You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
TET घोटाळा : 1778 अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन केलं पात्र, 2018च्या टीईटी परीक्षेमध्येही गैरव्यवहार
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
2019 च्या टीईटी परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर आता टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये देखील 1 हजार 778 अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पात्र करण्यात आल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी 2018 मधील परिक्षार्थींच्या ओएमआर शिटची तपासणी करताना त्यात 12 ऑक्टोबर 2018 ला जाहीर करण्यात आलेल्या निकालात 817 उमेदवारांचे गुण वाढवण्यात आल्याचे समोर आले.
निकाल ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानंतर या निकालामध्ये अपात्र आणखीन 710 व 38 उमेदवारांचे गुण वाढवून त्याची महिती दोन वेळा वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली.
या गुन्ह्यात आत्तापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याआधी 2019 - 20 मध्ये झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी ) तब्बल 7 हजार 800 परिक्षार्थींच्या पेपर आणि निकालामध्ये पैसे घेऊन फेरफार केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली होती.
विशेष म्हणजे या परीक्षेत अनेक अपात्र उमेदवारांना देखील पात्र करण्यात आल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं होतं. टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराचा पुणे सायबर पोलीस तपास करत होते.
2019-20 च्या टीईटी चा पहिला पेपर 1 लाख 88 हजार 688 जणांनी दिली होती. तर दुसरा पेपर 1 लाख 54 हजार 596 जणांनी दिला होता. यातून जवळपास 16 हजार परीक्षार्थी पास झाले होते.
परंतु, टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी सर्व सर्टिफिकेटची पडताळणी केली. त्यात 7 हजार 800 जणांच्या निकालात फेरफार करून त्यांना पात्र करण्यात आल्याचं समोर आलं.
टीईटी च्या परीक्षेतील घोटाळ्यात काही आरोपी अटक केले होते. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर 7800 लोकांची नावं समोर आलीत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट मिळवली आहेत. ज्यात नापास झालेले, मार्क वाढवून घेतलेले अशा सगळ्यांचा समावेश आहे. या सगळ्या लोकांची यादी आता आम्ही सरकारला देणार आहोत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.
आश्विन कुमारच्या घरातून 1 कोटींहून अधिक रकमेचा माल जप्त
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा प्रकरणी कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची रक्कम 1 कोटींहून अधिक आहे.
जी.ए. सॉफ्टवेअर या कंपनीचं महाराष्ट्रातील काम डॉ. प्रीतीश देशमुख याच्याअगोदर अश्विनीकुमार पाहत होता. त्याने 2018 मध्ये राज्य परीक्षा परिषदेचे संचालक सुखदेव डेरे यांच्याशी संगनमत करून 2018 च्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केला, असे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले.
सुखदेव डेरेला 21 डिसेंबरला अटक करण्यात आली. त्याचवेळी एका पथकाने अश्विनीकुमारला बंगळूर मधून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी पुणे पोलिसांनी अश्विनीकुमारच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरी सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आढळून आले.
याआधी शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले होते.
आतापर्यंत सुपेंकडून एकूण 3 कोटी 93 लाखांचे घबाड पोलिसांच्या ताब्यात आले.
दरम्यान, तुकाराम सुपे यांना राज्य शासनाने निलंबित केलं.
तसंच, शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
तुकाराम सुपेंच्या घरावर छापा, दीड कोटींच्या रकमेसह दीड किलो सोनं सापडलं
याहीआधी तुकाराम सुपेंच्या घरी 88 लाखांची रोख रक्कम मिळाली होती. यासोबतच त्यांच्या घरून सोन्याचे दागिनेही सापडले आहेत.
तुकाराम सुपेंच्या मुलगी आणि जावयाच्या घरून जप्त करण्यात आलेल्या बॅगमध्ये 1 कोटी 58 लाख 35 हजारांची रोख रक्कम मिळाली होती.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तेव्हा सांगितलं होतं, "तुकाराम सुपे यांच्या घरी याआधी 89 लाख रुपये आणि काही दागिने सापडले होते. आता पुन्हा माहिती घेऊन छापा टाकला असता, 1 कोटी 58 लाख रुपये रोख रक्कम आणि जवळपास दीड किलो सोन्याचे दागिने सापडले आहेत. आणखी तपास सुरूच आहेत."
तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते.
तुकाराम सुपे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.
"या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे. बाकी आरोपींसोबतचे संबंध शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत," असंही अमिताभ गुप्तांनी सांगितलं होतं.
टीईटीच्या पेपरमध्ये कसा झाला गैरव्यवहार?
पुणे सायबर पोलीस अटकेत असलेल्या आरोपींकडे कसून चौकशी करत होते. म्हाडाच्या पेपरप्रकरणी अटकेत असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख आणि त्याचे साथीदार संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांची चौकशी केली.
