You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुवर्ण मंदिरानंतर कपूरथलामध्येही अवमानाची घटना, पंजाबमध्ये तणाव वाढला
कपूरथलाच्या निजामपूर गावातही गुरुद्वारा साहिबमध्ये आज (19 डिसेंबर) सकाळी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. कपूरथला सिव्हिल हॉस्पिटलचे एसएमओ संदीप धवन यांनी या घटनेला दुजोरा दिला.
निजामपूर गावात घडलेला प्रकार अवमानाचा नसून चोरीचा आहे, असा दावा कपूरथलाचे एसएसपी हरकंवलप्रीत सिंह यांनी केलाय.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार प्रदीप पंडित यांनी एसएसपींसोबत फोनवरून बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, हे प्रकरण अवमानाचं नाहीय. दरबार साहिबच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तिच्याशी जोडली जात आहे.
याआधी गुरुद्वाराचे ग्रंथी अमरजीत सिंह यांनी व्हीडिओ पोस्ट करून दावा केला होता की, गुरुद्वारा साहिबमध्ये अवमानाच्या हेतूने आलेल्या एका व्यक्तीला पकडण्यात आलंय. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही व्यक्ती गुरुद्वारात दिसली आणि जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्याता आला तेव्हा पळून गेली.
त्यानंतर काही लोकांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला पकडलं आणि मारहाण करून चौकशी केली. मात्र, ती व्यक्ती दिल्लीची असल्याचीच त्याने सांगितली.
कपूरथला घटनेवर पोलिसांनी काय सांगितलं?
एसएसपी हरकंवलप्रीत सिंह यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं की, ग्रंथीने सोशल मीडियावर व्हीडिओ टाकल्यानं मोठ्या संख्येत लोक जमा झाले. कथित आरोपीला गुरुद्वाराच्या खोलीतच बंद करून ठेवण्यात आलं होतं. आरोपीला आपल्याला हाती सोपवावं, अशी मागणी लोक करत होते.
"पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मानत नव्हते. वातावरण तणावपूर्ण झाला होता. लाठीचार्जचाही इशारा दिला. मात्र, लोक जबरदस्तीने आत घुसले आणि कथित आरोपीला मारहाण केली," अशी माहिती एसएसपीनं दिली.
लोकांच्या गराड्यातून त्या कथित आरोपीला पोलिसांनी सोडवलं, तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत तो मृत्युमुखी पडला होता.
या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.
सुवर्ण मंदिरात गुरू ग्रंथ साहिब अपमान, त्यानंतर घडलेलं लिंचिंग प्रकरण काय आहे?
2015 साली फरीदकोट जिल्ह्यातील बहबल कलान येथे शीख धर्मात पवित्र स्थान असलेल्या गुरू ग्रंथ साहिबसोबत गैरवर्तणूक प्रकरणाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता.
2017 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीच्या पराभवामागे या घटनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही सांगण्यात येतं.
आता पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी पंजाबमधील सुवर्ण मंदिरात गुरू ग्रंथ साहिब गैरवर्तणुकीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी (18 डिसेंबर) संध्याकाळी ही घटना समोर आली आणि ज्या व्यक्तीवर असे कृत्य करण्याचा आरोप करण्यात आला त्याला मारहाण करून जागीच ठार मारण्यात आलं.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान एका कथित प्रकरणात तंबूबाहेर एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह टेंटबाहेर लटकवला होता. त्या व्यक्तीवरही गुरू ग्रंथ साहिब यांचा अपमान केल्याचा आरोप होता.
सुवर्ण मंदिरात काय झालं?
शनिवारी (18 नोव्हेंबर) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात घडलेल्या घटनेनंतर पोलीस उपायुक्त परमिंदरसिंग भंडाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, मारहाणीनंतर एकाचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्या तरूणाचे वय 20 ते 25 वर्षं आहे. पोलीस उपायुक्त म्हणाले, "सुरुवातीला तो शांततेत उभा होता. पण अचानक तो रुमाला साहिबजवळ पोहचला आणि त्याने तलवार उचलण्याचा प्रयत्न केला."
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाने त्याला बाहेर आणलं आणि त्याला मारहाण करताना त्याचा मृत्यू झाला. "मृतदेह शवघरात पाठवला असून रविवारी (19 डिसेंबर) पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोलिसांना त्याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र मिळाले नाही. सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्याच्यासोबत आणखी कोण होतं हे दिसत आहे."
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी या प्रकरणावर तीन ट्वीट केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत ते म्हणाले, "गुरू ग्रंथ साहिब यांचा अपमान करण्याच्या घृणास्पद प्रयत्नाचा मी निषेध करतो. एसजीपीसीच्या अध्यक्षांना फोन करून याप्रकरणात सरकार त्यांच्यासोबत असल्याचं त्यांना सांगितलं आहे."
पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांनीही ही घटना दुर्देवी आणि दु:खद असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. पंजाबच्या सर्व राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "आज श्री दरबार साहिब येथे झालेली घटना दु:खद आहे. सर्वांनाच धक्का बसला आहे. हा मोठा कट असू शकतो. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तो माणूस दर्शनासाठी रांगेत होता पण अचानक तो गुरू ग्रंथ साहिब यांच्यासाठी असलेल्या ठिकाणी गेला आणि त्याने सोनेरी तलवार उचलण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो माणूस फुलांचे ताट उचलण्याचा प्रयत्न करत होता. बलजिंदर सिंग नावाच्या प्रत्यक्षदर्शीने वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की, त्यांनी त्या व्यक्तीची दोन बोटं तोडली.
