Vodafone ने भारतीय बाजारपेठेतून गाशा गुंडाळलाय का?

व्होडाफोन

फोटो स्रोत, AFP

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम बाजारपेठ आहे. ही गोष्टच भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील यशाची साक्ष देते.

चीननंतर भारतात 1.18 अब्ज ग्राहक फोन वापरतात. 765 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहकांसह भारत जगातील डेटाचा सर्वांत मोठा वापरकर्ता आहेत. स्वस्त किंमती आणि व्यापक उपलब्धता यामुळे इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे.

असं असलं तरी, हे आकडे टेलिकॉम उद्योगातल्या आतल्या गोंधळाची गोष्ट सांगत नाहीत. व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 35.8% शेअर्स सरकारला देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

सध्या वाईट स्थितीत असलेल्या ऑपरेटरमधील जवळपास 36% भागभांडवल सरकार उचलण्याची शक्यता आहे. बाकीचा भाग त्यांची संयुक्त भागीदारी असलेल्या ब्रिटीश-मालकीचा व्होडाफोन समूह (28.5%) आणि भारतातील आदित्य बिर्ला समूह (17.8%) यांच्याकडे सोडला जाईल.

व्होडाफोन आयडिया दोन्ही बाबतीत तोट्यात आहे. रोख रक्कम (पाच वर्षांत नफा झाला नाही) आणि ग्राहक (गेल्या वर्षी 10% बेस गमावल्यानंतर 253 दशलक्ष). गेल्या वर्षी कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितलं की, "जर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ऑपरेटर दुकान बंद करेल."

कन्व्हर्जन्स कॅटॅलिस्ट कन्सल्टन्सी फर्मचे भागीदार जयंत कोल्ला म्हणाले, "बहुसंख्य भागभांडवल सोडणे हा स्पष्टपणे कंपनीसमोरचा शेवटचा पर्याय होता. तो त्यांचा भारतीय बाजारपेठेतून गाशा गुंडळण्याचा प्रयत्नही होता."

तीन खाजगी ऑपरेटर्स मिळून व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ आणि एअरटेल एकत्रितपणे भारताच्या सेल्युलर बाजारपेठेचा सुमारे 90% हिस्सा उचलतात. उर्वरित भाग मुख्यत्वे सरकारी भारत संचार निगम लिमिटेडकडे (बीएसएनएल) आहे. हा मोबाईल बाजारपेठेतील किरकोळ हिस्सा असला तरी तो देशातल्या दुर्गम भागापर्यंत पोहोचला आहे.

"समजा, व्होडाफोन ही एखादी बॅंक किंवा अर्थविषयक संस्था असती तर त्याबद्दल असं म्हटलं गेलं असतं की ही कंपनी इतकी मोठी आहे की कंपनी अपयशी ठरूच शकत नाही. पण गोष्ट अशीच आहे, ही कंपनी खरंच खूप मोठी आहे, तिच्यावर अपयशी असल्याचा शिक्का बसूच शकत नाही," असं अर्थतज्ज्ञ विकेल कौल सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

व्होडाफोन आयडियाच्या पतनाने गोष्टी सहजच बिघडल्या असत्या. भारतातील बँका बुडीत कर्जाच्या नव्या वादळाखाली गाडल्या गेल्या असत्या. महत्त्वाचे म्हणजे, भारतातील दूरसंचार क्षेत्रात केवळ दोन पुरवठादार कंपन्यांनी वर्चस्व गाजवलं असतं.

"एक अब्जाहून अधिक ग्राहक असलेल्या देशात, चार ऑपरेटर आदर्श आहेत. यातला एक भाग उचलून सरकारने उद्योग संरचनेत संतुलन राखण्यासाठी एक रिलिफ पॅकेज दिले आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना देखील सकारात्मक संकेत मिळेल," असं गुंतवणूक आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA मधील सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. अंकित जैन सांगतात.

2017 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केला. त्यांनी रिचार्जचे दर कमी करून व्हॉईस मार्केटला डेटामध्ये पुनर्निमित केलं. तेव्हापासून भारताच्या दूरसंचार उद्योगात एक वादळ सुरू आहे.

व्हीडिओ कॅप्शन, केंद्र सरकारकडे व्होडाफोन आयडियाचा 36% हिस्सा का देण्यात येतोय? सोपी गोष्ट 511

दर ठरवण्यावरून टेलिकॉम कंपन्यांची एकमेकांशी सुरू असलेली रस्सीखेच, सरकारला बाकी असलेली देणी, जसं की स्पेक्ट्रमची बाकी रक्कम आणि कंपन्यांना मिळालेल्या महसुलातील सरकारचा हिस्सा या गोष्टींमुळे नफा कमी झाला. कमी दर ठेवल्यामुळे आणि सरकारची देणी वाढल्यामुळे नफ्यात होणाऱ्या घसरणीमुळे गोष्टी आणखी बिघडतच गेल्या, असं जैन सांगतात.

गेल्या सप्टेंबरमध्ये, सरकारने अडचणीत असलेल्या थकबाकीवर ऑपरेटर्सना चार वर्षांची स्थगिती देऊ केली जेणेकरून त्यांना देय परतफेड करण्यासाठी, नेटवर्क वाढवण्यासाठी आणि स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी पुरेशी रोख बचत करण्यात मदत होईल. नोव्हेंबरमध्ये, ऑपरेटर्सनी जाहीर केलेल्या 10 मोबाइल प्लॅनमध्ये 20 टक्क्यांनी दर वाढवले, ज्यामुळे किंमतीतल चढाओढ काहीशी कमी झाली. आता चेंडू ऑपरेटर्सच्या कोर्टात परत आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, AFP

सरकारच्या या निर्णयाबद्दल गुंतवणूकदार उत्साही दिसत नाहीत. व्होडाफोन आयडियाचे शेअर्स घोषणेनंतर जवळपास 21% घसरले. ही गेल्या वर्षभरातील जवळपास सर्वांत मोठी घसरण होती. तोट्यात चालणाऱ्या उद्योगांमध्ये निर्गुंतवणूक करण्याच्या सरकारच्या धोरणाचा ते भाग असावे, असं त्यांचं मत आहे.

ऑक्टोबरमध्ये सरकारने तोट्यात चालणारी एअर इंडिया कंपनी देशातील सर्वांत मोठ्या टाटा समूहाला विकली होती.

काही तज्ज्ञ म्हणतात की, सरकार इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत नेमकं काय करतंय जेव्हा ते स्वतः तोट्यात गेलेली एक कंपनी चालवत आहेत. जर सरकार व्होडाफोनच्या मदतीला धावलं तर ते त्यांना फायद्याचं ठरू शकतं कारण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक मोठी कंपनी येईल. ज्याचा उपयोग ते नंतर दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकण्यासाठी करू शकतील.

व्होडाफोनची ही गोष्ट तुम्हाला भारतीय बाजारपेठेबद्दल काही गोष्टी सांगते. दर वाढल्यामुळे स्वस्त डेटाचे दिवस संपले असतील, पण असं असलं तरी देश हा किमतींबाबत नेहमीच एक संवेदनशील बाजारपेठ असेल. संपूर्ण भारतात पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या नवीन खेळाडूला सध्याच्या किंमती कमी करण्यासाठी प्रचंड पैशाची आणि पुरेशा भागधारकांच्या समर्थनाची आवश्यकता असेल.

तोवर हे लक्षात ठेवा की, एका दशकापूर्वी भारतात 15 ऑपरेटर होते. आज प्रामुख्याने चार आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)