भाऊ मालक तर बहीण कामगार नेता, एक आंदोलन आणि गांधीजींची मध्यस्थी : अनुसूया साराभाई

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

लाईन

अनुसूया साराभाई. त्यांना प्रेमाने सगळे जण मोटाबेन म्हणायचे आणि त्या नावाला त्या आयुष्यभर जागल्या. अनुसूया साराभाई भारततल्या कामगार चळवळीच्या अग्रणी समजल्या जातात.

अनुसूयांचा जन्म 1885 साली गुजरातधल्या अहमदाबादमध्ये एका धनिक परिवारात झाला. आईवडिलांचं छत्र लहानपणीच हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ काकांनी केली. त्यावेळेच्या प्रथांप्रमाणे त्यांचं लग्न 13 व्या वर्षींच झालं पण ते फार काळ टिकलं नाही. त्या आपल्या माहेरी परत आल्या. यानंतर त्यांचे बंधू अंबालाल यांनी अनुसूया यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि लंडनला पाठवलं.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

अनुसूया आणि त्यांच्या भावातले बंध अतिशय घट्ट होते. आईवडिलांनंतर या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला होता. लंडनला निघताना अनुसूया यांना कदाचित कल्पनाही नसेल की भविष्यात आपण भावंड एकमेकांच्या विरोधात उभे ठाकू आणि हे वादही साधेसुधे नसतील तर भारतीय समाजाचं चित्र बदलतील.

लंडनमधल्या वास्तव्याने अनुसूया यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्या समाजावादाच्या फॅबियन तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी इंग्लंडमधल्या सफ्रेज (महिलांचे हक्क) चळवळीतही भाग घेतला. सुरुवातीच्या या घटनांनी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली.

या मालिकेतील इतर महिलांविषयी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता

लाईन
लाईन

अनुसूया यांच्या भाची गीता साराभाई यांनी त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी लिहून काढल्या आहेत. एका ठिकाणी त्या लिहितात, "इंग्लंडचं खुलं वातावरण अनुसूयांच्या बंडखोर स्वभावाला फारच रूचलं. तिथे त्या अनेकदा अनोळखी रस्त्यांवरून एकट्याच भटकायच्या, बर्नाड शॉ, सिडनी आणि बिअट्रीस बेव यांसारख्या तत्त्वज्ञांची भाषणं ऐकायच्या, बॉलरूम डान्सिग शिकल्या आणि मनसोक्त सिगरेट ओढायलाच्या." अनुसूया यांनी नंतरच्या आयुष्यात यापेक्षा अत्यंत वेगळी जीवनपद्धती स्वीकारली आणि गांधीजींच्या अनुयायी बनल्या.

कौटुंबिक कारणास्तव त्यांना लंडनहून अर्ध्यातून परत यावं लागलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. त्यातले अनेक प्रकल्प सुतगिरण्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगार आणि त्यांच्या मुलांच्या विकासासाठी काम करणारे होते. अनुसूया यांनी 'स्त्रियो अने तेमनाा राजकीय अहधुसरो' म्हणजेच महिला आणि त्यांचे हक्क या विषयावर पत्रकही लिहिलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, भाऊ मालक तर बहीण कामगार नेता, एक आंदोलन आणि गांधीजींची मध्यस्थी : अनुसूया साराभाई

पण एका घटनेने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, "एका दिवशी सकाळी मी 15 कामगारांचा एक गट माझ्या घरासमोरून जाताना पाहिला. मी त्यातल्या काहींना ओळखत होते म्हणून त्यांना हाक मारली पण त्या लोकांना कसलीच शुद्ध नव्हती. तुमची ही अवस्था कशामुळे झाली विचारल्यावर ते लोक म्हणाले, ताई आम्ही आताच 36 तासांची कामाची पाळी संपवून घरी जातोय. आम्ही न थांबता सलग दोन दिवस आणि एक रात्र काम केलंय."

कामगारांची अशी अवस्था आणि त्यामागची कारणं कळल्यानंतर अनुसूया हादरून गेल्या. त्या लोकांचं जगणं, गरिबी, त्यांना ज्या परिस्थितीत काम करावं लागतं ती परिस्थिती, शोषण पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की या कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवायचा, मग भले आपल्याला यासाठी आपल्या परिवाराच्या, विशेषतः आपल्याला कायम पाठिंबा देणाऱ्या भावाच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

त्यांनी या कामगारांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सोयी आणि कामाच्या ठराविक तासांची मागणी केली. यासाठी त्यांनी 1914 साली कामगारांचं नेतृत्व करत 21 दिवसांचा संपही केला.

पण त्यांचा सगळ्यांत गाजलेला संप म्हणजे 1918 सालचा कामगाराचा संप. यावेळेपर्यंत साराभाई परिवाराचे स्नेही असणाऱ्या महात्मा गांधींनी त्यांना आपली शिष्य मानलं होतं.

