गिरणी कामगार संप : मुंबईतल्या मिल बंद पडल्या आणि कामगारांची काही मुलं अशी अंडरवर्ल्डमध्ये गेली

मुंबईच्या लोअर परळ भागातली डॉन मिल

फोटो स्रोत, Getty Image / Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबईच्या लोअर परळ भागातली डॉन मिल
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

गिरणीतली धडधडणारी चाकं बंद झाली... भोंगाच्या आवाज शांत झाला... गिरण्यांच्या चिमणीतून धूर निघत नव्हता... मुंबई, 'भारताचं मॅन्चस्टर' उध्वस्त झालं होतं.

संपामुळे गिरण्या बंद पडल्या. लाखो मिल कामगार बेकार झाले, कुटुंबं देशोधडीला लागली. घरात पैसा नसल्यामुळे आर्थिक चणचण जीवघेणी झाली. बेकारी, हाताला काम नाही, त्यामुळे गिरणी कामगारांची मुलं, सहज मिळणाऱ्या पैशाकडे आकर्षित होऊन गुन्हेगारीकडे वळली.

वरिष्ठ पत्रकार प्रभाकर पवार सांगतात, "गिरण्या बंद झाल्यामुळे मुलांचं शिक्षण, बेकारी, घरी चूल कशी पेटणार? असे ज्वलंत प्रश्न गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबापुढे होते." हेच प्रमुख कारण होतं, गिरणी कामगारांची मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचं.

गिरणी कामगारांच्या कुटुंबाशी थेट संबंध असणारे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय प्रमुख दोन चेहरे होते. भायखळ्यातील दगडी चाळीतला अरूण गवळी... आणि दादरचा अमर नाईक.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया 'Let Me Say It Now' या पुस्तकात लिहीतात, "अरूण गवळी आणि अमर नाईक दोघंही गिरणी कामगारांच्या सामान्य कुटुंबातील होते. अंडरवर्ल्डमध्ये यांचा दोघांचा उदय मोठ्या झपाट्याने झाला."

अंडरवर्ल्ड डॉन बनण्याआधी अरूण गवळी मुंबईतील महालक्ष्मी मिलमध्ये कामाला होता.

गॅंगस्टर अमर नाईक

फोटो स्रोत, Prabhakar Pawar-Book

फोटो कॅप्शन, गॅंगस्टर अमर नाईक

मध्य-मुंबईतील प्रभादेवी, चिंचपोकळी, सातरस्ता, माझगाव, दादर, भायखळा, आग्रीपाडा परिसरात मोठ्या संख्येने गिरणी कामगार रहात होते. हा भाग 'गिरणगाव' म्हणून ओळखला जात होता.

कापड गिरण्यांमध्ये कामगारांच्या संघटना किंवा युनियन होत्या. कामगार युनियनवर स्थानिक गुंडांचा दबदबा होता. मिलमधील 'भाईगिरी'ला यातूनच 1980 पासून सुरूवात झाली. यात प्रमुख होता आग्रीपाड्याचा गुंड बाब्या रेशीम किंवा बाबू रेशीम.

पोलीस दलात 35 वर्षं सेवा बजावलेले ACP (निवृत्त) इसाक बागवान यांनी कापड मिलमधली भाईगिरी, मिल मजूरांच्या मुलांचं अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होणं, डोळ्यांनी पाहिलंय.

ते सांगतात, "बाब्या रेशीम गिरणी कामगारांची संघटना राष्ट्रीय मिल मजूर संघटनेत सक्रीय होता. कामगारांना धमकावणं, संप बंद पाडणं अशी त्याची भाईगिरी सुरू असायची. बाबू रेशीमला साथ मिळाली भायखळ्याच्या रमा नाईकची. रमा नाईकही कामगार युनियनमध्ये सक्रीय होता."

