चंद्रपूर: गावठी बॉम्बचा जबड्यात स्फोट झाल्याने वाघिणीचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून
वाघिणीच्या जबड्यात गावठी बॉम्ब फुटल्याने चंद्रपूरच्या पोंभुर्ण्यात जखमी झालेल्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. मानव आणि वन्य प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.
ही वाघीण 8 ते 10 वर्षांची असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. स्फोटामुळे या वाघिणीच्या जबड्याचा खालचा भाग पूर्णपणे तुटला होता.
जबड्याचा हा भाग तर तुटून लटकल्याच्या अवस्थेत होता, असं वाघिणीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "जबडा तुटल्यामुळे वाघीण काहीही खाऊ शकत नव्हती किंवा लिक्विड फूड गिळू शकत नव्हती. आम्ही तिला उकडलेली आणि कच्ची अंडी देण्याचा प्रयत्न केला.
"पण ती पाणीसुद्धा पिऊ शकत नव्हती. मागील 10 ते12 दिवसांपासून या वाघिणीने काहीही खाल्ले नसल्याने तिला पूर्णपणे डिहायड्रेशन झाले होते. जबड्याच्या खालच्या भागातील दात तुटले होते," असं उपाध्ये यांनी सांगितलं.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी माहिती दिली की, "पोंभुर्ण्यातील जमाव एका लपून बसलेल्या वाघाच्या मागे लागलाय, अशी माहिती आम्हाला मिळाली होती.
"पोंभुर्ण्यातील चिंतलधाबा-आष्टी रस्त्याच्या खालून वाहणाऱ्या एका पाण्याच्या पाटाच्या पाईपमध्ये ही वाघीण लपली होती. हा पाईप दुसरीकडून बंद असल्याने प्रकाश तसा कमी होता. पण जेव्हा आम्ही तिला पिंजऱ्यात घेतलं, तेव्हा तिच्या जबड्याचा खालचा भाग तुटला होता," खोब्रागडे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, "एखाद्या गावठी स्फोटाने तिचा खालचा जबडा तुटला असावा असं स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगत होते. पण असे असेल तर मग वरचा जबड्याला मार का लागला नाही? हा प्रश्न आम्हाला पडला. मग रानडुक्कराच्या शिकारीच्या वेळेस हा मार जबड्याला लागला असावा अशी शक्यता होती. पण त्या शक्यतेतही जबडा तुटू शकत नाही."
"वाघिणीच्या जबड्याचा खालचा भाग स्फोटामुळे तुटला हे शंभर टक्के खरे आहे. याआधीही 2003 मध्ये मेळघाटात विजेचा शॉक लागून वाघीण आणि तिच्या पोटातील तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना देखील अशीच धक्कादायक आणि क्रूर प्रकारची आहे." असे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

फोटो स्रोत, Praveen Mudholkar/BBC
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा भागाचे वनाधिकारी अरविंद मुंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मध्य चांदा रेंजमध्ये 23 डिसेंबर रोजी आम्ही वाघिणीचे रेस्क्यू केले. जखमी वाघिणीला नागपूरच्या गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात पाठवले.
"उपचारादरम्यान तिचा 26 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. रानडुकराच्या दातामुळे शिकारीच्या वेळेस झालेल्या झटापटीतून ही जखम झाली असावी. पण याची पूर्ण माहिती ही पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच पुढे येऊ शकेल," मुंडे यांनी सांगितले.
या वाघिणीचा गेल्या काही महिन्यापासून पोंभुर्णा परिसरात वावर होता.
"परिसरातील तीन जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील ग्रामस्थ धास्तावले होते. वाघिण दिसताच गावकऱ्यांनी तिला पिटाळून लावण्यासाठी रानडुकरांना मारण्यासाठी वापरतात ते गावठी बॉम्ब वाघिणीवर फेकले. यातील गावठी बाॉम्ब वाघिणीने खाल्ला असता त्याचा स्फोट झाला आणि वाघिणीच्या जबडा तुटला," असं प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी मराठीला सांगितले.
वनविभागाने 12 डिसेंबर रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीला ही जखम असल्याचं रेकॉर्ड झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही जखम 15 ते 20 दिवस जुनी असल्याचं वाघिणीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT
या जखमेमुळेच शिकार करता येत नसल्यामुळे वाघीण परिसरातील गावातील शेळ्या ठार करून खायची. पण गावकऱ्यांनी तिला 23 डिसेंबरला पिटाळून लावल्याने ती पाटाच्या पाईपमध्ये लपून बसली होती.
या वाघिणीचा 26 डिसेंबरला नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर याच ठिकाणी पोस्टमार्टम करण्यात आलं.
वाघिणीच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमालीचे घटले होते. स्फोटामुळे तिचा जबडा पूर्णपणे तुटला असल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. वाघिणीच्या जबड्याला दुखापत नेमकी कशामुळे झाली? यासाठी वाघिणीच्या मृत शरीराचे फॉरेंसिक सॅम्पल वन विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत.

फोटो स्रोत, Praveen Mudholkar/BBC
वर्षभरात राज्यातील 42 वाघांचे मृत्यू विविध कारणांमुळे झाल्याचं राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. या आकडेवारीत वाघांचे मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे जास्त झाले आहेत.
याप्रकरणी वाघिणीचा मृत्यू हा स्फोटकांनी किंवा इतर कुठल्याही मानवी हल्ल्यात झाला असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जर उघड झाले तर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे वनविभागाने सांगितले आहे.
"या कृत्यामागे कुणी दोषी आहेत काय? त्यांना शोधण्यासाठी आम्ही यंत्रणा कामाला लावली आहे," असंही वन विभागाने सांगितले आहे.
माणूस आणि प्राण्यांमधला हा संघर्ष चंद्रपूरच्या वन क्षेत्रासाठी नवा नाही. जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला लागून आणखी चार- पाच वनक्षेत्र आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"वाघाचा एवढा जबडा फाटलेला आम्ही कधी पूर्वी पाहिला नाही. माणूस आणि प्राण्यांमधला संघर्ष या आधीही पहायला मिळालेला आहे. पण पहिल्यांदाच स्फोटकांनी अशाप्रकारे एखाद्या वाघिणीला जखमी करण्यात आलं आहे. मुळात गावठी बॉम्ब फेकल्याशिवाय म्हणजेच घर्षण झाल्याशिवाय फुटत नाहीत.
"वाघाचे बछडे हे अनोळखी वस्तू तोंडात कधीतरी उत्सुकतेपोटी उचलतात. पण वाघीण प्रौढ असल्याने ही शक्यताही नाही," असे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले.
जंगलात घडणाऱ्या वन्यजीवांच्या संदर्भातील गुन्ह्यामध्ये 90 टक्के प्रकरणात प्रत्यक्षदर्शी नसतात. या प्रकरणात पाचशे - हजार लोक एका वाघिणीला अडवून तिचा पाठलाग करताना दिसतात.
ह्या प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार कारवाई व्हावी ही अपेक्षा असल्याचे किशोर रिठे यांनी सांगितले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