जुलै 1917 साली अहमदाबाद शहरात प्लेगने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं होतं. लोक शहर सोडून जात होते. अशा काळात गिरणी कामगारांनी काम सोडून जाऊ नये म्हणून मिल मालकांनी त्यांना 50 टक्के पगार वाढवून दिला. याला त्यांनी प्लेग बोनस असं नाव दिलं. गिरणी कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत राहिले.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मिल मालकांनी हा बोनस देणं बंद केलं. रोगराईनंतर पसरलेल्या महागाईमुळे आधीच गिरणी कामगारांचं कंबरडं मोडलं होतं, त्यात मिळणारे पैसैही बंद झाले. त्यामुळे गिरणी कामगारांना जगणं कठीण झालं. कामगार अनुसूया यांच्याकडे गेले आणि आपल्याला 50 टक्के पगारवाढ मिळवून देण्याची विनंती केली.

एकीकडे कामगार संघटित होत असतानाच, गिरणी मालकांची मात्र कामगारांना पैसै वाढवून द्यायची तयारी नव्हती. गिरण्या बंद करून टाळेबंदी घोषित करू पण पगारवाढ देणार नाही अशी भूमिका मालकांनी घेतली. परिणामी, गिरणी कामगारांनी संप पुकारला.

याला उत्तर म्हणून मिल मालकांनी आपली एक संघटना स्थापन केली आणि याचं अध्यक्षपद दिलं अनुसूया यांचे भाऊ अंबालाल साराभाई यांना. झालं, बहीण-भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

ही कहाणी कुठल्या बॉलिवूडच्या चित्रपटात शोभेल अशीच आहे. बहीण कामगार नेता तर भाऊ भांडवलदारांचा नेता. एकमेकांना आयुष्यभर सांभाळणारे, जीवापाड प्रेम करणारे बहीण भाऊ विचारसरणी आणि तत्त्वांवरून एकमेकांचे कट्टर विरोधक बनले.

अनुसूया यांनी जवळपास 16,000 कामगार आणि विणकरांचं संघटन बांधलं. त्या आणि गांधींजीचे पुतणे छगनलाल रोज सकाळ-संध्याकाळ कामगार वस्तीत जायच्या, तिथल्या लोकांना काय हवं-नको पाहायच्या, त्यांना आश्वस्त करायच्या आणि वैद्यकीय मदतही पुरवायच्या. हा संप जवळपास 1 महिना चालला.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

रोज संध्याकाळी कामगार शहरातून शांततेत निदर्शन करतं फेरी काढायचे. त्यांच्या हातात फलक असायचे ज्यावर लिहिलेलं असायचं, 'आम्ही मागे हटणार नाही.' शहरातले रहिवासी, जे आधी या कामगारांकडे तुच्छतेने पाहायचे, ते निदर्शनांची शिस्त, त्यांचं संघटना आणि कामगारांचा निग्रह पाहून चकित झाले होते.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

दोन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर कामगारांमधली अस्वस्थता वाढायला लागली होती, इकडे गिरणी मालकांनाही लवकरात लवकर काहीतरी तोडगा हवा होता. पण करणार काय, बहीण-भाऊ तर अडून बसलेले. मग गांधीजींनीच एक रस्ता काढला.

गांधीजींनी जरी गिरणी कामगारांना आपला पाठिंबा दिला असला तरी गिरणी मालकांच्या मनात, विशेषतः अंबालाल यांच्या मनात, त्यांच्याविषयी खूप आदर होता. म्हणून गांधीजींनी अंबालाल आणि अनुसूया दोघांनाही रोज आपल्या आश्रमात दुपारी जेवायला बोलवायला सुरुवात केली. अंबालाल जेवायला बसले की अनुसूया त्यांना वाढायच्या. यामुळे भावाबहिणीमधली कटूता कमी व्हायला मदत झाली.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

गांधीजींची ही मात्रा लागू पडली. यानंतर काही दिवसातच गिरणी कामगार आणि गिरणी मालक वाटाघाटींसाठी तयार झाले. शेवटी 35 टक्के पगारवाढ मान्य दोन्ही बाजूंनी मान्य झाली.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

1920 साली अनुसूया यांनी मजदूर महाजन संघाची स्थापना केली आणि त्या या संघटनेच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या. ही भारतातल्या पहिल्या कामगार संघटनांपैकी एक होती. 1927 साली त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलींसाठी कन्यागृह या नावाने शाळाही सुरू केली.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

भांडवलदाराच्या घरात जन्मलेल्या पण खऱ्या अर्थाने भारतातली पहिली महिला कामगार नेता ठरलेल्या या महिलेने त्यांच्या मृत्यूपर्यंत जवळपास 2 लाख कामगारांचं नेतृत्व केलं होतं.

अनुसूया साराभाई

फोटो स्रोत, BBC/gopalshunya

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)