कोरोना : ट्रॅव्हल एजन्सीचा मालक ते डिलिव्हरी बॉय, या व्यक्तीवर अशी वेळ का आली?

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

फोटो कॅप्शन, निखिल पारगावकर - आधी व नंतर
    • Author, निखिल पारगावकर
    • Role, बीबीसी मराठीकरिता

ट्रॅव्हल एजन्सीचा मालक ते घर चालवण्यासाठी घरोघरी जाऊन फूड प्रॉडक्ट डिलिव्हरी करणारा बॉय. कोव्हिड-19 संसर्गाच्या खडतर काळातील हा माझा प्रवास आहे.

2021 या वर्षाने काहींचं सर्वस्व हिरावून घेतलं तर काहींना नवं आयुष्य दिलं. बीबीसी मराठीवर पाहूया अशा काही लोकांच्या कहाण्या, ज्यांचं आयुष्यच या वर्षाने बदलून टाकलं.

त्यापैकी एक आहेत निखिल पारगावकर. निखिल यांनी सांगितलेली त्यांची ही कहाणी त्यांच्याच शब्दांत...

बॉय...हा शब्द मुद्दामच वापरतोय. कारण काही लोक तोंडावर नाही. पण, पाठीमागे नक्कीच बोलत असतील. पण मी याची लाज बाळगली नाही. समाज काय म्हणेल याच विचार केला असता तर, पुढे जाऊ शकलो नसतो. नवी वाट शोधू शकलो नसतो.

मला हे काम करावं लागेल. याचा कधीच विचार केला नव्हता. पण, जगण्याचा संघर्ष सर्वकाही शिकवून जातो. मी लोकांपुढे हात पसरण्याऐवजी स्वत: पुन्हा पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत होतो.

या आजाराची मला मिळालेली सर्वांत मोठी शिकवण म्हणजे 'एक-एक' रूपयाची किंमत.

ऑर्डर मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट, एक-एक डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी केलेली पायपीट, प्रचंड मेहनत, प्रसंगी 20-20 किलोचं ओझं खांद्यावर उचलून डिलिव्हरी करणं. अन्न वाया गेल्यामुळे झालेलं आर्थिक नुकसान आणि मग त्यातून हातात पडणारे एक, 'दोन' किंवा पाच रूपये.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

एसी ऑफिसमध्ये काम करताना मोठे-मोठे प्रॉफिट असायचे. त्यामुळे त्याची किंमत बहुदा कळत नव्हती. आता एकेक रूपया मिळवण्यासाठी किती झगडावं लागतं,हे मला कोरोनाने शिकवलंय. कोरोनाने मला मानसिकदृष्ट्या कणखर बनवलंय.

कोरोनाची झळ सर्वांत आधी ट्रॅव्हल सेक्टरला बसली. काम अचानक ठप्प झालं. हातात पैसा नव्हता. हे संकट किती दिवस चालेल, काही महिन्यात संपेल का काही वर्ष असंच सुरू राहिल? या प्रश्नाचं ठोस उत्तर कोणाकडेच नव्हतं.

या अनिश्चिततेमुळे ऑफिसचा कंम्फर्ट झोन आणि सूट-टायचा नाद सोडून, आता घर चालवण्यासाठी हातपाय मारावे लागणार, याची मला जाणीव झाली होती.

पण मी एकटाच नव्हतो. माझ्यासोबत काम करणारे सहकारी होते. त्यांचं काय? इतर कंपन्यांप्रमाणे मी त्यांना जायला सांगू? काय करू? हा प्रश्न माझ्याही मनात घोंघावत होता. पण, मी धीर न सोडण्याचा आणि काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

भारतभर फिरल्यामुळे कानाकोपऱ्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ, वस्तू यांची माहिती होती. मग डोक्यात एक कल्पना सूचली. या गोष्टी मुंबईकरांना उपलब्ध करून दिल्या तर? आणि अशा पद्धतीने सुरू झाला फूड प्रॉडक्ट डिलिव्हरीचा व्यवसाय.

हा प्रवास अत्यंत कठीण आणि खडतर होता. पण मला साथ मिळाली घरच्यांची आणि स्टाफची. कोरोनामध्ये मी स्टाफला काढलं नाही. त्यांना फूड प्रॉडक्ट डिलिव्हरीच्या व्यवसायात समावून घेतलं. पैसे भलेही कमी मिळत असतील, पण हेतू एकच होता, त्यांचंही घर सुरू रहायला हवं.

