गिरणी कामगारांच्या संपानंतर मुंबईच्या राजकारणावर शिवसेनेची पकड कशी घट्ट झाली?

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

दत्ता सामंतांच्या नेतृत्वात गिरणी कामगारांचा संप हा आता 40 वर्षांपूर्वीची घटना असली आणि सध्याच्या टोलेजंग इमारतींच्या 'गिरणगावा'त ती वरवर पाहतांना विस्मृतीत गेलेली असली, तरी पोटात आजही तिचे व्रण आहेत.

या संपानं मुंबईच्या आयुष्यात काही निर्णायक गोष्टी घडवून आणल्या, त्यातली एक म्हणजे या शहराचं बदललेलं राजकीय प्रारब्ध.

आजही अनेक प्रकारे या गिरणी कामगारांच्या संपाचं विश्लेषण केलं जातं, त्याचे खोल उठलेले व्रण हुडकले जातात, वर्तमानाशी त्यांचे संबंध लावले जातात, तुलना होते आणि आजच्या एसटी कर्मचा-यांसारखे संप वा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा गिरणी कामगारांच्या संपांचं उदाहरण दिलं जातं.

चार दशकांपूर्वीच्या त्या संपाचे जे अनेकविध परिणाम झाले त्यात अनेक आयुष्यं तर बदललीच, पण सोबतच मुंबई शहराचं राजकीय आयुष्यही बदललं. दोन महत्वाच्या गोष्टी या संपानंतरच्या काळात मुंबईसोबत निश्चित घडून आल्या.

एक म्हणजे मुंबईच्या उद्योगविश्वाचं आधुनिक कॉर्पोरेट स्वरुप आणि या शहराच्या राजकारणावर शिवसेनेची पकड. त्या एका अटळ आर्थिक आणि राजकीय प्रक्रियेचा टप्पा होत्या, पण स्वतंत्र म्हणूनही महत्वाच्या घटना होत्या ज्या गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर ठळकपणे घडून आल्या.

कॉर्पोरेट स्वरुपाबद्दल बोलतांना इथं आपण ती जरी अर्थविश्वातली घटना असली तरीही तिचं प्रामुख्यानं राजकीय स्वरुप लक्षात घेणार आहोत.

संघटित कामगार शक्तीसाठी, त्याच्या राजकीय प्रभावासाठी आणि राजकीय विचारधारांच्या या शक्तीवरच्या प्रभावाबद्दल मुंबई ओळखली गेली, तिचं रुप या संपानंतर किंवा त्याच्या निमित्तानं बदललं.

ही बहुतांशानं राजकीय प्रक्रिया होती जी डावीकडून उजवीकडे झुकली आणि हा संप त्यातला एक निर्णायक टप्पा होता.

मुंबईचं कामगार विश्व

मुंबईच्या संघटित कामगार विश्वाचा इतिहास शतकभराहूनही मागे जातो आणि तो गिरणगावाभोवतीच फिरतो. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली युनियन गिरणी कामगारांचीच उभारली होती. नंतर संघटनाचं जाळं स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच घट्ट होत गेलं.

मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक विश्वावर या संघटीत कामगार चळवळीचा न पुसता येणारा ठसा तेव्हापासून आहे.

या चळवळीवर बहुतांशी प्रभाव हा डाव्या कम्युनिस्ट विचारांचा राहिला. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांसारखं नेतृत्व होतं. संप, मागण्या, प्रसंगी हिंसाचार असं चक्र तेव्हापासून कामगार विश्वामध्ये होतं. 1928 आणि 1940 चे गिरणी कामगार संप हे त्या काळातले नोंद घेण्यासारखे.

मुंबईतल्या गिरण्यांचं अस्तित्त्वं दाखवणाऱ्या अशा चिमण्या आजही पाहायला मिळतात.

फोटो स्रोत, GETTY IMAGES / HINDUSTAN TIMES

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या गिरण्यांचं अस्तित्त्वं दाखवणाऱ्या अशा चिमण्या आजही पाहायला मिळतात.

गिरणी कामगारांसोबत अनेक विविध उद्योगातल्या कामगारांमध्ये कम्युनिस्टांनी त्यांची वीण पक्की केली होती.