बलजिंदर म्हणाले, "आम्ही त्याला त्याच्याविषयी विचारलं पण तो म्हणाला की त्याला स्वत:बद्दलही माहित नाही. त्यानंतर संगतच्या लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याचा मृत्यू झाला.''
हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की संध्याकाळच्या अरदासचे थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे ही घटनाही लाईव्ह दिसली. हे पाहताच लोकांनी गर्दी केली.
पोलीस उपायुक्त परमिंदर सिंग भंडाल म्हणाले, "गुरुद्वारा पाहणारी कमिटी एसजीपीसीच्या लोकांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला तेजा सिंह समुद्री हॉलमध्ये नेण्यात आलं. पण तिथे जात असतानाच जमावाने त्याला मारहाण केली."
एसजीपीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या तरुणाने जी तलवार उचलण्याचा प्रयत्न केला त्यावर हिऱ्यांची पट्टी आहे. 19व्या शतकात महाराजा रणजीत सिंह यांनी दान स्वरूप ही तलवार दिली होती. हा तरुण स्थानिक वाटत नव्हता असं लोकांचं म्हणणं आहे.
घटनेच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह
अकाल तख्त जथेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी म्हटले आहे की, "निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दाम केलेले कृत्य असू शकते, अशा कृत्यानंतर जमावाने त्याला ठार मारले असेल तर याला सरकार किंवा कट रचलेला जबाबदार आहे."
ते म्हणाले, "ही दुर्देवी घटना आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्ण मंदिराच्या सरोवरात 'गुटका साहिब' ग्रंथाची पानं फेकली गेली होती आणि आता दुसऱ्यांदा एका वेड्या व्यक्तीने गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला."
SAD (D) चे अध्यक्ष परमजीत सिंह सरना म्हणाले, "त्या तरुणाला तात्काळ पकडलं यासाठी आणि ग्रंथी पाठ सुरू ठेवण्यात आला यासाठी मी त्यांचे कौतुक करू इच्छितो आणि असे निंदनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या हत्येला मी योग्य ठरवणार."
दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे माजी अध्यक्ष मनजीत सिंह जीके म्हणतात, "हा व्यक्ती मृत्यूदंडासाठी पात्र होता पण कायदेशीर प्रक्रियेनंतर." या प्रकरणाची सखल चौकशी केल्यानंतर यामागील कट-कारस्थान समोर येईल अशी मागणी त्यांनी केली आहे.
DSGMC चे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते मनजिमदर सिंह सिरसा यांनी सांगितलं, "या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण दरबार साहिब यांच्या इतिहासात असा प्रयत्न यापूर्वी कधीही झाला नाही."
काँग्रेस सरकारच्या काळात अशा प्रकरणांवर तोडगा काढण्यात अपयश आल्यानेच अशा घटना होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना का होतात हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.
गुरू ग्रंथ साहिबचं महत्त्व
पंजाब विद्यापीठाचे प्राध्यापक खालीद मोहम्मद सांगतात, "शीख धर्मियांमध्ये गुरू ग्रंथ साहिबचं महत्त्व खूप आहे. जगभरातील प्रत्येक गुरुद्वारामध्ये तुम्हाला गुरू ग्रंथ साहिब श्रद्धास्थानी आढळेल. कारण कोणताही कार्यक्रम असो शीख धर्मीय गुरू ग्रंथ साहिबचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घ्यायला विसरत नाहीत. ज्याप्रमाणे हिंदुंसाठी गीता, मुस्लीम धर्मियांसाठी कुराण, ख्रिश्चनांसाठी बायबलचे महत्त्व त्यांच्या दैनंदिन जीवनात आहेत त्याचप्रमाणे शीख धर्मियांमध्ये गुरू ग्रंथ साहिबचं महत्त्व आहे."
पंजाबच्या इतिहासात कधीही गुरू ग्रंथ साहिबचा अपमान सहन केलेले उदाहारण दिसणार नाही असंही ते सांगतात.
ते पुढे म्हणाले, गुरू ग्रंथ साहिब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना ते पालखीमधूनच घेऊन जातात.
स्थानिकांसाठी हा विषय एवढा महत्त्वाचा आणि संवेदनशील असल्याने राजकीयदृष्ट्याही त्याला तेवढेच महत्त्व आहे. यापूर्वीही गुरु ग्रंथ साहिबवरून वाद झाला होता. प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या एका घटनेत गुरू ग्रंथ साहिबची पानं फाडली गेली होती. काँग्रेसने त्याचा राजकीय मुद्दा केला होता. यावरून बादल यांचं मुख्यमंत्री पद गेलं होतं.
यासंदर्भात बोलताना खालीद मोहम्मद सांगतात, "गुरू ग्रंथ साहिब इथल्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यावेळी मला वाटतं बादल यांनी दिलेल्या स्पष्टिकरणामुळे लोकांचं समाधान झालं नाही. शिवाय त्या घटनेत दोषींनाही पकडण्यात यश आलं नव्हतं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं. यामुळे प्रस्थापित विरोधी लाट सुद्धा दिसून आली होती."
गुरु ग्रंथ साहिबमधून देण्यात आलेला प्रमुख संदेश -
- जगातील प्रत्येक व्यक्ती समान आहे.
- महिला आणि पुरूष यांच्यात समानता असली पाहिजे.
- सर्व धर्मांचा एकच देवता आहे.
- शीख व्यक्तींनी सत्याच्या मार्गानेच जगावं.
- राग, लोभ, वासना, अहंकार, विषयासक्त भावना यांचा शीखांनी त्याग करावा.
- वाहेगुरूचा हुकूम यांनुसारच शीखांनी आपलं जीवन व्यतीत करावं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)