वाईन: आता किराणा दुकान, बेकरीमध्येही होणार वाईन विक्री?

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. किराणा दुकान, बेकरीमध्येही होणार वाईन विक्री

बाजारात अनेक बेकरी उत्पादनांमध्ये वाईनचा उपयोग केला जात असतो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे दैनंदिन किराणाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानातही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.

अनेक ठिकाणी वाईन ही चवीसाठी वापरली जाते. यामुळे बिअरच्या धर्तीवर वाईनचीही विक्री किराणा दुकानात सुरू केली जाऊ शकते. राज्य सरकार त्यासंदर्भात एक अधिसूचना आणण्याचा विचार करत असून त्याबाबत परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. मजूर असल्याचं सिद्ध करा, सहकार विभागाची प्रवीण दरेकरांना नोटीस

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मजूर आहेत का, असा प्रश्न सहकार विभागाने एका नोटिशीमार्फत विचारला आहे.

आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना मासिक अडीच लाख मानधन तसंच भत्ते मिळतात, निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपण व्यावसायिक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

ही बाब लक्षात घेता आपल्याला मजूर म्हणून अपात्र का करू नये, अशा आशयाची नोटीस विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना बजावली आहे.

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर संस्था या गटातून अर्ज दाखल केला होता. बिनविरोध म्हणून ते या गटातून निवडूनही येणार आहेत. पण दरम्यान, त्यांच्या मजूर असण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्याला दरेकर कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. संसदेत बिनचूक असलेला डेटा सुप्रीम कोर्टात सदोष कसा? - सुप्रिया सुळे

ओबीसी आरक्षण तसंच इम्पेरिकल डेटा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

संसदेत बिनचूक असणारा डेटा सर्वोच्च न्यायालयात सदोष कसा काय होतो, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी याबाबत विचारला आहे. यासंदर्भात लोकमतने बातमी दिली आहे.

ओबीसींचे आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हा इम्पेरिकल डेटा मागितला होता. पण हा सदोष असल्याने तो राज्यांना देता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली आहे. या मुद्द्यावरून राज्यातील निवडणुका स्थगित करता येऊ शकणार नाहीत, असंही कोर्टाने म्हटलं.

या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

याबाबत बोलताना ट्विट करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सरकारने ग्रामविकास मंत्रालयाच्या संसदीय अहवालात 2016 मध्ये हाच डेटा सादर केला होता. तसंच सामाजिक आर्थिक आणि जातगणनेचा डेटा 98.87 टक्के अचूक असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यावेळी केला होता. पण आता हा डेटा सदोष कसा झाला?"

4. लोकसभा 2024 ला संपूर्ण देशात भाजपचा पराभव होताना पाहायचं आहे - ममता बॅनर्जी

गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी भाजपचा सुर्यास्त झाला आहे. हाच कल देशभरात दिसून येईल.

2024 मध्ये संपूर्ण देशात भाजपचा पराभव होताना मला पाहायचं आहे, असं मत तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

बुधवारी (15 डिसेंबर) कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

"मीसुद्धा ब्राह्मण असून मला भाजपकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. काँग्रेसनेही मोठ-मोठे दावे करण्याऐवजी योग्य मार्गाने भाजपविरोधात लढलं पाहिजे," असं बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. ही बातमी लोकमतने दिली.

5. 'माझं वय 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवणार नाही'

माझं वय सध्या 23 आहे. पण ते 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

सांगलीतील कवठे महांकाळ परिसरात नगरपंचायतीच्या प्रचार दौऱ्यावर ते बोलत होते. 23 वर्षांच्या युवकाविरोधात येऊन निवडणूक लढवावी लागते, हा दिग्गज नेते मंडळींचा नैतिक पराभव आहे. शहराच्या विकासाचा कायापालट हेच माझं ध्येय असून दोन वर्षांत विरोधकांचा सुपडा साफ करणार असा इशारा पाटील यांनी दिला. ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)