You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटीलांना मुख्यमंत्री बनण्याची घाई, जयंत पाटीलांचा चिमटा #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. फडणवीस नव्हे चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई - पाटील
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नव्हे तर भाजप नेते चंद्रकांत पाटीलांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
चंद्रकांत पाटील यांना फडणवीस यांच्या जागी जाऊन बसायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. भाजपवर आणि पुण्यातील सभेत फडणवीसांना केलेल्या भाषणावरही जयंत पाटील यांनी टीका केली.
पुण्याचं पाणी कमी केलं तर पुणेकर पाणी पाजतील असं म्हणणाऱ्या फडणवीस यांना पुणेकरच उत्तर देतील. फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांमधे भीती पसरवण्याचं काम केले आहे, असंही पाटील म्हणाले.
नाशिक कुसुमाग्रजांची नगरी आहे. कुसुमाग्रज मराठीतील सर्वांत मोठे साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणं म्हणजे मराठी भाषेचा अपमान करण्यासारखं आहे. शिवसेना दूर गेली म्हणून सावरकारांचा मुद्दा साहित्य संमेलनात काढू नये, अशी सूचनाही त्यांनी फडणवीस यांना केली.
एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
2. गुन्हेगारांवर बिनधास्त कारवाई करा, अमित शहांची IPS अधिकाऱ्यांना सूचना
केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्या विरोधकांच्या सत्तेतील राज्यांमध्ये अनेकदा तपास अधिकारी आणि राज्य सरकारचा संघर्ष पाहायला मिळतो. पण आयपीएस अधिकाऱ्यांनी न घाबरता बिनधास्त गुन्हेगारांवर कारवाई करावी असा सल्ला वजा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिला आहे.
शहा यांनी भारतीय पोलिस सेवेच्या 2020 च्या 122 अधिकाऱ्यांच्या बॅचबरोबर संवाद साधला. केंद्रीय तपास संस्था किंवा राज्यांत नियुक्तीवर असलेल्या या अधिकाऱ्यांना शहा यांनी हा संदेश दिला.
गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करताना राज्यांच्या अधिकारांचा मात्र विचार करा आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचा सल्लाही शहा यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे.
माझं काय होईल या भीतीखाली न राहता, कर्तव्याचं पालन करावं लागेल असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
3. अवकाळी पावसाचा सांगली जिल्ह्याला तडाखा, 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळं पिकांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. या पावसामुळं जिल्ह्यात जवळपास 11 हजारांपेक्षा जास्त हेक्टर भागातील पिकांची नासाडी झाली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
जवळपास चार दिवस सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात ज्वारी, हरभरा आणि भाजीपाल्यासह प्रामुख्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
फक्त द्राक्षबागांचं नुकसानचं 90 टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळं अंदाजे 13 ते 15 हजार कोटींचं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नुकसानीनंतर कृषी विभागानं पाहणी करत प्राथमिक माहिती घेतली आहे. तर शेतकऱ्यांनी मात्र, लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
4. ममता बॅनर्जी कधीही मोदींबरोबर जातील, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला तणाव स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या सहकारी म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळं त्या रंग बदलून परत कधी मोदींबरोबर जातील हे सांगता येणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि युपीएवर टीका केली होती. मात्र देशभरात पसरलेला आणि अस्तित्व असलेला केवळ काँग्रेस हाच पक्ष आहे. त्यामुळं भाजपविरोधात आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही, असंही चव्हाण म्हणाले.
सध्या मोदींच्या विरोधात होत असलेली सर्वपक्षीय एकजुट कमकुवत करण्याचा प्रयत्न ममता करत आहेत. त्याचा फायदा केवळ मोदींना होईल, असंही ते म्हणाले.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
5. अमित शहांचा शेतकरी नेत्यांना फोन, चर्चेतून आंदोलनाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारनं नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर फोनवर बोलणं झाल्यानंतर सरकारची भूमिका सकारात्मक जाणवल्याचं शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले आहेत.
या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचं युद्धवीर सिंग म्हणाले. तसंच शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यायलाही सरकार तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपीच्या मुद्द्यावर सरकार समिती स्थापन करण्यास तयार आहे. त्यावर संयुक्त किसान मोर्चा राजी असल्याची माहिती मिळत आहे.
संयुक्त किसान मोर्चानं पाच सदस्यांचं पथक बनवून सरकारबरोबर चर्चेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं या आंदोलनावर तोडगा निघण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)