जेव्हा एक वाघच दुसऱ्या वाघाला खातो...

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वाघ हा शिकार करून जगतो, हे अगदीच शालेय पातळीवरचं सामान्य ज्ञान आहे. मात्र वाघानं दुसऱ्या वाघालाच मारून खाल्ल्याची अपवादात्मक घटना मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. वाघानं वाघाला खाणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.

कान्हा नॅशनल पार्कमधील रिसर्च ऑफिसर राकेश शुक्ला यांनी सांगितलं, 19 जानेवारीला पार्कमध्ये गस्त घालत असताना एका वाघाची हाडं सापडली. या वाघाला दुसरा एक वाघ खात असल्याचंही पाहण्यात आलं होतं.

वाघानं ज्याची शिकार केली तो वाघच होता की वाघिण हे मात्र अजूनही स्पष्ट झालं नाही. सापडलेल्या हाडांवरून हे नक्की कळतंय की मारला गेलेला वाघ वयात आला नव्हता. या वाघाचं वय साधारण दीड वर्ष असावं. शिकार करणाऱ्या वाघाचं वय चार ते पाच वर्षें असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही वाघांमध्ये लढाई झाली होती.

आपल्याच प्रजातीच्या प्राण्याला मारून खाणं हे नैसर्गिक समजलं जात नाही. या प्रकाराला 'कॅनिबलिजम्' असं म्हणतात. जसं माणसांमध्ये हा प्रकार अनैसर्गिक मानला जातो, तसंच दुसऱ्या प्रजातींमध्येही ही गोष्ट सामान्यपणे दिसून येत नाही.

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

दोन वाघांमध्ये लढाई होणं स्वाभाविक आहे, मात्र दुसऱ्या वाघाला खाण्यासारखी परिस्थिती का उद्भवली असावी, हा प्रश्न कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रकारामुळे निर्माण झाला आहे.

या घटनेबद्दल बोलताना वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी म्हटलं, की ही गोष्ट खूप दुर्मिळ असली तरी अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही पाहण्यात आल्या आहेत. ही सवय 'मार्जार कुळा'तील प्राण्यांमध्ये दिसून येते. लढाईमध्ये ते प्रतिस्पर्ध्यांना केवळ मारतच नाहीत, तर त्यांचं मांस भक्षणही करतात.

अजय दुबे सांगतात, "लढाई करताना वाघ खूप संतापला तर अशी कृती करू शकतो. तो हे भूक भागवण्यासाठी नाही करत. याचा अर्थ त्याला प्रचंड राग आला आहे, हा असतो. तो प्रतिस्पर्ध्याला केवळ मारून थांबत नाही, तर त्याचं शवही छिन्न-विछिन्न करतो."

वन्यजीव अभ्यासक आणि लेखक वाल्मिक थापर यांनी सांगितलं, की भारतात वाघांमध्ये आणि जगभरात सिंहांमध्ये अशाप्रकारचं वर्तन दिसून येतं.

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातही हा प्रकार घडला होता. वाघ इतक्या त्वेषानं एकमेकांशी लढतात की प्रतिस्पर्ध्याच्या मृतदेहाचेही लचके तोडतात. अर्थात, वाघ मारलेल्या प्रतिस्पर्ध्याला सोडणार की खाणार याबद्दल कोणतेही आडाखे बांधता येत नाहीत. ही गोष्ट केवळ वाघाच्या त्यावेळच्या विचारांवर अवलंबून असतं.

वाघांमध्ये एवढा जीवघेणा संघर्ष होतो का?

वाघ आणि वाघिणींमध्ये लढाई होण्याची वेगवेगळी कारणं असतात, असं अजय दुबे यांनी सांगितलं. वाघांमध्ये मुख्यतः हद्द ठरवण्यावरून लढाई होते. एक वाघ जेव्हा दुसऱ्या वाघाच्या हद्दीत घुसतो तेव्हा त्यांच्यामध्ये संघर्ष होतो. हा संघर्ष कधीकधी इतका विकोपाला जातो, की दुसऱ्या वाघाला मारून खाल्लं जातं.

अजय दुबे सांगतात, "वाघिणी आपली हद्द आखत नाहीत. त्यामुळे त्यांची लढाई जागेवरून होत नाही. वाघ आणि वाघिणीमधल्या लढाईचं कारण हे मेटिंग किंवा समागम हे असतं."

यातही दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं अजय दुबे यांनी सांगितलं. "कधीकधी वाघिणीनं मेटिंगला नकार दिला तर वाघ तिच्यासोबत लढतो. बऱ्याचदा वाघीण आपल्या बछड्यांमुळे मेटिंगला नकार देते," असं दुबे यांनी म्हटलं.

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

वाघिणीचे बछडे दोन वर्षांपर्यंत तिच्यासोबत राहतात. अशावेळी वाघ त्या बछड्यांना मारू शकतो. म्हणून बछडे नसतील तरच वाघीण मेटिंगसाठी तयार होते. केवळ वाघच नाही तर सिंह आणि बिबट्यामध्येही ही प्रवृत्ती दिसून येते.

वाघांच्या लढाईसंदर्भात राकेश शुक्ला यांनी अजून एक कारण सांगितलं. "कित्येकदा दोन वाघ एका वाघिणीसाठी एकमेकांशी लढतात.

आपल्या आईपासून स्वतंत्र होऊन रहायला लागलेल्या बछडयामध्ये मोठ्या वाघाइतकी परिपक्वता नसते. अशावेळी मोठ्या वाघाशी सामना झाला तर बऱ्याचदा लढाईमध्ये छोट्या वाघाचा मृत्यू होतो."

कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघांची घनता सर्वाधिक आहे. त्यामुळेच इथं हद्द आणि वाघीण या दोन कारणांवरून वाघांमध्ये संघर्ष होताना पहायला मिळतो.

वाघ

फोटो स्रोत, Getty Images

वाघानं दुसऱ्या वाघाला मारून खाणं हे त्याच्या मानसिक स्थितीकडेही निर्देश करतं.

अजय दुबेंनी सांगितलं, "वाघांमधली आक्रमकता ही तणावामुळं येऊ शकते. वाघांमध्ये तणाव कसा, हा प्रश्न पडू शकतो. पर्यटकांचा लोंढा हे वाघांमधल्या तणावाचं कारण असू शकतं. त्यामुळेच असे विचित्र प्रकार घडू शकतात."

वाघांमध्ये हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात, हे राकेश शुक्लादेखील मान्य करतात. मात्र पर्यटकांची वाढती संख्या हे तणाव आणि हार्मोनल बदल हे त्यामागचं कारण असल्याचं त्यांना वाटत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)