लोकांना फोन करून, सोशल मीडियाचा वापर करून, मित्र-मैत्रीणी कुटुंबियांच्या मार्फत मी फूड डिलिव्हरीचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

मला एक दिवस खांद्यावर पिशव्या आणि डिलिव्हरी बॉक्स उचलून पायपीट करावी लागेल हा विचार मी कधीच केला नव्हता. एसी ऑफिसमधून अनेक गोष्टी बसल्या-बसल्या एका क्लिकवर होऊन जायच्या. पण, आता मेहनतीशिवाय काहीच पर्याय नाही, हे मला कळून चुकलं.

सुरूवातीला ऑर्डर मिळवण्यासाठी खूप अडचणी आल्या. तर, काहीवेळा माल घेऊन विकला न गेल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. पण, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जायचा. म्हणतात ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही.

माझ्या या धाडसाचं काहींनी कौतूक केलं. पण, ज्यांच्यासोबत खेळलो-वाढलो त्यांच्याकडून अपमानही सहन करावा लागला. उच्च शिक्षित आहात, ही काय छोटी-छोटी कामं करताय, असं म्हणून हिणवलं गेलं. ही वागणूक फार वाईट होती.

निखिल पारगावकर यांची ट्रॅव्हल एजन्सी

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

फोटो कॅप्शन, निखिल पारगावकर यांची ट्रॅव्हल एजन्सी

पण मी ठरवलं होतं अजिबात लाजायचं किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही. मी काम करतोय, लोकांपुढे हात पसरत नाही. या विश्वासाच्या बळावर मी पुढे गेलो.

एरव्ही माझ्याकडे डिलिव्हरी घेऊन लोक येत. पण, आता मला डिलिव्हरीसाठी घरोघरी जावं लागत होतं.

कोरोना काळात काही इमारतींमध्ये प्रवेशबंदी होती. डिलिव्हरी देण्यासाठी गेलो की वॉचमन आत घ्यायचा नाही. बाहेर रस्त्यावरच उभं करायचा. हे दिवस न विसरण्यासारखे आहेत.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

मे महिन्यात आंब्याच्या पेट्या, सप्टेंबरमध्ये गणपतीची मखर, मातीपासून बनवलेल्या मुर्ती अशी सिझनल वस्तू विकण्यास मी सुरूवात केली. अनेक लोकांसोबत टाय-अप केले. फूड प्रॉडक्टचा व्यवसाय कोरोनाकाळात चांगला सुरू होता. पण, निर्बंध उठल्यानंतर लोग बाहेर पडून लागले आणि धंदा हळूहळू कमी झाला.

फूड प्रॉडक्टच्या डिलिव्हरीतून मिळणारा पैसा हा पुरणारा नव्हता. माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा विचारही होताच. त्यामुळे पीपीएफ, बॅंकेतील फिक्स डिपॉझिट आणि एलआयसी पॉलिसी तोडून पैसे उभे केले आहेत. एवढंच नाही तर, प्रसंगी सोनंही विकावं लागलंय.

याचा परिणाम मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर झालाच. पण, कुटुंबीय, मित्र आणि सहकारी पाठीशी उभे असल्याने मी धीर सोडला नाही.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आणि दिवाळीत खूप नवीन लोकांनी ट्रॅव्हल प्लान करून घेतले. माझ्या फूड डिलिव्हरीचा मला फायदा झाला. मी नवीन लोकांशी जोडला गेलो. यंदाची दिवाळी चांगली गेली.

कोरोनाची लाट ओसरताना पाहिली आणि वाटलं, चला पुन्हा चांगले दिवस आले. जोमाने कामाला लागू. पण,पुन्हा दुसरी लाट आणि परिस्थिती जैसे-थे.

आता तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती पहाता लोकांनी बुकींग रद्द करण्यास सुरूवात केलीये.

कोरोनाचं संकट कधी संपेल माहित नाही. पण काम करत रहाणं हे महत्त्वाचं आहे. लोक कितीही काही बोलूदे. तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

निखिल पारगावकर

फोटो स्रोत, Nikhil pargaonkar

पुढील वर्षात आजाराचा प्रसार झाला नाही तर लोक प्रवास करतील. पण, या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. सद्यस्थितीत तिसरी लाट आली तरी माझ्याकडे फूड प्रॉडक्टचं मार्केट बॅकअप म्हणून तयार आहे. पुढील वर्षासाठी काही नवीन संधी शोधून ठेवल्या आहेत.

कोरोना संसर्ग आपल्यासोबत काहीवर्ष असाच रहाणार आहे. लाटा येतील आणि जातील. ट्रॅव्हल व्यवसायाला पुन्हा उभारी घेण्यास थोडा वेळ लागेल. पण, याची वाट पहात हातावर हात धरून बसून चालणार नाही. नवीन मार्ग, संधी शोधायला हव्यात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)