शिवसेना सत्तेत असूनही नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष का ठरला?

विद्यापीठ कायदा

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांतल्या 106 नगरपंचायतींचे आणि दोन जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज आले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि पक्षीय आघाड्यांची नवी रचना झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था असोत वा अन्य कोणतीही सत्तास्थानं, इथला प्रत्येक निकाल हा राज्यस्तरावरच्या राजकारणावर परिणाम करणारा असतो.

क्वचितच ग्रामपंचायतीच्या प्रत्येक जागेकडे वा परिषदांच्या गटांकडे इतक्या बारकाईनं बघितलं गेलं असेल. आजचे निकालही त्यापेक्षा वेगळे नव्हते.

एकूण जागा जर पाहिल्या तर अठराशेहून अधिक जागांसाठी या निवडणुकीत मतदान झालं. ही निवडणूक यासाठीही महत्त्वाची ठरली कारण सर्वोच्च न्यायलायाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण जिथून गेलं त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून मतदान झालं.

महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर परिणाम करणाऱ्या प्रश्नावर पुढची लढाई न्यायालयात अद्याप सुरू आहे, पण या निवडणुका आरक्षणाविना घ्याव्या लागल्या. म्हणूनही या निवडणुकांकडे लक्ष होतं.

पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर, गावांतल्या पायवाटांवर राजकीय चित्र कसं आहे हे या निवडणुकांमधनं समजणार होतं.

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये असं दिसलं होतं की महाविकास आघाडीच्या रचनेनंतर या आघाडीतल्या पक्षांना एकमेकांच्या मतांच्या देवाणघेवाणीचा फायदा झाला आणि भाजपाला तोटा झाला.

शिवसेनेकडे गेलेल्या ग्रामपंचायती सगळ्यांत जास्त होत्या. पण हा फरक फार मोठा नव्हता की एका बाजूचा संपूर्ण विजय आणि दुसरीचा पराजय असा म्हणता यावा.

अजित दादा शरद पवार

बहुतांश तसंच चित्र याही निवडणुकीत दिसतं आहे. जवळपास सर्व पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी त्यांचे भाग राखले आहेत, काहींना धक्केही मिळाले आहेत. पण एकत्र पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपाचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले आहेत, पण गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांच्या हातून काही नगरपंचायती सुटल्या आहेत.

एकेकटे पक्ष म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे तीनही पक्ष भाजपाच्या मागे राहिले आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून बघितल्यास एकत्र संख्या मोठी आहे.

त्यामुळे आघाडीचा एकत्रित फायदा होऊन ते भाजपावर वरचढ ठरताहेत, हे चित्र याही निवडणुकीत नगरपंचायतींच्या पातळीवर राहिलं आहे.

महाविकास आघाडी वरचढ

आज ज्या 1649 जागांचे निकाल आले आहेत ते पाहता पाहता महाविकास आघाडीला एकत्र मिळून भाजपाला मागं टाकण्यात यश आलं आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र मिळून 67 नगरपंचायतींवर ताबा मिळवता आला आहे आणि त्यांच्याकडे 944 जागा आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्या वाढल्या आहेत.

आघाडीमध्ये आणि राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीला या निवडणुकीत सगळ्यांत जास्त फायदा झाला आहे. भाजपाच्या खालोखाल त्यांचे 344 सदस्य निवडून आलेत तर 25 नगरपंचायतींवर त्यांचं वर्चस्व असेल.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना इथं सगळ्यात जास्त यश म्हणजे 101 जागा मिळाल्या आहेत.

गेल्या वेळेस त्यांच्याकडून सुटून भाजपाकडे गेलेल्या नगरपंचायतीही त्यांनी परत मिळवल्या आहेत. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीत जास्त फायदा हा राष्ट्रवादीला झाला आहे.

शिवसेना आणि कॉंग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये यश मिळालं आहे. शिवसेनेला एकूण 284 तर कॉंग्रेसला एकूण 316 जागा राज्यभरात मिळाल्या आहेत. सेनेला कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांची आघाडी टिकवता आली आहे.

कोकणात सेनेकडे सर्वाधिक 91 सदस्य असतील, पण एकूण जर आकडा बघितला तर सेनेकडे सर्वांत कमी म्हणजे 14 नगरपंचायती असणार आहेत.

कॉंग्रेसला महाराष्ट्रभर अशी लक्षणीय कामगिरी करता आली नाही आहे, पण विदर्भात, जो भाजपाचाही बालेकिल्ला आहे, तिथं त्यांनी भाजपाला मोठी मात दिली आहे.

विदर्भात भाजपाच्या 123 तर कॉंग्रेसच्या 161 जागा निवडून आल्या आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले विदर्भातून येतात त्यामुळे त्यांच्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे.

काही काळापूर्वी झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही कॉंग्रेसची सरशी झाली होती. त्यामुळे विदर्भ हा त्यांचा पूर्वीचा गड कॉंग्रेस परत मिळवतं आहे असं चित्र आहे.

सत्तेत असूनही शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष का ठरला?

