बिपिन रावत मृत्यूः शरद पवार- 'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलेलं पण मी पायलटला सांगितलं...' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. 'आमचंही हेलिकॉप्टर ढगात सापडलेलं पण मी पायलटला सांगितलं...'-शरद पवार
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रावत यांच्या निधनाबद्दल देशभरातून दुःख व्यक्त केले जात असून सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शरद पवार यांच्या एका हेलिकॉप्टर प्रवासाचे वर्णन टीव्ही9 ने प्रसिद्ध केले आहे. या प्रवासाचा अनुभव सांगताना शरद पवार म्हणाले, 'माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.
'त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
'आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे.
'ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो,'
असं पवार यांनी सांगितले.
2. ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्णाची चाचणी निगेटिव्ह
कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात राहाणाऱ्या आणि ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आल्याचं महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केलं आहे. तो दक्षिण अफ्रिकेतून भारतात आल्यावर केलेल्या चाचणीमध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्याला घरी सोडण्यात आल्याचं लोकमतने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले होते. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण होता.
3. संजय राऊत- प्रियंका गांधी भेट
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 7 डिसेंबर रोजी भेट घेतल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.

या बैठकीत उत्तर प्रदेश, गोवा आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश आणि गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी होण्याचे संकेतही त्यांनी दिले. मात्र शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का याबद्दल त्यांनी काहीही स्पष्ट सांगितलेले नाही. ही बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली आहे.
4. समता परिषदेची हस्तक्षेप याचिका
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने घेतला आहे. त्याचप्रमाणे आरक्षण देणारा अध्यादेश योग्य असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारतर्फे सादर केले जाणार आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी (6 डिसेंबर) सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.
5. आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार
भाजपा नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मुंबईच्या नरिमन पॉइंट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शेलार यांच्यावर कारवाई व्हावी असे पत्र मुंबईच्या शिवसेना नगरसेविकांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलं होतं. तसेच किशोरी पेडणेकर यांनीही गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