त्यामुळे इथल्या राजकारणावर त्यांच्या प्रभाव असणं स्वाभाविक होतं. पुढे इतर विचारसरणीच्या कामगार संघटनाही आल्या. त्यात कॉंग्रेसप्रणित संघटना होत्या. बहुतांशानं समाजवादी होत्या. उजव्या विचारसरणीशी संबंधितही काही होत्या. पण डाव्यांचं वर्चस्व अनेक दशकं राहिलं.

1967 च्या गाजलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस दोघेही जिंकले होते, यावरुन लक्षात यावं.

कामगार विश्वावरच्या त्यांच्या मजबूत पकडीमुळे मुंबईत प्रबळ असणा-या डाव्यांचं राजकीय आव्हान तेव्हा होतं ते कॉंग्रेसला. कॉंग्रेस आणि डावे यांच्या याच राजकीय संघर्षातून 60 च्या दशकात स्थापन झालेली शिवसेना मोठी झाली असं म्हटलं जातं.

मुंबईच्या कामगार विश्वावरचं डाव्यांचं वर्चस्व मोडण्यासाठी कॉंग्रेसनं शिवसेनेला मोठं केलं ही ती राजकीय थिअरी.

शिवसेना विरुद्ध डावे

"डाव्यांच्या मुंबईच्या कामगावर विश्वावर जो प्रभाव होता त्याला कॉंग्रेसच्या राजकारणाचा अडथळा वाढत होताच. म्हणजे 'वसंतसेना' वगैरे आपण जे ऐकलं आहे ते. मुंबई, ठाणे हा जो सगळा औद्योगिक परिसर होता, त्यात कामगारांच्या युनियन्स या प्रामुख्यानं डाव्यांच्या होत्या.

गिरण्यांचे मालकही असं तेव्हा म्हणायचे की डाव्यांच्या युनियन चांगल्या असतात. त्यांच्यात प्रामाणिकपणा असतो. त्यांचे नेते स्वत:साठी काही मागायचे नाहीत. सगळं कामगारांसाठीच मागायचे," ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई सांगतात.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेनेच्या उगमाची हो गोष्ट, पुढे शिवसेनेच्या आणि मुंबईच्याही राजकीय आयुष्यात दत्ता सामंतांच्या संपानंतर तिला निर्णायक वळण मिळालं, म्हणून या पूर्वपीठिकेचा प्रपंच. पण शिवसेना विरुद्ध डावे असा संघर्ष कॉंग्रेसची एकहाती सत्ता असतांनाच मुंबईत सुरु झाला.

कामगार विश्वात सेनेसोबतच समाजवादी आणि इतर कामगार संघटनाही प्रभावी होत होत्या. परिणामी या काळापासून एवढी दशकं अबाधित असलेलं डाव्यांचं वर्चस्व कमी होऊ लागलं.

"जनता पक्षाच्या काळामध्येही मुंबईतल्या डाव्या आणि समाजवादी कामगार संघटना प्रबळ होत्या. 80 च्या दशकाच्या आसपासच या राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांसोबत काही कामगार नेत्यांचा व्यक्तिगत प्रभावही वाढला होता. दत्ता सामंतही असेच नेते होते जे कामगार चळवळीमध्ये ओढले गेले.

गिरणी कामगारांमध्ये डाव्यांच्या संघटना होत्या, पण डांगेनंतर किंवा त्यांच्या काळातच त्यांचा प्रभाव कमी होणं सुरु झालं होतं. गिरणधंद्यामध्ये डाव्यांचं एकेकाळी जे वर्चस्व होतं ते कमी होत होतं आणि मुंबईजवळ जे इतर उद्योगक्षेत्रं वाढली होती तिथं त्यांचं संघटन व्हायला लागलं होतं," डाव्या आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक सुबोध मोरे सांगतात.

डाव्यांचा प्रभाव कमी होत गेला, कामगारांच्या मागण्यांचं आणि त्यासाठीच्या उपायांचं स्वरुपही कमी होत गेलं. अभ्यासकांनी असं नोंदवलंय की, हा प्रभाव संघटनकेंद्री होण्याप्सून व्यक्तिकेंद्री होत गेला. शिवसेनेचीही कामगार सेना प्रबळ झाली, पण सेनेची धोरणं ही कायम एका व्यक्तीभोवतीच ठरत गेली. हा बदलत गेलेला ढाचा सामंतांच्या संपांनंतर कामगार चळवळीच्या राजकारणात निर्णायक ठरला.

