नगरपंचायत निवडणूक निकाल एका क्लिकवर : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला कुठे किती जागा?

फोटो स्रोत, facebook/getty images
राज्यातील 106 नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज (19 जानेवारी) जाहीर होत आहे. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर आणि 18 जानेवारी या दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या.
या निवडणुकीतील 99 नगरपंचायतींचे निकाल आज (19) तर इतर 7 नगरपंचायतींचे निकाल उद्या (20) लागणार आहेत.
या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार असून अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीत सहभागी नगरपंचायतींची संपूर्ण यादी आणि त्याठिकाणी कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या, याची सविस्तर माहिती तुम्हाला या बातमीत मिळेल...
कोकण विभाग
कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत निवडणुका झाल्या.
ठाणे जिल्ह्यात मुरबाड आणि शहापूर येथे निवडणूक झाली. मुरबाडमध्ये भाजपने तर शहापूरमध्ये शिवसेनेने सत्ता हस्तगत केली आहे.

पाललघरमध्ये तळसरी विक्रमगड, मोखाडा याठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या. याठिकाणी अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. माकपचा प्रभावही या निवडणुकीत दिसून आला.
रायगड जिल्ह्यात पाली, खालापूर, तळा, म्हसळा, पोलादपूर आणि माणगावमध्ये निवडणुका पार पडल्या. याठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखलं.
रत्नागिरीत दापोली आणि मंडणगड तर सिंधूदुर्गमध्ये दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ आणि देवगड याठिकाणी निवडणूक झाली. सिंधूदुर्गमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या.
प्रशासकीय विभाग नाशिक
नाशिकमध्ये सुरगाणा, देवळाली, निफाड, कळवण, दिंडोरी या ठिकाणी निवडणुका झाल्या. धुळ्यात साक्री, जळगाव जिल्ह्यात बोदवडमध्ये निवडणुका पार पडल्या.
धुळ्याच्या साक्री नगरपंचायतीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. 25 वर्षांपासून ची सत्ता असलेले ज्ञानेश्वर नागरे यांना मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवत भाजपने मुसंडी मारली. एकेकाळी साक्री नगरपंचायत वर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा देखील फोडणं शक्य झालं नाही.

अहमदरनगरच्या अकोले, पारनेर, कर्जत आणि शिर्डी याठिकाणी निवडणुका झाल्या.
अकोले नगरपंचायतीत माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी बाजी मारलीय. इथं भाजपला 17 पैकी 12 जागा मिळाल्यात. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 2 आणि काँग्रेसला एक जागा मिळालीय.
कर्जतमध्ये आमदार रोहित पवारांचे एकहाती वर्चस्व दिसून आलं आहे. तिथं त्यांनी भाजपच्या राम शिंदेंना धक्का दिला आहे.
शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 प्रभागांमध्ये नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे तिथे मतदान होऊ शकलं नाही.)
पश्चिम महाराष्ट्र विभाग
पश्चिम महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलं आहे. खालोखाल भाजप आणि शिवसेनेनेही काही प्रमाणात समाधानकारक कामगिरी केली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा वगळता काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही.
माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांनी भाजपला यश मिळवून दिलं. तर श्रीपूर आणि नातेपुते याठिकाणी मोहिते-पाटील यांच्याच दोन गटांमध्ये लढत झाली.
कडेगाव नगरपंचायतीत निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची सत्ता भाजपाने या ठिकाणी उखडून टाकली आहे. अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर कवठे महांकाळमध्ये रोहित पाटील यांनी एकहाती विजय प्राप्त केला. विरोधकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात फळी उभी केली होती. पण ते आपला पराभव टाळू शकले नाहीत.
मराठवाडा विभाग
औरंगाबादच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला. याठिकाणी शिवसेनेने 11 जागांसह सत्ता हस्तगत केली.
तर जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखलं.

तीर्थपुरी येथेही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली. बदनापूर भाजपकडे तर मंठा नगरपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.
परभणीत काँग्रेसला 17 पैकी 10 जागांवर यश मिळालं.
बीडमध्येही भाजपची कामगिरी चांगली राहिली. शिरूर कासार, आष्टी आणि पाटोदा याठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. तर वडवणी येथे पक्षाला 8 जागा मिळाल्या.
तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात काही प्रमाणात पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे. लातूरमध्ये शिरूर अनंतपाळ नगरपंचायत भाजपकडे गेली. ते वगळता इतर कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळाली नाही.
उस्मानाबादची वाशी नगरपंचायत भाजपकडे तर लोहारा नगरपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.
तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसचंच वर्चस्व दिसून आलं.
पश्चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात तिवसा नगरपंचायतीमध्ये सत्ता राखण्यात मंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. 17 जागांपैकी काँग्रेस 12 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्यात. वंचितला इथं एक जागा मिळाली आहे.

भातकुलीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची एकहाती सत्ता आलीय. तिथं राणा यांच्या पक्षाला 17 पैकी 9 जागा मिळाल्यात. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलंय.
भाजपला 2 तर शिवसेनेलाने 3 जागा मिळाल्यात. शिवाय 2 अपक्ष उमेदवारांनीसुद्धा इथं बाजी मारली आहे.
भातकुली नगर पंचायतीमध्ये यापूर्वीही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं वर्चस्व होतं.
बुलडाणा जिल्ह्यात मोताळामध्ये काँग्रेसने 12 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली. तर संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा झेंडा फडकला.
यवतमाळमध्ये राळेगाव या एकमेव नगरपंचायतीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली तर महागांव, कळंब, बाभूळगाव, मोरगाव आणि झरी जामनी याठिकाणी त्रिशंकू परिस्थिती दिसून आली.
याशिवाय, वाशिम जिल्ह्यातील मनोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकत नगरपंचायतीची सत्ता प्राप्त केली.
पूर्व विदर्भ विभाग
नागपूरची हिंगणा नगरपंचात भाजपने काबीज केली. याठिकाणी भाजपने 9 जागा जिंकल्या. तर कुही येथे काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागांच्या मदतीने ते याठिकाणी सत्ता प्रस्थापित करू शकतात.

वर्ध्यातही भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कारंजा नगरपंचायतीवर काँग्रेसला सत्ता मिळाली. तर इतर ठिकाणी पक्षीय बलाबल समान स्वरुपात दिसून आलं.
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही आणि कोरपना याठिकाणी काँग्रेसला तर सावली आणि पोंभुर्णा याठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं.
इतर ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती असून याठिकाणी नेमकं काय राजकीय समीकरण पुढे येतं, हे पाहणं महत्त्वांच ठरणार आहे.
याशिवाय, भंडारा-गोंदियामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत झाली. गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (20 जानेवारी) होणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








