You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘कोरोना होऊन वर्ष होत आलं, मला अजूनही वास येत नाही’
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
"कोरोनासंसर्ग होऊन आता वर्ष होत आलंय, पण मला कशाचाच वास येत नाही. औषधं, इंजेक्शननं, आयुर्वेदिक उपचार झाले. काहीच फायदा नाही," नाशिकचे महेश महाले बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होते.
वास न येणं कोरोना संसर्गाचं सामान्यत: आढळून येणारं लक्षणं आहे. जगभरात कोट्यावधी रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर वास येणं बंद झालं.
तज्ज्ञ सांगतात, की काही रुग्णांमध्ये वास न येणं हे तात्पुरतं दिसून आलं. काहींना कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन-तीन महिन्यात आपोआप पहिल्यासारखा वास येऊ लागला.
मग, महेश महाले यांना नक्की काय झालंय? वर्षानंतरही वास का येत नाहीये? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'वर्ष होत आलं, मला वासच येत नाही'
नाशिकचे रहिवासी असलेल्या महेश महाले यांना कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत 28 मार्च 2021 कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं.
तो दिवस आठवताना ते सांगतात, "घरात उदबत्ती लावण्यात आली होती. पण मला वास अजिबात येत नव्हता."
महेश यांच्या घरातील सर्व कुटुंबियांना उदबत्तीचा वास येत होता. त्यांनी मला विचारलं, "अरे, पूर्ण घरात उदबत्तीचा वास येतोय. मग तुला कसा काय येत नाही?" त्यावेळी, मला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह होतो.
उपचारानंतर महेश ठणठणीत बरे झाले. पण, वास काही परत आला नाही. त्यांनाही वाटलं होतं की काही दिवसांनंतर वास पूर्ववत होईल. पण, कोरोनामुक्त होऊन आता 10 महिने लोटलेत. महेश यांचा गेलेला वास परत आलेला नाही.
महेश पुढे म्हणाले, "काही लोकांना 10-20 टक्के तरी वास येतो. मला अजिबात येत नाही."
कोरोनातून बरा झाल्यानंतर वास का येत नाही. हे जाणून घेण्यासाठी महेश यांनी डॉक्टरांची भेट घेतली. पण फायदा शून्य.
महेश महाले पुढे सांगतात, "डॉक्टरांनी दिलेल्या 'Vitamin-C' च्या गोळ्या घेतल्या. वाफ घेतली. इंजेक्शन, आयुर्वेदीक औषध सर्वकाही करून झालं. पण कशाचाच काही फायदा झाला नाही."
माझी वास घेण्याची क्षमता परत आली नाही.
कोरोना संसर्गात रुग्णाची वास आणि चव जाते. महेश यांना पदार्थांची चव लागते. पण, वास मात्र येत नाही.
कोरोनासंसर्गात वास येणं का बंद होतं?
कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांनी वास आणि चव नसल्याची तक्रार केली होती.
तज्ज्ञ सांगतात, की कोरोना व्हायरस नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. नाकात वास ओळखणाऱ्या ऑलफॅक्ट्री नर्व्ह असतात. कोरोनाव्हायरस या नर्व्ह सिस्टिमला डॅमेज करतो किंवा इजा पोहोचवतो. त्यामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते किंवा नाहीशी होते.
मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयाचे नाक-कान-घसा विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हण सांगतात, "वैद्यकीय भाषेत याला 'व्हायरल न्यूरायटीस' असं म्हणतात." व्हायरसने नर्व्हवर हल्ला केल्यामुळे त्याला सूज येते आणि नर्व्ह काम करणं बंद करते.
नाकातील हे मज्जातंतू खूप नाजूक असतात. नाकातील सिलिअरी सेल्सना (पेशी) दुखापत झाल्यामुळे रुग्णांना वास येणं बंद होतं.
वास येण्याची क्षमता कमी होणं किंवा पूर्ण जाणं याला वैद्यकीय भाषेत 'अॅन्सोमिया' (Anosmia) असं म्हटलं जातं. तज्ज्ञ सांगतात, काहीवेळा ही तात्पुरती असते. तर, काही रुग्णांमध्ये वास न येणं हे काही महिने राहू शकतं.
वास येण्याची क्षमता फक्त कोरोनासंसर्गात कमी होत नाही. सामान्यत: होणारा फ्लू (ताप येणं) सर्दी सायनस इन्फेक्शन किंवा अॅलर्जीमुळे काही काळाकरता वास येण्यात अडथळा निर्माण होतो.
डॉ. निलम साठे मुंबईच्या केईएम रुग्णालयातील नाक-कान-घसा तज्ज्ञ आहेत. त्या म्हणाल्या, "कोरोनासंसर्गात ज्या रुग्णांना नाकावाटे ऑक्सिजन देण्यात आलाय. अशांमध्ये नाकाच्या मधील हाडाला भोक पडलेलं दिसून आलंय." म्युकर मायकोसिस आणि बुरशी इन्फेक्शनमुळे हे झालेलं आढळून आलंय.
नाकाच्या हाडाला भोक असल्याने पार्टिशन रहात नाही. त्यामुळे नाकात हवा खेळती रहाते आणि यामुळे पूर्ण नाक कोरडं होतं, डॉ. साठे पुढे सांगतात.
कोरोनामुक्त झाल्यानंतर कितीकाळ वास येणं बंद रहातं?
