You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका चोप्रा रोहिंग्यांना भेटली तर लोक का एवढे चिडलेत?
एकीकडे ब्रिटनमधल्या शाही विवाहात भारताचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा दुसऱ्याच क्षणाला काही रोहिंग्या मुलांसोबत फोटो काढताना दिसली. UNICEFची सदिच्छा दूत असलेल्या प्रियंकाने सोमवारी बांगलादेशच्या कॉक्स बाझार शहरात रोहिंग्यांच्या एका शरणार्थी शिबिराला भेट दिली.
"मुलांच्या एक अख्ख्या पिढीचं भविष्य इथे अधांतरी आहे. पुढे काय होणार हे त्यांना माहीत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं पण त्यांच्या डोळ्यांमध्ये नैराश्य स्पष्ट दिसत होतं. एक मोठ्या मानवी संकटाच्या तोंडावर ही मुलं उभी आहेत. आपण काहीतरी केलं पाहिजे. या जगाने काहीतरी करायला पाहिजे," असं म्हणत तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
पण तिच्या या भेटीमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
कुणी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहे तर कुणी तिने कधी काश्मिरी पंडितांची भेट का घेतली नाही, असा सवाल केला आहे.
शरद अग्रवाल म्हणतात, "कधी भारतातही येऊन जा. विसरू नका, आज तुम्ही जे काही आहात ते भारतामुळेच. शेजारी किती जरी चांगले असले तरी शवटी गरजेच्या वेळी आपलेच मदत करतात."
"जमल्यास काश्मिरी पंडितांनाही भेट देऊन या, ते तर आपल्याच देशात शरणार्थी म्हणून राहत आहेत. की तुम्हाला आणि UNICEFला फक्त रोहिंग्यांचीच पडली आहे?" असा प्रश्न अभिषेक कांबळे यांनी विचारला आहे.
तर राहुल राहाणे म्हणतात, "तुम्हाला त्यांचा खूप पुळका आला असेल तर तुमच्या घरी घेऊन जा."
"परदेशी संस्था अशाच कामांसाठी यांना पैसे, पदकं आणि पुरस्कार देत असते. भोळ्याभाबड्या जनतेने यांना ओळखून राहावं," असा सल्ला रविकिरण सावे यांनी दिला आहे.
राजवैभव मोरे लिहितात, "देश सुरक्षिततेसाठी कधी कधी कठोर पण योग्य निर्णय घ्यावे लागतात. देशाचं हित या ४०- ५० हजार रोहिंग्यांना देशाबाहेर हकालण्यात आहे. वणवण भटकण्याचं नाटक करणारे देशाच्या चहुबाजू काबीज करून बस्तान मांडून बसले आहेत."
"प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवणे यापलीकडे यामागे काहीही हेतू नाही आहे," असं संतोष कावळे यांना वाटतं.
प्रेम जाधव यांनी प्रियंकाला भारतातील अनाथ आश्रमातील मुलांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तर सोनी सोनावणे म्हणतात, "तिकडे पकिस्तानमध्ये पण जावा, तिथे पण जे मुस्लीम नाही त्यांची पण परिस्थिती बघा."
यावर जाफर पटेल यांची ही प्रतिक्रिया वेगळी ठरते - "प्रियंका यांनी तिथे जाऊन जे काम केलं आहे, आपल्या भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पण काही लोकांना फक्त एका विषेश धर्माबद्दल वाईट नजरेने पहाण्याची घाण सवयच लागली आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)