You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागचं खरं कारण आलं समोर
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं. या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे.
या अहवालानुसार यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशा शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खराब हमामानामुळं हा अपघात घडल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये बिपिन रावत यांच्या Mi-17 V5 या हलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्या अपघातात बिपीन राव यांच्यासह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता.
या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात मृत्यूचं कारण देण्यात आलं आहे.
तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची समिती
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते. त्यात तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या चौकशी समितीच्या पथकानं फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर यांच्यातील माहितीचा अभ्यास केला. त्याचबरोबर घटनेच्या सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदवले.
त्यावरून कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं कोणत्याही प्रकारचा यांत्रिक बिघाड, घातपात, निष्काळजीपणा ही अपघाताची कारणं असण्याची शक्यता फेटाळलीय.
हवामान बदलामुळं अंदाज चुकला
हवानात अचानक झालेल्या बदलामुळं हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरलं होतं. त्यामुळ वैमानिकाचा अवकाशीय म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर कोसळलं, असं या अहवालात म्हटलं आहे.
या संपूर्ण चौकशीत आढळलेल्या तथ्यांच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं काही सूचना केल्या असून त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतला जात आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी जनरल बिपीन राव यांनी त्यांच्या पत्नीसह तमिळनाडूच्या सुरूर एअर बेसवरून ऊटी जवळच्या वेलिंग्टनमध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण घेतलं होतं.
मात्र, या प्रवासा दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मधुलिका आणि केबिन क्रू तसंच रावत यांचा स्टाफ असे एकूण 14 जण होते. सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)