You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिग बॉस मराठी मधून गायत्री दातार बाहेर; म्हणाली माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम 84 दिवस
अभिनेत्री गायत्री दातारचा बिग बॉस मराठीमधला प्रवास संपुष्टात आला आहे. रविवारी झालेल्या भागात गायत्रीसह जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले होते.
मीरा सेफ असल्याचं सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं. सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये होत्या. गायत्रीला घर सोडावं लागणार असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं आणि तिचा बिग बॉस मराठीमधला प्रवास संपला.
"माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम 84 दिवस. बिग बॉस मराठीमधला माझा प्रवास अफलातून असा होता. बिग बॉस मराठी स्पर्धेत जायचं का याविषयी तळ्यात मळ्यात होत होतं. पण मी निर्धाराने या घरात प्रवेश केला.
"इतके दिवस बिग बॉसच्या घराचा भाग होते, मी सगळ्या टास्कमध्ये हिरिरीने सहभागी झाले, खेळताना दुखापतही झाली. घरातल्या प्रेमळ सदस्यांबाहेर कधी भांडत कधी मजामस्ती करत इथपर्यंत पोहोचले. हा प्रवास अविस्मरणीय होता", असं गायत्रीने म्हटलं आहे.
"हे सगळं तुमची मतं, तुमचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे शक्य झालं. मायबाप प्रेक्षकांनो तुमचे मनापासून आभार. बिग बॉस मराठीमधील प्रवासासाठी मी ऋणी आहे. तुमच्या आधारामुळे आणि पाठिंब्यामुळे इथपर्यंतचा प्रवास सुकर झाला," असं गायत्रीने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये फॅमिली वीक साजरा करण्यात आला होता. त्यावेळी गायत्रीच्या घरून तिचा भाऊ सिद्धार्थ, वहिनी हर्षदा आणि भाचा वेदांग आले होते. त्यांना भेटून गायत्री खूपच भावुक झाली होती. ग्रुपमध्ये खेळण्यापेक्षा एकटीने खेळ असा सल्ला भावाने गायत्रीला दिला होता.
बिग बॉस मधील वास्तव्यादरम्यान कॅप्टन्सी टास्कसाठी खेळताना गायत्रीच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला तीन आठवडे हाताला स्लिंग लावण्याचा सल्ला दिला होता.
बिग बॉस मराठी स्पर्धकांसाठी रविवारी चावडी असते. या हंगामाच्या पहिल्याच चावडीत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी गायत्रीला 'बुगूबुगू' हे नाव दिलं होतं.
हंगाम सुरू झाल्यानंतर गायत्रीने बिग बॉसशी संवाद साधला होता. मला तुमच्या घरात येऊन खूप छान वाटतं आहे. आय लव्ह यू असं गायत्रीने खुद्द बिग बॉसलाच म्हटलं होतं. आय लव्ह यू म्हटल्यावर माझ्याकडे सतत बघू नका असं म्हणत गायत्रीने लडिवाळ संवाद साधला होता.
तुला पाहते रे मालिकेतील तिने साकारलेल्या इशा निमकरच्या व्यक्तिरेखेची चांगलीच चर्चा झाली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिच्या कामाचं कौतुक झालं होतं. सुबोध भावे आणि गायत्री यांनी मालिकेत प्रमुख भूमिकेत होती.
विक्रम सरंजामे आणि इशा निमकर अशी त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं होती. या दोन पात्रांमधील प्रेम आणि लग्नापर्यंत केलेली वाटचाल असं या मालिकेचं कथानक होतं. विक्रम सरंजामे आणि इशा निमकर या दोघांमध्ये वयाचं प्रचंड अंतर होतं.
पडद्यावरील कथानकाप्रमाणे प्रत्यक्षातही सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्यात वयाचं अंतर खूप आहे. सुबोध यांनी गायत्रीला तिच्या लहानपणी पुरस्कार देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
श्रीमंत विक्रम सरंजामे आणि मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेली इशा निमकर यांच्यावरून असंख्य मीम्स तयार झाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)