सामान्यत: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना काही दिवसात पुन्हा वास येऊ लागल्याचं आढळून आलंय. तर, काही रुग्ण दोन-तीन महिने झाल्यानंतर रिकव्हर होतात त्यांना वास पूर्ववत येऊ लागतो.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अॅगिलचे संशोधक प्रा. कार्ल फिलपॉट यांनी चव आणि गंध चाचणीचा 30 स्वयंसेवकांवर अभ्यास केला. ते म्हणतात, "कोरोनाव्हायरसमुळे आजारी पडून बरे झालेल्या रुग्णांना चव आणि वास घेण्याची शक्ती काही आठवड्यांनी पुन्हा परत येते."
कोरोनासंसर्गामुळे वास न येणं हा अनुभव सर्दी किंवा सामान्य फ्लूमधील नाक बंद होण्यापेक्षा अगदी वेगळा असल्याचा निष्कर्ष रुग्णांच्या अनुभवानंतर युरोपातील संशोधकांनी काढलाय.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले म्हणतात, "कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर रुग्णांना पूर्वीप्रमाणे वास येऊ शकतो." पण काही रुग्णांना मात्र अनेक दिवस झाल्यानंतरही वास येत नाही.
वेबएडीच्या माहितीनुसार, कॅनडातील संशोधकांना कोरोनामुक्त झाल्याच्या पाच महिन्यानंतरही काही रुग्णांना वास येत नसल्याचं आढळून आलं होतं.
या संशोधनाचे प्रमुख डॉ. निकोलस डूप्रे सांगतात, "कोरोना व्हायरस मेंदूच्या ऑलफॅक्ट्री बल्ब, या लहान भागात शिरकाव करत असावा." हा भाग वास आणि चव ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
व्हायरसमुळे ऑलफॅक्ट्री बल्बमधील काही पेशी मारल्या जात असतील. त्यामुळे हा दिर्घकाळ परिणाम दिसून येत असावा, संशोधक पुढे सांगतात.
काळीवेळा नाकातील वास ओळखण्याची क्षमता असलेल्या नर्व्ह कोरड्या पडल्यानेही वास न येण्याची शक्यता असते. डॉ. साठे सांगतात, "या परिस्थितीत वास न येण्याची शक्यता दीर्घकाळ किंवा बरेच वर्ष राहू शकते."
काही कोरोनामुक्त रुग्णांमध्ये विशिष्ठ प्रकारच्या गोष्टींचा वास येणं किंवा चव बदलल्याची तक्रारही आढळून आली आहे.
वास घेण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी उपचार आहेत?
कोरोनासंसर्गामुळे वास घेण्याची क्षमता हरवून बसलेल्या रुग्णांनी 'स्मेल थेरपी' घ्यावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.
या 'स्मेल थेरपी'मध्ये विविध प्रकारचे वास किंवा गंध यांची रुग्णांना ओळख करू दिली जाते. ही थेरपी काही महिने करावी लागते. जेणेकरून मेंदूला पुन्हा वास ओळखण्याची क्षमता मिळवता येईल.
नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. केवले 'स्मेल थेरपी'बाबत अधिक माहिती देतात. ते सांगतात, "यात रुग्णांना दिवसातून तीन वेळा विविध गोष्टींचा वास घेण्यास सांगितला जातो." या उपचारपद्धतीमुळे बंद नाक साफ होऊन इंद्रीय पूर्ववत करण्यास मदत मिळते.
तज्ज्ञ म्हणतात ही थेरपी फार जास्त खर्चिक नाही. याच्या मदतीने रुग्णांना हरवलेला गंध परत मिळू शकतो. संत्र, मिंट, कॉफी किंवा आल्याचं वास 'स्मेल थेरपी'त रुग्णांना काही महिने सतत घेण्यासाठी दिला जातो.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अॅगिलचे संशोधक प्रा. कार्ल फिलपॉट सांगतात, "संशोधनातून स्पष्ट झालंय की, 90 टक्के रुग्ण सहा महिन्यांच्या थेरपीनंतर पूर्णत: रिकव्हर झाले." त्यांची वास घेण्याची क्षमता पूर्ववत झाली.
ते पुढे म्हणाले, वास घेण्याची क्षमता पूर्ववत झाली नाही तरी, 'स्मेल थेरपी' मेंदूला वास ओळखण्यासाठी मदत करते.
युकेमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, "नाकात व्हिटॅमिन A चे काही थेंब टाकल्यास रुग्णांना फायदा होऊ शकतो.
डॉ. निलम साठे पुढे म्हणाल्या, नाकाची एन्डोस्कोपी केल्यानंतरही नक्की काय झालंय हे कळू शकतं.
वास न येणं हे नक्की कोरोनामुळे आहे का याला आणखी काही कारण आहे याचा तपास होणं गरजेचं आहे. सीटी स्कॅन, एमआरआय सामान्य असेल तर आपण वास कोरोनामुळे गेलाय असा अंदाज लावू शकतो.
दीर्घकाळ वास न येण्याची काही इतर कारणं आहेत?
महेश महाले यांची वास घेण्याची क्षमता कोरोनासंसर्गानंतर गेलीये. मग त्यांना वास न येण्यामागे दुसरं कारण असू शकेल? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
डॉ. केवले सांगतात अॅलर्जी, हवेतील धुलीकण, अन्य विषाणूसंसर्गामुळेही रुग्णांना वास घेण्यास अडचण निर्माण होते.
काही नाक-कान-घसा तज्ज्ञ वास न येण्यामागे नाकात तयार होणारा पॉलिपही कारणीभूत असल्याची माहिती देतात. डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणतात, "अॅलर्जीचा त्रास होत असेल तर नाकात पॉलिप तयार होतात. काहीवेळा या लहान पॉलिपकडे दुर्लक्ष होतं. याचा त्रास होऊ शकतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)