रसिका दुग्गल: मिर्झापूरच्या 'भाभीजी' फोर्ब्सच्या लिस्टमध्ये, सान्या मल्होत्राचाही समावेश

फोर्ब्ज मासिकाच्या देशातल्या सर्वाधिक प्रभावी महिलांच्या यादीत 'मिर्झापूर' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये बीना त्रिपाठी म्हणजेच 'भाभीजी' ची भूमिका करणाऱ्या रसिका दुग्गलचा समावेश झाला आहे.

रसिकाने या आधी अनेक चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला आहे. 2007 साली आलेल्या 'अन्वर' चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

रसिका 2007 पासून चित्रपटसृष्टीत काम करत असली तरी तिला आधी अनेक चित्रपटांमध्ये लहान सहान भूमिकाच मिळाल्या.

तिने टीव्ही सिरियल्समध्येही आपलं नशीब आजमवून पाहिलं पण तिथेही तिची फारशी ओळख बनू शकली नाही.

मुळच्या झारखंडच्या असणाऱ्या रसिकाने पुण्याच्या FTII मधून अभिनयात डिप्लोमा केला आहे.

फोर्ब्सला दिलेल्या आपल्या एक मुलाखतीत तिने आपल्या FTII च्या दिवसांना उजाळा दिला आहे.

"FTII च्या हॉस्टेलमध्ये राहाणं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या सेटवर राहाण्यासारखं आहे. आम्ही रोज सिनेमे पाहायचो. त्यातले बारकावे समजून घ्यायचो."

तिच्या कारकिर्दीतला लक्षात राहाणारा पहिला चित्रपट म्हणजे 'किस्सा'. 2015 साली आलेल्या या चित्रपटात तिने 'नीली' ची भूमिका केली होती. 'मानवी भावभावनांची नितांत सुंदर पण हृदयदावक कथा' अशा शब्दात समीक्षकांची या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.

तिने साऊथच्या काही चित्रपटांमध्येही काम केलं.

2015 पासून तिच्या वाटेल काही लक्षात ठेवण्याजोग्या भूमिका आल्आ. तिने टीव्हीवर 'दरिबा डायरीज्', 'P.O.W बंदी युध के' अशा सीरियल्स केल्या.

ती काही वेबसीरिजमध्येही झळकली.

2018 साली 'मंटो' या चित्रपटात तिने एक भूमिका केली जी सगळ्यांना आवडली. यात तिने सदत हसन मंटोच्या पत्नीची भूमिका केली होती. याच रोलसाठी तिला स्क्रीन अवॉर्डचं नॉमिनेशनही मिळालं.

याच वर्षी आली 'मिर्झापूर' ही वेबसीरिज आणि यातल्या 'बीना त्रिपाठीच्या' भूमिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

तिच्या या भूमिकेचं कौतुकही बरंच झालं. इथून पुढे तिच्या वाटेला वेबसीरिजमधल्या अनेक भूमिका आल्या.

मालिकेच्या किंवा चित्रपटाचा सेट ही माझी आवडती जागा आहे असं रसिकाने फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. 'तिथे असणाऱ्या गोंधळातून मला काहीतरी नवं घडवायची उर्मी मिळते'.

सान्या मल्होत्रा फोर्ब्सच्या यादीत

रसिका दुग्गलबरोबरच या यादीत आणखी एक अभिनेत्री आहे, ती म्हणजे सान्या मल्होत्रा.

आमिर खानच्या दंगल चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका ते नुकत्याच नेटफ्लिक्सवर आलेल्या 'पगलैट' या चित्रपटात एका तरुण विधवेची भूमिका असा सान्याचा भूमिकांचा आलेख आहे.

मूळची दिल्लीची असलेली सान्या, कॉलेज संपल्यानंतर 'डान्स इंडिया डान्स' या रिएलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आली.

या शो मधल्या पहिल्या 100 स्पर्धकांमध्येही तिची वर्णी लागली नसली तरी ती अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतच राहिली.

तिच्या स्ट्रगलच्या काळात सान्याने लहान-मोठ्या जाहिराती केल्या, कधी कॅमेऱ्याच्या मागेही मदतनीस म्हणून काम केलं.

दंगल या चित्रपटाने तिने बॉलिवुडमध्ये प्रवेश केला. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. 'बधाई हो बधाई' या चित्रपटातल्या मुख्य अभिनेत्रीची भूमिका तिच्या वाटेला आली. यानंतर आलेल्या फोटोग्राफसाठी तिचं प्रचंड कौतुक झालं.

फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत सान्या म्हणते, "वर्तमानकाळात जगा. हाच माझा मंत्र आहे. मी आता खूप प्लॅन करत बसत नाही, जे घडतंय, जसं घडतंय त्यानुसार जात राहाते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)