जितेंद्र आव्हाडांची अमोल कोल्हेंवर टीका,'कलाकाराचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही' #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. कलाकाराचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन नाही - जितेंद्र आव्हाड

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेली कलाकृती जरी कलाकार म्हणून केलेली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचं समर्थन आलेलं आहे, कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत.

याकडे कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे, अमोल कोल्हे एक गुणी कलावंत असल्याचं आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

तर विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला होता. याच भूमिकेबरोबर राहून गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार असल्याचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

2. संभाजी ब्रिगेडने रोखलं 'मुलगी झाली हो'चं शूटिंग

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण थांबवलं. अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढल्याबद्दल जाब विचारण्यासाठी हे कार्यकर्ते गेले होते.

त्यानंतर भुईंज पोलिसांनी 9 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

किरण माने बहुजन असल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केल्याचं टीव्ही9 च्या बातमीत म्हटलं आहे.

'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना हटवल्यापासून वाद सुरू आहे. मालिकेतल्या सहकलाकारांनी किरण माने यांच्याविषयीची मतं व्यक्त केली होती. तर किरण माने यांनी याविषयीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

3. कोव्हिड होऊन गेल्यानंतर तीन महिन्यांनी बूस्टर डोस

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर तीन महिन्यांनंतर बूस्टर म्हणजेच प्रिकॉशन डोस घेता येणार असल्याचं नीती आयोगाचे सदस्य आणि कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय.

यासोबतच 12 ते 14 वर्षं वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

12 ते 14 वर्षं वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाबद्दलचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर घेतला जाईल आणि याबद्दल विचारविनिमय सुरू असल्याचं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.

4. एस.टी. सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाकडून नवीन पर्याय

एस. टी. कामगारांचा संप सुरूच असल्याने राज्यातल्या एसटी सेवेवर परिणाम झालेला आहे. ही सेवा सुरळीत करण्यासाठी महामंडळाने एक नवीन पर्याय काढला आहे.

एस.टी सेवा सुरळीत करण्यासाठी यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतुक निरीक्षक यांचा चालक म्हणून वापर करण्यात येत असून वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्यात येणार आहे.

यासाठी यांत्रिक कर्मचारी आणि सहाय्यक वाहतुक निरीक्षकांना उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

ई-सकाळने याबद्दलची बातमी दिली आहे.

5. भारतात डिसेंबर 2021मध्ये 5.3 कोटी बेरोजगार

भारतामध्ये डिसेंबर 2021मध्ये तब्बल 5.3 कोटी बेरोजगार होते आणि यामध्ये महिलाचं प्रमाण मोठं असल्याचं CMIE ने म्हटलंय.

या बेरोजगारांपैकी सुमारे 3.5 कोटी लोक हे नोकरीच्या शोधात असून 1.7 कोटी जणांना काम करायची इच्छा असली तरी ते आता नोकरी शोधत नसल्याचंही CMIE च्या अहवालात म्हटलं आहे.

नोकरी शोधणाऱ्या साडेतीन कोटींपैकी 23% म्हणजे सुमारे 80 लाख महिला आहेत. तर नोकरी न शोधणाऱ्यांमध्ये 90 लाख महिला आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)