त्यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी जानेवारी 2020 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेसाठी परिक्षार्थींकडून पैसे घेऊन गैरप्रकार केल्याचं समोर आलं.
पोलिसांनी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना अटक केली. सुपे यांनी प्रितीश देशमुख त्याचबरोबर संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या मदतीने परीक्षार्थींना पास करुन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 50 हजार ते 1 लाख रुपये घेत असल्याचे समोर आले.
आत्तापर्यंत आरोपींनी 4 कोटी 20 लाख रुपये घेऊन परीक्षार्थींना पास केल्याचं समोर आलं आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन तुकाराम सुपेंच्या अटकेबाबत माहिती दिली.
अमिताभ गुप्ता म्हणाले, "दोन पेपर फुटीचा तपास करताना म्हाडाची लिंक लागली. त्यातून काही लोकांना अटक केली. त्यात टीईटीच्या परीक्षेत घोटाळा असल्याचे समोर आले. त्यात गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक केली. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली.
"सुपेंकडून 88 लाख रुपये रोख रक्कम आणि सोनं सापडलं. ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पेपर लिहू नका तसंच, पुनर्तपासणीला द्या असं सांगितलं जायचं," अशी माहिती गुप्तांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माहिती दिली, त्यातून लिंक शोधत सुपेंपर्यंत आलो आहोत, असंही गुप्ता म्हणाले.
पेपरफुटीचा महाराष्ट्र पॅटर्न पोलिसांनी कसा उघडकीस आणला?
आरोग्य विभागाचा गट 'ड'चा पेपर फुटला असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासात आरोग्य विभागाच्या सहसंचालकांपासून अनेक मोठी नावं समोर आली.
या तपासात पोलीस आता राज्याच्या परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यापर्यंत पोहचले असून सुपे यांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाचा गड 'ड' आणि गट 'क' तसंच म्हाडाचा पेपर आणि आता टीईटीची परीक्षा या चारही प्रकरणांचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींकडे तपास करण्यात येत असून आणखी नवीन नावं समोर येण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाचा पेपर कसा फुटला?
आरोग्य विभागाची गड 'ड'ची परीक्षा 31 ऑक्टोबरला झाली होती. ही परीक्षा सुरु होण्याच्या आधी पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
तक्रार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना राज्यातील विविध भागातून अटक करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात 11 जणांना अटक केली. यामध्ये काही शासकीय अधिकारी, पेपर फुटीमधील एजंट, क्लासचालक यांचा समावेश होता. लातूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बडगिरे यांचा देखील या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये समावेश होता.
बडगिरे यांच्या चौकशीत आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले यांचं नाव समोर आलं होतं. बडगिरे यांनी परीक्षेच्या आधी त्यांच्या ड्रायव्हरला मुंबईला पाठवून एका पेन ड्राईव्हमध्ये पेपर कॉपी करुन काहींना तो पेपर दिला.
त्या लोकांनी मग तो पेपर क्लासचालक आणि काही परीक्षार्थींना पैसे घेऊन दिला. पोलिसांच्या चौकशीत बडगिरे यांना 33 लाख रुपये मिळाल्याचं समोर आलं होतं. बडगिरेंच्या चौकशीतून पोलिसांनी महेश बोटले यांना अटक केली.
महेश बोटले यांच्या चौकशीत आरोग्य विभागाचा गट 'क' चा पेपर देखील फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे आणखी कुठल्या परीक्षेचे पेपर फुटले आहेत का, याचा देखील पोलीस तपास करत होते.
म्हाडाचा पेपर फुटण्यापासून कसा रोखला?
म्हाडाच्या पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना क्राइम ब्रांचची पथके तयार करून संशयितांना औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे, पुणे परिसरातुन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
टार्गेट करियर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव यांच्याकडे म्हाडाच्या परीक्षेला बसलेल्या 3 विद्यार्थ्यांचे ओळख पत्र मिळाले होते. त्याचबरोबर पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याचे ठरवले होते.
पोलिसांनी अजय चव्हाण, कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र, कोरे चेक, आणि आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या मिळल्या.
संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचा मागोवा घेतला असता पोलिसांना त्यांच्या कारमध्ये म्हाडाची परीक्षा ज्या संस्थेच्या मार्फत घेण्यात येणार होती त्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख आढळून आले.
देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह सापडला. त्यामध्ये म्हाडा परीक्षेचे पेपर सेट केल्याचं दिसून आलं.
या प्रकरणी अंकुश हरकळ (रा. बुलढाणा ), संतोष हरकळ (सध्या रा. औरंगाबाद) आणि डॉ. प्रीतीश देशमुख (रा. पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 18 डिसेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)