You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परभणी: शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका, जिंतूरमध्ये काय घडलं?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
छताला लोंबकळलेल्या सलाईनच्या बाटल्या. सलाईन पाईपचं एक टोक छताला लोंबकळलेल्या बाटलीला जोडलेलं आहे, तर दुसरं टोक महिलांच्या हाताला आहे, ज्यांची नुकतीच कुटुंब नियोजनची शस्त्रक्रिया झाली आहे.
या महिलांना कॉट देखील उपलब्ध नाहीत. केवळ जमिनीवर गाद्या अंथरून त्या महिला आराम करताना दिसत आहेत. हे दृश्य आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालयाचे.
कुटुंब नियोजन करावे म्हणून सरकार विविध योजनांद्वारे लोकांमध्ये जनजागृती करून प्रोत्साहन देताना दिसतं. पण आपल्यासोबत झालेल्या प्रकारानंतर अनेक महिलांनी रुग्णालयाची पायरी कुणी चढू नये, अशा स्वरूपाच्या तीव्र भावना यापैकी काही महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना रुग्णालयाची पूर्ण व्यवस्था कोसळल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातून दुर्गम भागातून आलेल्या महिलांकडे शस्त्रक्रियेसाठी लाच मागण्यात आली अशी तक्रार देखील आली आहे.
रुग्णालयाच्या क्षमतेहून अधिक महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे सर्वांचीच गैरसोय झाली आणि महिलांना त्रासाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार जिंतूर येथे घडला आहे.
जिंतूर रुग्णालयातील एका सेवकाने महिलांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून लाच मागितल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे. जिंतूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकिरण चोंडगे यांनी यासंबंधी कारवाईचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रकाराची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर जिंतूर रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
नेमके काय घडले?
परभणीपासून 44 किमी अंतर असलेल्या जिंतूर या तालुक्याच्या ठिकाणी 2 आणि 3 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ग्रामीण रुग्णालयाची एकूण क्षमता 50 बेडची असताना 100 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी कॉटदेखील उपलब्ध नव्हते. दुसऱ्या हॉलमध्ये गाद्यांची व्यवस्था करून या महिलांना आराम करण्याचे सांगितले.
छताला दोऱ्या बांधून काही महिलांना सलाईन देण्यात आले.
या शिबिरात ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्या सीमा निकाळजे यांनी सांगितले की, "आमची तिथे काहीच सोय करण्यात आली नाही. ऑपरेशननंतर खाली गाद्या टाकून देण्यात आल्या. तिथे पाण्याची देखील व्यवस्था नव्हती. केव्हा दवाखान्याला परत भेट द्यायची किंवा काय काळजी घ्यायची हे देखील आम्हाला सांगण्यात आले नाही."
सीमा निकाळजे यांचे पती सिद्धार्थ निकाळजे यांनी सांगितले की, "रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते. जर कुणी नातेवाईक किंवा संबंधित असतील तरच त्यांची व्यवस्था होत होती. पण इतरांवर दमदाटी देखील करण्यात आली. ऑपरेशन झाल्यावर नर्सने दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या.
"माझ्या पत्नीला त्रास जाणवू लागल्यानंतर आम्ही त्यांना फोन करून विचारले, तर ऑपरेशननंतर त्रास होतच असतो असे उत्तर देण्यात आले. पुन्हा कधी भेटायचे काय, याबद्दल काहीच बोलण्यात आले नाही."
'वारंवार पाठपुरावा करून देखील सुविधा उपलब्ध नाहीत'
जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या प्रकारानंतर बीबीसी मराठीने जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डिकर यांची प्रतिक्रिया घेतली.
त्यांनी सांगितले की, "रुग्णालयाची क्षमता 50 खाटांची होती आणि त्यादिवशी महिला 100 आल्या. पुन्हा नंतर ऑपरेशनची तारिख कधी मिळेल या विचाराने महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याच दिवशी ऑपरेशन करण्याची मागणी केली. त्यामुळे रुग्णालयातील व्यवस्था कोलमडली."
"जिंतूर ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा नाहीत, त्यांचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे पण या ठिकाणी योग्य उपकरणे नाहीत. येथे मनुष्यबळाची कमतरता आहे. भरती प्रक्रियेतून त्वरित येथील जागा भरण्याची आम्ही आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे विनंती केली आहे. पण अद्याप येथील जागा रिकाम्याच आहेत," असंही बोर्डिकर म्हणाल्या.
जिंतूर रुग्णालयात झालेल्या प्रकाराबाबत बीबीसी मराठीने पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला. याबाबत माहिती घेऊन उत्तर देतो, असे ते म्हणाले.
"मी पालकमंत्री म्हणून माहिती घेतो. पण हा आरोग्य विभागाचा विषय आहे. आरोग्य मंत्री याबाबत योग्य ती कार्यवाही करतील. पण जर असं काही घडलं असेल तर सरकार त्याला पाठीशी घालणार नाही," असं नवाब मलिक म्हणाले.
बीबीसी मराठीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया येताच या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.
'भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी होणार'
महिलांकडून 1,500 रुपयांची मागणी करण्यात आल्याचे अनेकांनी म्हटले आहे. याबाबतच्या तक्रारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकिरण चांडगे यांच्याकडे आल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले अशी तक्रार पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आली आहे. त्याबाबत आम्ही एक चौकशी समिती स्थापन केली आहे. फक्त कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले की आणखी इतर लोकही यामध्ये सामील आहेत का हे तपासण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल."
'गॅप अनालिसिस झाला आहे' - जिल्हा शल्य चिकित्सक
जिंतूर येथे आरोग्य सुविधांचा अभाव आणि मनुष्य बळाची कमतरता असल्याची कबुली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.
डॉ. नागरगोजे म्हणाले, "शासनाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिंतूर येथे कोणत्या गोष्टींची कमतरता आहे याबद्दल गॅप अनालिसिस करण्यात आला आहे. ज्या वस्तूंची कमतरता आहे त्यांची आपण लवकरात पूर्तता करणार आहोत. सर्वप्रथम सोनोग्राफी मशीन या सेंटरला देण्यात येईल."
राज्यात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जर कोरोनाची लाट तीव्र स्वरूपात आली, तर जिंतूरचे रुग्णालय लोकांना सेवा पुरवण्यास सक्षम आहे की नाही, अशी भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आता क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण आल्यानंतर रुग्णालयाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. जर कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली तर आमचे कसे होईल असा सूर देखील स्थानिक नागरिकांमध्ये दिसत आहे.
"जिंतूरची लोकसंख्या 40-45 हजार आहे. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर ही एकमेव सरकारी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे. तेव्हा या व्यवस्थेवर खूप तणाव पडतो," असे सामाजिक कार्यकर्ते अॅड. माधव दाभाडे यांनी सांगितले.
"50 खाटा म्हणजे फारच कमी आहेत. कोव्हिडची लाट तीव्र आली तर काय होईल असा प्रश्न जनसामान्यांना भेडसावत आहे," असं दाभाडे म्हणाले.
कोव्हिड नियोजनाबाबत डॉ. नागरगोजे म्हणाले, "कोव्हिडच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली असून जिंतूर येथे अतिदक्षता विभागात अतिरिक्त दहा खाटांची व्यवस्था करण्यात येईल. भरती प्रक्रियेच्या माध्यमातून लवकरात लवकर जागा भरण्यात येतील आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल."
(या बातमीसाठी प्राजक्ता पोळ यांनी मुंबईहून इनपुट्स दिले आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)