एका बाजूला महाविकास आघाडीतली 'राष्ट्रवादी' दुप्पट फायदा करुन घेत असतांना, या आघाडीचं नेतृत्व करणारी शिवसेना मात्र पक्ष म्हणून सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

शिवसेनेला 284 जागा एकूण नगरपंचायतींमध्ये मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद असूनही, महत्वाची खाती असूनही शिवसेनेला राष्ट्रवादीसारखा फायदा या निवडणुकीत का करुन घेता आला नाही हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे.

शिवसेना भाजपाला सोडून महाविकास आघाडीत आली, त्यामुळे भाजपा आणि त्यांची तुलना होणं स्वाभाविक आहे. एका बाजूला भाजपा पक्ष म्हणून सर्वात मोठा ठरलेला असतांना सेना मात्र शेवटाला राहणं, ही निवडणुकीतली जखम आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER

चार महत्वाच्या पक्षांमध्ये शिवसेनेला एकूण नगरपंचायतीही कमी मिळाल्या आहेत. 14 नगरपंचायतींवर त्यांचा भगवा फडकला आहे.

मात्र असं जरी असलं तरीही सेनेनं त्यांचे बालेकिल्ले मात्र राखले आहे. उदाहरणार्थ कोकण विभागा. इथं सेना सगळ्यात जास्त जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष आहे. पण कोकणातल्या विजयात एक नोंद आहे. एक म्हणजे तळकोकणातल्या सिंधुदुर्गात राणेंच्या नेतृत्वात भाजपाचंच वर्चस्व राहिलं आहे.

नुकतीच चुरशीची ठरलेली जिल्हा बँक निवडणूक सेना हरली होती. त्यात हे दुसरं अपयश. कोकणात रायगड, रत्नागिरी इथं राष्ट्रवादीसोबत सेनेला यश वाटून घ्यावं लागलं आहे. म्हणजेच आघाडीचा राष्ट्रवादीला कोकणातही जसा फायदा करुन घेता आला, तसा सेनेला अन्यत्र करुन घेता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात सेनेला सगळ्यात जास्त जागा मिळाल्यात. मराठवाडाही त्यांचा बालेकिल्ला आहे जिथं भाजपाशी टक्कर होऊन त्यांच्या जागा कमी पडल्या आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सेना विशेष काही कामगिरी करता आली नाही आहे. किंबहुना गृहराज्यमंत्री असणा-या शंभूराज देसाई यांना त्यांच्या भागातल्या पाटण नगरपंचायतीवर विजय मिळवता आला नाही आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वात आघाडीवर राहिलेली शिवसेना मुख्यमंत्रीपद असूनही काहीच महिन्यांत नगरपंचायतींमध्ये शेवटच्या स्थानावर का फेकली गेली हा प्रश्न सेनेअंतर्गत चर चर्चेला येणं स्वाभाविक आहे.

भाजपा सर्वांत मोठा पक्ष

आजच्या आकड्यांवरुन हे स्पष्ट आहे की भाजपा हा सर्वात मोठा पक्ष सदस्यसंख्येकडे पाहता सिद्ध झालं आहे. भाजपाचे मोजणी झालेल्या जागांपैकी 384 सदस्य निवडून आले आहेत.

त्यामुळे आघाडी नसेल तर भाजपा आजही सर्वात जास्त ताकद असलेला पक्ष आहे.

भाजपाच्या 24 नगरपंचायती आता असतील. मराठवाड्यात भाजपाचे सर्वाधिक सदस्य आहेत. पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात, जिथं त्यांची ताकद आहे, तिथं त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही.

पण मराठवाड्यात भाजपाला बीड सारख्या चुरशीच्या लढतींमध्ये यश मिळालं आहे.

@Dev_Fadnavis

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis

राज्यात नजिकच्या काळात महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. विविध राजकीय घडामोडींनी वातावरण गेल्या काही काळात तापलं आहे. या निकालांमध्ये याचं प्रतिबिंब कसं दिसतं?

राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंच्या मते राष्ट्रवादीला या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश लक्षणीय आहे.

"त्यांचं यश मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मुख्य म्हणजे ते राज्याच्या सगळ्या भागांमध्ये मिळालेलं आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसलाही वेगळं लढले तरीही फायदा झालेला दिसतो. कॉंग्रेस तर संघटना म्हणून फार आक्रमक नसतांनाही त्या त्या नेत्यांच्या भागांमध्ये मिळालेलं यश एकत्रित करुन पाहिलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल असं आहे," देशपांडे म्हणतात.

या निकालांच्या परिणाम येत्या महापालिका निकालांवरही पडेल असंही देशपांडे म्हणतात. "एक तर राजकीय सूर निश्चित होतो. ट्रेंड तयार व्हायला सुरुवात होते. आणि आता जो सूर दिसतोय तो आघाडीसाठी जसा दाखवला जातो आहे तेवढा वाईट नाही असंही दिसतंय.

विशेषत: ओबीसी आरक्षण या सरकारमुळे गेलं किंवा बाकी सगळे आरोप भाजपानं केले होते ते लोकांना फारसे पटले आहेत असं दिसत नाही. या निवडणुकीतून अजून एक चित्र आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी नवी तरुण पिढी समोर आली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ते चित्र आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)