बिग बॉस : अनुप जलोटा 28 आणि जसलीन 65 वर्षांची असती तर?

    • Author, अॅनी जैदी
    • Role, लेखिका, बीबीसी हिंदीसाठी

प्रेमाचा मामला तसा नाजुकच असतो. पण त्यातही काही प्रेमकहाण्या इतक्या नाजुक असतात की चुकून जरी त्या समाजासमोर आल्या तर प्रियकर-प्रेयसीची काही खैर नाही.

भारतात प्रियकर-प्रेयसी वेगळ्या जातींचे किंवा धर्मांचे असतील तर घरच्या लोकांचा आणि समाजाचाही विरोध असतो. त्यांचा जीवही धोक्यात असतो.

दोन प्रेम करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत फरक असेल तरीही लोकांच्या भुवया उंचावतात. जे जास्त श्रीमंत असतील त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सहानुभूती दाखवली जाते.

आणि जर वयात फार फरक असेल तर प्रियकर-प्रेयसीची थट्टा उडवली जाते.

याचं ताज उदाहरण म्हणजे अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांची जोडी.

आता या प्रकारात जलोटांची थट्टा केली जातेय. साहजिक आहे कारण त्यांचं वय जास्त आहे. म्हणतात की त्या दोघांच्या वयात 37 वर्षांचं अंतर आहे. म्हणजे जलसलीनचं वय त्यांच्या मुली इतकं आहे.

पण या थट्टेत एक इर्षाभावही दिसतोय. 'बघा, तरण्याबांड पोरांना मागे सोडून या म्हाताऱ्याने बाजी मारली,' अशी ही भावना असते.

पण हाच मामला उलटा असता तर?

मी विचार करतेय की 65 वर्षांच्या बाईने, त्यातही भजन गाणाऱ्या किंवा प्रवचन ऐकवणाऱ्या कोणी हभप बाईने 28 वर्षांच्या सुंदर, तरण्याबांड तरुणाचा हात पकडला असता तर?

काही आठवड्यांपूर्वीचीच गोष्ट आहे, प्रियंका चोप्राचीही टर उडवली गेली होती कारण तिचा साखरपुडा निक जोनासबरोबर झाला. तरीही या जोडीतलं वयाचं अंतर दहाच वर्षांचं आहे.

नात्यात महिलेचं वय जास्त असेल तर लोकांना तीन किंवा पाच वर्षांचा फरकही खूप वाटतो. माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी सुशिक्षित, बऱ्यापैकी खुले विचार असणाऱ्या लोकांच्या तोंडूनही 'क्रेडल-स्नॅचर' म्हणजे 'पाळण्यातलं बाळ पळवणारी' असे विचित्र शब्दप्रयोग ऐकले आहेत.

आता हे चिडवण्यासाठी म्हटलं जात असलं तरी एक गोष्ट खरी की आजकालच्या तरुण पिढीलाही 30 वर्षांच्या तरुणीने 25 वर्षांच्या तरुणाशी नातं जोडलेलं आवडत नाही.

मोठ्या वयाच्या मुलींशी लग्न कल्पनेबाहेरचं

तुम्ही कोणताही पेपर उचला आणि त्यातल्या लग्नाच्या जाहिराती पाहा. जर मुलाचं वय 28 असेल तर त्याला मुलगी हवी असते 21 ते 28 या वयोगटातली. त्याचं वय 38 असेल तर त्याला मुलगी हवी 25 ते 35 मधली आणि जर त्याचं वय 48 असेल तर त्याला मुलगी हवी 30 ते 45 या वयोगटातली.

काही लोक याचा संबंध स्त्रियांच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेशी जोडतात. पण हेही तेवढंच खरं की आयुष्याच्या सायंकाळी पुरुष दुसरं लग्न करत असेल तरी वयातला हा फरक बदलत नाही.