गॅंगस्टर बाबू रेशीम

फोटो स्रोत, iSaque Bagwan

फोटो कॅप्शन, गॅंगस्टर बाबू रेशीम

आग्रीपाड्यात बाबू रेशीम, भायखळ्यात रमा नाईक, बॉम्बे सेंट्रल भागात वालजी-पालजी गॅंग तर, रॉक्सी थिएटर परिसरात नरेंद्र नार्वेकर सक्रीय होता.

त्याकाळी "मिल मजूरांची मुलं थिएटरबाहेर तिकीटांचं ब्लॅक मार्केटिंग, स्टॅबिंग (चाकूहल्ला), धमकावणं यात मोठ्या प्रमाणावर सक्रीय होती," इसाक बागवान पुढे म्हणाले.

पण दादागिरी फक्त मिलमध्ये नव्हती. डॉकमध्ये हाजी मस्तान, युसूफ पटेल आणि करीमलाला या गुंडांचं मोठं वर्चस्व होतं. डोंगरीचा दाऊद इब्राहीम हाजी मस्तानचं काम पाहायचा.

वरिष्ठ पत्रकार प्रभाकर पवार पुढे म्हणाले, "दाऊद कोकणी मुसलमान होता. तो कायम मराठी मुलांमध्येच असायचा. त्यामुळे, गिरणी कामगारांची मुलं दाऊदच्या टोळीत सक्रीय झाली होती. भाईसाठी काम करतोय, या गोष्टीचं या मुलांना कमालीचं आकर्षणाची वाटायचं. कापड गिरण्या बंद झाल्यानंतर 1997 पर्यंत, गिरणी कामगारांची मुलं अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होती."

गॅंगमधील टोळीयुद्धात 5 मार्च 1987ला बाबू रेशीम मारला गेला. त्यानंतर रमा नाईकने गॅंगची सूत्र हाती घेतली. त्याचा भायखळा, आग्रीपाडा, लोअरपरळ भागात दबदबा वाढला. याच परिसरात कापड गिरण्याही होत्या. त्यामुळे गिरणी कामगारांची तरूण मुलं रमा नाईकच्या गॅंगसोबत जोडली गेली.

रमा नाईक आग्रीपाड्याच्या हाउसिंग बोर्ड इमारतीत राहायचा. समोरच, गिरणी कामगारांची चाळ म्हणून ओळखली जाणारी 'दगडी चाळ' होती. अरूण गवळी याच दगडी चाळीत रहाणारा एक युवक. गवळीचे वडील गिरणी कामगार होते.

निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान सांगतात, "अरूण गवळी त्याकाळी जास्त सक्रीय नव्हता. दबत-दबत तो गुन्हेगारी विश्वात अॅक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत होता."

रमा नाईकच्या संपर्कात आल्यानंतर अरूण गवळी गुन्हेगारीकडे वळला.

गॅंगस्टर रमा नाईक

फोटो स्रोत, iSaque bagwan

फोटो कॅप्शन, गॅंगस्टर रमा नाईक

मुंबईतील टोळीयुद्ध त्याकाळी भयंकर होतं. वर्चस्वाच्या लढाईत रस्त्यांवर दिवसाढवळ्या रक्तपात होत होते. दाऊद, गवळी गॅंगमधील गिरणी कामगारांची मुलं शूटआऊटमध्ये सहभागी होती. आपापसातील टोळीयुद्धात काही मुलं मारली सुद्धा गेली.

रमा नाईक पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर नाईक टोळीची सूत्र अरूण गवळीच्या हाती आली. प्रभाकर पवार पुढे म्हणाले, "रमा नाईकनंतर गिरणी कामगारांची मुलं अरूण गवळीसोबत काम करू लागली."

भायखळा, आग्रीपाडा, सातरस्ता भागात अरूण गवळीचा दबदबा वाढत होता. तर, दुसरीकडे दादरमध्ये अमर नाईक अंडरवर्ल्ड कारवायांमध्ये सक्रीय होत होता. अमर नाईकच्या गॅंगमध्येही गिरणी कामगारांची मुलं सहभागी होतीच.