"दत्ता सामंतांच्या आंदोलनाच्या अगोदरपासूनच त्यांच्या प्रभाव हळूहळू कमी होत गेला होता. दत्ता सामंतांच्या उदयानंतर ज्या सगळ्या युनियन्स होत्या, डाव्यांच्या होत्या, समाजवाद्यांच्या होत्या, त्यांनीही सामंतांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. एक व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन द लाईफ' अशी झाली होती. म्हणजे डाव्यांचा प्रभाव कमी झाला होता आणि सामंतांच्या आंदोलनानंतर तर तो जवळपास नाहीच राहिला," जतीन देसाई म्हणतात.

"ज्याप्रकारे तो संप मिटला किंवा संपला त्यामुळे मुंबईच्या राजकीय विश्वावर जो कामगार चळवळीचा जो प्रभाव होता, तो राहिला नाही. या संपात कामगारांना जे अपयश आलं, त्याचा परिणाम हा बाकी कामगार चळवळीवरही पडला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठा संप वगैरे त्यानंतर झाला नाही," सुबोध मोरे म्हणतात.

शिवसेनेच्या हाती मुंबईची सत्ता आली

अनेक काळापासून असलेल्या राजकीय विचारधारा ज्यांनी कामगारकेंद्रित राजकारण केलं त्यांचं या संपानंतर निर्णायकरित्या संपणं, यासोबतच काही विचारधारांचं राजकीय पटलावर मोठ्या काळासाठी उगवणं हेही सामंतांच्या गिरणी संपानंतर झालं.

हा उदय म्हणजे शिवसेनेचा होता. शिवसेनेनं कामगार विश्वात केलेला प्रवेश, कम्युनिस्टांशी त्यांच्या असलेला संघर्ष, स्थानिकांच्या अधिकारांसाठी त्यांनी सुरु केलेली चळवळ, बाळासाहेब ठाकरेंचा मोठा होत गेलेला प्रभाव हे अगोदरपासून मुंबई पाहात होतीच.

पण सामंतांच्या संपानंतर शिवसेनेला पहिलं मोठं राजकीय यश मिळालं. ते म्हणजे 1985 मध्ये मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली आणि आजतागायत टिकून आहे. ही केवळ एक राजकीय घटना नव्हती, तर एक मोठी राजकीय प्रक्रिया होती. त्याचा परिणाम आजही आहे.

दत्ता सामंत

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, दत्ता सामंत

"जेव्हा संप सुरु झाला आणि अनेक दिवस तो सुरु राहिला तेव्हा मुंबईतलं वातावरण हे झपाटलेलं होतं. काहींना वाटायचं की आता मोठी क्रांतीच होणार. पण तो संप पुढे जाऊन फिसकटला. त्याचा एक मोठा परिणाम हा झाला की लोकांमध्ये कमालीचं नैराश्य आलं.

त्या नैराश्याचा फायदा शिवसेनेला खूप मोठा झाला. दोन लाखांपेक्षा जास्त गिरणी कामगार होते. त्यांची सगळ्यांची कुटुंबं होती. या सगळ्यांची वाताहत झाली. त्यातून हे प्रचंड नैराश्य आलं होतं," ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात.

"समाजात अशा नैराश्याची पोकळी जेव्हा निर्माण होते तेव्हा जात्यांध किंवा धर्मांध विचार जे असतात त्यांचं आकर्षण वाढतं. त्यांना एखादा शत्रू दाखवला की ते चिडतात. तेव्हा मुसलमान, कॉंग्रेस असे शत्रू त्यांना दाखवले गेले. लोकांना ते पटायला लागलं. हे गणित शिवसेनेला जमलं.

नैराश्य आलं की त्याचा फायदा फॅसिस्ट शक्तींनाच होतो. त्या काळात हा निराश झालेला कामगार जो होता तो शिवसेनेच्या जवळ गेला. शिवसेनेनं त्याचा जो न्यूनगंड जो होता, तो अहंगडात परावर्तित केला," आसबे पुढे म्हणतात.

मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होतीच, पण याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्चाचा मुद्दा उचलताच अनेक जण सेनेकडे आले. बहुसंख्य गिरणी कामगार हे मराठी होते. त्यातही कोकणी होते. जरी शिवसेनेनं संपाच्या काळात विरोधी भूमिका घेतली होती तरीही नंतर मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यावर कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या सेनेकडे आकर्षित झालेल्या पहायला मिळतात. त्यानं मुंबईवरचं सेनेचं वर्चस्व प्रस्थापित केलं.

"इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राममंदिरासारखे मुद्दे देशभरात मोठे होऊ लागले. बाळासाहेब ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग चढत गेला. त्यातून त्यांचा जनाधार वाढत गेला. संपाच्या काळात नैराश्यानं झपाटलेलं मराठी जनमानस त्यांनी एकत्र केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

लाखो लोकांचे संसार उध्वस्त झाले होते. गिरणगाव सगळं उध्वस्त झालं. ती सगळी सगळी नकारात्मक उर्जा शिवसेनेकडे गेली. निराश व्यक्तीला शत्रू दाखवला की त्यावर ते तुटून पडतात. शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेताच सगळे लोक त्यांच्याकडे गेले," प्रताप आसबे सांगतात.

आसबे अजूनही एक महत्वाचं निरीक्षण नोंदवतात. "यानंतर झोपडपट्ट्यांमध्येही शिवसैनिक आक्रमकपणे जायला लागले. पूर्वी झोपडपट्ट्यांमध्ये शिवसैनिक कुठेच नव्हते. तिथे फक्त डावेच होते. पण जसा मराठी माणसाचा मुद्दा मोठा होत गेला तसं तिथून डावेही गेले आणि कॉंग्रेसवालेही गेले. शिवसेनेनं ते सगळं ताब्यातच घेतलं. त्यांच्या मग शाखा, पर्यायी कोर्ट, तंटेबखेडे सोडवणं हे सगळं सुरु झालं. त्यांची संघटना तिथं प्रबळ होत गेली," ते सांगतात.

आर्थिक वीण उसवली, राजकीय वीण बदलली

अशा प्रकारे दत्ता सामंतांच्या संपानंतर शिवसेनेच्या राजकीय पटलावर नव्यानं उदय झाला. तो प्रभाव आजही टिकून आहे. पण या संपानं मुंबईची राजकीय वीणच बदलली असं नाही, तर आर्थिक वीणही बदलली. संपानंतर अवघ्या दशकभरातच आलेल्या आर्थिक उदारीकरणानं अर्थविश्व बदललं.

गिरणी

फोटो स्रोत, Getty Images

ज्या जागी गिरण्या उभ्या होत्या त्या जागांना कधी नव्हे एवढे भाव आले होते. उद्योगविश्व बदललं होतं. गिरणी कामगार अधिक भरडले गेले.

"दत्ता सामंतांकडनं कामगारांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. कामगारांना वाटत होतं की सामंत आपल्याला न्याय मिळवून देतील. पण तोपर्यंत व्यवस्था बदलायला लागली होती. सरकार, गिरणी मालक आणि व्यवस्थेनं ज्याप्रकारे सामंतांच्या विरोधात कृती केली त्यावरुन दिसतं. त्यानं मुंबईचा गिरणी कामगार संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

गिरणी कामगारांची ताकद संपली. व्यवस्था पद्धतशीरपणे कामगारांच्या संघटनेला कशी संपवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरणीकामगारांच्या युनियनला ज्याप्रकारे संपवलं ते. त्यानंतर आजपर्यंत गिरणी कामगारांच्या घरांसाठी किती सत्ताधा-यांनी काय काय सांगितलं, पण किती लोकांना घरं मिळाली आहेत?" जतीन देसाई विचारतात.

पण ज्या व्यवस्थेचा ते उल्लेख करतात ते बदललेल्या अर्थचक्रामुळे अधिक बदलत गेली. मुंबईचं गिरण्यांचं असलेलं कामगारविश्व हे आता बहुराष्ट्रीय कॉर्परेट कंपन्यांचं केंद्र बनलं. आर्थिक गणितं बदलली आणि त्यानं राजकारणंही बदललं. बदललेल्या कामगारसंबंधी कायद्यांनी अधिकारांचं वजन कमी केलं. राजकारणाचा केंद्रबिंदू हा संपामुळे आणि त्याअगोदर संघटित चळवळीमुळे जो कामगार होता, तो या केंद्रापासून दूर ढकलला गेला. सामंतांच्या नेतृत्वात केलेल्या गिरणी कामगारांच्या संपाचे राजकीय परिणाम असे आजही पहायला मिळत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)