Aurobindo: योगी अरविंद कोण होते? त्यांचा कवी, क्रांतीकारक ते योगी हा प्रवास

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अरविंद, अरविंद घोष, योगी अरविंद किंवा अरबिंदो अशा विविध नावांनी जगभरात प्रसिद्ध असलेल्या अरविंदांचं आयुष्य अनेक वेगवेगळ्या टप्प्यांनी भरलेलं आहे.

पाँडिचेरी इथल्या आश्रमामुळे किंवा ऑरोविल या नावामुळे अरविंदांचं नाव आताच्या पिढीच्या कानावर पडलेलं असतं. पण अरविंद नेमके कोण होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर योगसाधनेत काय योगदान दिलं हे माहिती नसतं. त्यांची ओळख करुन घेण्याचा हा प्रयत्न.

सातव्या वर्षीच शिक्षणासाठी लंडनला

श्री. अरविंद यांचा जन्म कोलकात्यात 15 ऑगस्ट 1872 रोजी झाला. वयाच्या सातव्या वर्षीच ते त्यांच्या दोन भावांबरोबर इंग्लंडला शिकायला गेले. लहानपणापासूनच अरविंदांना इंग्लिश, लॅटिनसारख्या विविध भाषा शिकण्याची संधी मिळाली. लंडनमध्ये ते सेंट पॉल्स स्कूल आणि नंतर किंग्ज कॉलेज, केंब्रिजमध्ये शिकले.

1890 साली ते आयसीएस (इंडियन सिव्हिल सर्विस) परीक्षा पास झाले. दोन वर्षांच्या उमेदवारीच्या काळानंतर ते एका परिक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांना आयसीएसमधून बाहेर पडावं लागलं.

पण याचवेळेस बडोद्याचे सयाजीराव गायकवाड लंडनमध्ये होते. त्यांनी अरविंदांना बडोदा संस्थानाच्या सेवेत येण्याचं निमंत्रण दिलं. 1893 साली अरविंद बडोद्यामध्ये आले.

बडोद्यामध्ये त्यांनी सुरुवातीला महसूल खात्यात आणि नंतर सयाजीरावांच्या सचिवालयात काम केले. त्यानंतर ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक झाले. 1906 पर्यंत अरविंद बडोद्यात होते.

क्रांतीकार्यात सहभाग

बडोद्याचा काळ अरविंदांनी विविध भाषा शिकण्यासाठी आणि काव्यलेखनासाठी वापरला. अनेक भारतीय भाषा शिकून घेऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला.

हे सर्व करत असताना त्यांनी राजकीय भूमिका घेऊन काही हालचाली सुरू केल्यामुळे त्यामुळे त्यांना बडोद्याची नोकरी सोडावी लागेल. पण बाहेर पडताना एक मोठं क्रांतीकार्य त्यांच्यासमोर होतं ते म्हणजे बंगालची फाळणी.

बंगालच्या फाळणीमुळे पूर्व भारतासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. अनेक क्रांतीकारकांनी या विरोधात सहभाग घेतला. अरविंद त्यातील अग्रणी नेत्यांमध्ये होते.

1906 साली ते बंगाल नॅशनल कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. याच काळात जहाल आणि मवाळ हे दोन प्रवाह राष्ट्रीय आंदोलनात होते. आता मवाळ धोरणं बाजूला ठेवून आपण ब्रिटिशांना आव्हान दिलं पाहिजे असे अरविंदांचे विचार होते.

खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्जफर्डवर बाँबहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चाललेला खटला खूप गाजला होता.

या खटल्यामध्ये अरविंद घोष आणि त्यांचे बंधू बारिंद्र यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. अरविंदांना अलीपूर येथिल कारागृहात कारावास भोगावा लागला होता.

अरविंदांनी कारागृहातून सुटल्यावर अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये कर्मयोगी हे साप्ताहिक आणि बंगाली भाषेत धर्म नावाचं साप्ताहिक सुरू केलं. या साप्ताहिकांमधून अरविंदांनी आपलं क्रांतीकार्य सुरूच ठेवलं.

पाँडिचेरी आश्रम

यासर्व काळामध्ये अरविंदांचा ओढा अध्यात्माकडे झुकू लागला होता. 1910च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी निवृत्ती घेऊन पाँडिचेरीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस पाँडिचेरी फ्रेंच वसाहत होती.

राजकीय पक्ष, आंदोलनाच्या नेतृत्वाची अनेकदा करण्यात आलेली विनंती त्यांनी नाकारली आणि पूर्ण निवृत्तीचा निर्णय त्यांनी स्वीकारला.

1910 पासून अरविंदांनी आर्य नावाने एक तत्त्वज्ञानावर आधारित मासिक सुरू केलंय त्यामध्ये अध्यात्म, गीता, उपनिषद, योग अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. बडोदा आणि इंग्लंडमध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या कविताही या काळात प्रसिद्ध करण्यात आल्या.

सुरुवातीला चार-पाच शिष्य साधकांबरोबर त्यांनी सुरू केलेली अध्यात्म चळवळ आता मोठी होऊ लागली होती. 1904 साली त्यांनी योगसाधनेला सुरवात केली. 5 डिसेंबर 1950 रोजी त्यांचं निधन झालं.

क्रांतीकार्यातून विश्रांती घेत त्यांनी जवळपास 40 वर्षे योगसाधना आणि आत्मिक साधनेला वाहून घेतलं होतं. आजही त्यांच्या आश्रमाला देश-विदेशातून लाखो लोख भेट देत असतात.

'संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी तत्त्वज्ञान मांडले'

योगी अरविंद यांचे तत्त्वज्ञान हे संपूर्ण मानवजातीसाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी होते असे भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहासचे लेखक डॉ. ग. ना. जोशी यांना वाटते. या पुस्तकाच्या 11 व्या खंडात जोशी यांनी योगी अरविंद यांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानाचा आढावा घेतला आहे.

अरविंद यांचे तत्त्वज्ञान कसे होते याबाबत ते सांगतात, "सध्या सबंध मानवजात अनेक प्रकारच्या दुरितांपासून दुःख भोगते आहे. हे सर्व दुःख कमी व्हावे यासाठी समाजातील आदर्शवादी सुधारक अनेक प्रकारच्या योजना अमलात आणीत आहेत. अशा योजनांत आर्थिक, राजकीय, शैक्षणिर व नैतिक सुधारणांचा समावेश आहे. या सुधारणांमुळे त्या व्यक्तीचे जीवन सुखावह होईल पण त्याची दुःखापासून सुटका होईल असे नाही.

"अरविंद यांना वाटायचे की माणसाला सुख व समाधान बाह्य साधनांनी मिळू शकत नाही तर ते आतून यावे लागते.

"सध्याच्या मानवाची अवस्था कस्तुरी मृगासारखी आहे, कस्तुरी त्याच्या बेंबीत आहे हे त्याला न समजल्याने तो कस्तुरीचा शोध करत वेड्यासारखा फिरतो. त्याच्या हे लक्षात आले की सुगंध आपल्यातूनच येत आहे तेव्हा त्याचे हे भटकणे थांबेल.

"व्यक्तीची बहिमुर्खता कमी होऊन अंतर्मुखता वाढली पाहिजे व आनंदाचा झरा व उगम बाहेर नसून आत अंतरंगात आहे हे त्याला नीट समजायला पाहिजे," असं अरविंद यांचे तत्त्वज्ञान होते असं निरीक्षण जोशी मांडतात.

(या लेखासाठी श्री अरविंद केंद्र, औरंगाबाद यांची मदत झाली आहे)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)