या गॅंगमध्ये मुलांना काय कामं दिली जायची? प्रभाकर पवार माहिती देताना म्हणाले, "काही मुलांवर कोर्टाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. काही कामाच्या ठिकाणची रेकी करायचे. खंडणीचे निरोप पोहोचवण्याचं काम करायचे. यामध्ये काही शार्प शूटर्सही होते."

अरूण गवळी आणि अमर नाईकने ही गिरणी कामगारांची मुलं बरीच वर्षं सांभाळली, पवार पुढे सांगतात.

अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या गॅंगमध्ये असलेली दुश्मनी सर्वश्रृत होती.

अमर नाईकचा सख्खा भाऊ अश्विन नाईकला 18 एप्रिल 1994ला मुंबईच्या टाडा कोर्टात आणण्यात आलं. कोर्टातून अश्विन नाईक बाहेर पडल्यानंतर वकीलाच्या वेशात उभ्या असलेल्या एका तरूणाने अश्विनवर अंधाधुंद गोळीबार केला.

युनायटेड मिल, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images /Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या काळाचौकी परिसरातली युनाटेड मिल. अशा अनेक कापड गिरण्या 1982च्या संपानंतर कायमच्या बंद झाल्या.

निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान पुढे सांगतात, "अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईकला कोर्टाबाहेर शूट करणारा रवींद्र सावंत हा गिरणी कामगाराचाच मुलगा होता."

जोगेश्वरीत रहाणारा रवींद्र सावंत नुकताच अरूण गवळी गॅंगमध्ये शामील झाला होता.

मुंबईतील प्रसिद्ध खटाव मिल भायखळा भागातच होती. सुनील खटाव आणि अरूण गवळीचे जवळचे संबंध होते. रमा नाईक मारला गेल्यानंतर अरूण गवळीकडे आर्थिक बळ फारसं नव्हतं.

प्रभाकर पवार पुढे सांगतात, "अरूण गवळी गॅंगच्या शेकडो मुलांना सुनीत खटाव यांनी आपल्या गिरणीत नोकरी दिली होती. खटाव अरूण गवळीची अर्थवाहिनी होता."

दरम्यान, 7 मे 1994 ला प्रसिद्ध उद्योगपती आणि मिल मालक सुनील खटाव यांचा भररस्त्यात मर्डर करण्यात आला.

खटाव मिलच्या मालकाने गवळीच्या पाठी आर्थिक पाठबळ उभं केल्याचा संशय अमर नाईकला आला. प्रभाकर पवार पुढे सांगतात, "यामुळे अमर नाईकने सुनिल खटावची हत्या केली."

मुंबईतल्या गिरण्यांचं अस्तित्त्वं दाखवणाऱ्या गिरण्यांच्या अशा चिमण्या आजही पहायला मिळतात.

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या गिरण्यांचं अस्तित्त्वं दाखवणाऱ्या अशा चिमण्या आजही पाहायला मिळतात.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया त्यांच्या पुस्तकात लिहीतात, 'सुनील खटाव हत्याकांडानंतर गिरणगावातील या धेय्य नसलेल्या कामगार मुलांबद्दल मला चांगलंच कळलं.'

'गिरणगावातील या मुलांमध्ये विश्वासघात आणि पीडित असल्याची भावना निर्माण झाली होती. मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबईत, ही मुलं गुन्हेगारीकडे वळली, सहजतेने मिळणारा पैसा आणि धोकादायक आमिषांना बळी कशी पडली, हे मला समजलं' असंही ते आपल्या पुस्तकात पुढे लिहीतात.

मुंबईत अंडरवर्ल्डकडून दिवसाढवळ्या गॅंगवॉर सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी अमर नाईक आणि अरूण गवळीविरोधात मोहीम उघडली.

1994 च्या अखेरपर्यंत मुंबई पोलिसांनी अमर नाईक टोळीतील 14 गुंडांचा एन्काउंटर करून, नाईक टोळीची कंबर मोडून काढली होती. तर 1997 मध्ये अरूण गवळी टोळीतील मोठ्या शूटर्सना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार करून गवळी टोळीला मोठा धक्का दिला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)