतात."
"या कामासाठी सिंधू सानप या 3 महिन्याच्या गरोदर महिला पळसवडे या गावात गेल्या होत्या. त्यावेळी त्या गावचे माजी सरपंच आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाणकार हे त्यांच्या पत्नीसोबत तिथे आले. सुरुवातीला चप्पल आणि लाथाबुक्यांनी त्यानी सानप यांना मारहाण केली. तसेच सानप यांच्या पतीला देखील लाथाबुक्या आणि दगडाने मारहाण केली. दोघंही शासकीय कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे," सोनावले यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)