मी आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नाही ज्यात 60 वर्षांचा पुरुष 50-70 वर्षांच्या सहचारिणीच्या शोधात असेल. शोध घेणं तर फार लांब, कोणी याची कल्पनासुद्धा करू इच्छित नाही.

याचा परिचिती तुम्हाला सिनेमातल्या अभिनेत्यांच्या वयांवरून येते.

50 वर्षांचे अभिनेत 23-24 वर्षांच्या अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना दिसतात आणि हे नैसर्गिक समजलं जातं. पण अभिनेत्री 40 वर्षांची होत नाही तोवर तिच्या वाटेला येणाऱ्या रोमँटिक भूमिकांचा ओघ आटू लागतो.

अल्लड स्त्रीशी विवाहाचा आग्रह का?

लग्नाच्या बाबतीत 10 वर्षांचा फरक फार मानला जात नाही. जेष्ठांचं म्हणणं असतं की स्त्री-पुरुषाच्या वयात 10 वर्षांचा फरक चांगला आहे.

चांगला यासाठी की पुरुषाची कमाई चांगली असेल आणि स्त्री जितकी वयाने, अनुभवाने लहान, अल्लड आणि दुसऱ्यावर अवलंबून असले तितकं चांगलं. कारण असं असेल तर ती आपल्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या कह्यात राहील.

पण जर पुरुषाचं वय कमी असेल तर या 10-12 वर्षांचा फरक भयानक वाटू लागतो.

पत्नी असो वा प्रेयसी, ती जर अनुभवी असेल, आपलं चांगलं-वाईट तिला समजत असेल, स्वतःच्या पायांवर उभी असेल तर ती कोणालाच आवडत नाही.

'जिकडे जावं तिकडे वाईट नजरा'

आपला समाज कधी आरसा पाहात नाही. प्रौढ किंवा म्हातारा पुरुष जेव्हा तरुण स्त्रीला पाहातो तेव्हा त्याची नजर चांगली असेलच असं नाही. बाजार, सिनेमागृह, रेस्टॉरंट अशा किती तरी ठिकाणी तुम्हाला वाईट नजरांचा सामना करावा लागतो.

प्रौढ स्त्रिया जर त्याच आत्मविश्वासाने, स्वतंत्रपणे घराबाहेर पडून तरुण मुलांना पाहात असतील तर त्यांना सौंदर्य आणि तारुण्यच दिसणार. त्यांच्या मनात ममतेची भावना जागण्याची शक्यता कमीच आहे.

आता आपल्या समाजात महिला पुढाकर घेत नाहीत ही गोष्ट वेगळी. त्या कोणाला जाऊन छेडत नाहीत ही गोष्टही वेगळी. त्यांच्या नजरेत शरम असते, मग त्या वयाच्या कोणत्याही टप्प्यात असो.

अनुप जलोटा, प्रियंका चोप्रानी काय करावं मग?

समाज अनुप जलोटांकडून अपेक्षा करतो की त्यांनी भजन म्हणावीत, देवाच्या कीर्तनात मन रमवावं, संपत्ती असेल तर मुलांसाठी मागे ठेवावी. जर एकटेपणा खायला उठला तर आपल्या वयाच्या जवळपास असणाऱ्या महिलेशी लग्न करावं.

लोक म्हणतील काही हरकत नाही, म्हातारपणी सोबत होईल. काळजी घ्यायला कोणीतरी सोबत हवं.

पण प्रियंका चोप्रासाठी 'वयाच्या जवळपास'ची खिडकी अजूनच संकुचित आहे.

पण प्रेमाला वयाचं बंधन नसतं. जाती-धर्माचं, गोत्राचं किंवा समाजातल्या स्थानाचं आणि अगदी आर्थिक परिस्थितीचंही.

एकदा 'लोक काय म्हणतील' याची भीती मनातून गेली की मग व्यक्तीला कुठलाही धर्म किंवा बेगडी परंपरांच्या दावणीला बांधणं कठीण आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)