मतिल्दा कुल्लू : महिना साडेचार हजार कमावणारी महिला फोर्ब्जच्या प्रभावी महिलांच्या यादीत

ओडिशामधील मतिल्दा कुल्लू यांना नुकतचं फोर्ब्ज मासिकानं देशातील सर्वाधिक प्रभावी महिलांच्या यादीत समाविष्ट केलं आहे.

फोर्ब्जच्या या यादीत भारतीय स्टेट बँकेच्या माजी महासंचालक अरुंधती भट्टाचार्य आणि बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रासारख्या महिलांचा समावेश आहे.

मतिल्दा कुल्लू या कोणी सेलिब्रिटी नाहीत. कॉर्पोरेट विश्वाशीदेखील त्यांचा संबंध नाहीये. त्या ओडिशामधील आशा सेविका आहेत. त्यांनी आपल्या भागामधील गावकऱ्यांमध्ये काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धांविरोधात जागरुकता निर्माण केली. कोरोना काळातही जनजागृतीचं काम करण्यात त्या आघाडीवर होत्या.

महिना साडे चार हजार रुपये पगार

45 वर्षांच्या मतिल्दा आदिवासी बहुल सुंदरगढ जिल्ह्यातील गरगडबहल गावांतील रहिवासी आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्या सरकारी आरोग्य सेविका (आशा सेविका) म्हणून काम करत आहेत.

गावातील प्रत्येक घराचा दौरा करणं, रुग्णांना औषधं उपलब्ध करुन देणं, गरोदर महिलांना मदत करणं, मुलांचं लसीकरण करणं, स्वच्छतेला प्रोत्साहन देणं आणि वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यासारखी कामं मतिल्दा करतात.

महिना 4500 रुपये पगारात त्या जवळपास हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांची काळजी घेतात.

अंधश्रद्धेविरोधात लढाई

15 वर्षांपूर्वी मतिल्दा यांनी जेव्हा आशा कार्यकर्त्याच्या रुपात काम सुरू केलं, त्यावेळी त्यांच्या गावातील कोणतीही व्यक्ती रुग्णालयात जायची नाही. आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यासाठी त्या काळ्या जादूची मदत घ्यायचे.

हे थांबविण्यासाठी आणि गावकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी बरीच वर्षं लागली. पण आता परिस्थिती बदलली आहे. आजारी पडल्यावर लोक मतिल्दाकडेच येतात.

मतिल्दानं सांगितलं की, त्या आपल्या दिवसाची सुरुवात पहाटे पाच वाजता करतात. सकाळी घरातली कामं केल्यानंतर त्या सायकलवरून बाहेर पडतात आणि घरोघरी जाऊन लोकांना भेटतात.

त्या म्हणतात, "मला माझं काम खूप आवडतं, पण पगार कमी मिळतो. आम्ही लोकांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करतो. पण तरीही आम्हाला वेळेवर वेतन मिळावं यासाठी संघर्ष करावा लागतो."

मतिल्दा या आदिवासी आहेत. त्यामुळे त्यांना भेदभाव आणि अस्पृश्यतेसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. सुरुवातीच्या काळात आपलं काम तितकं सोपं नव्हतं असंही त्या सांगतात. पण आपण प्रयत्नांमध्येही कमतरता ठेवली नसल्याचं मतिल्दा आर्वजून सांगतात.

कोरोनामुळे अडचणींमध्ये वाढ

कोव्हिडचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मतिल्दाचं काम वाढलं.

त्या सांगतात, "जेव्हा मार्च महिन्यात देशातील लोक घरात बसून होते, तेव्हा आम्हाला लोकांची तपासणी करण्यासाठी आणि या विषाणूबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. लोक तेव्हा कोरोनाची चाचणी करून घ्यायची टाळाटाळ करायचे. त्यांना समजावणं खूपच कठीण होतं.

मात्र आपण गावांतील सर्व लोकांचं लसीकरण पूर्ण केलं असल्याचा दावा मतिल्दा करतात.

सुंदरगढ जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी सरोज कुमार मिश्रा सांगतात, "ही माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप समाधानाची गोष्ट आहे. कोरोना काळात फ्रंट लाइन वर्कर म्हणून मतिल्दा यांनी प्रचंड मेहनत केली होती. लोकांची काळजी घेताना त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली होती. पण बरं झाल्यानंतर त्या लगेचच पुन्हा कामावर रुजू झाल्या होत्या."

अशी घेतली फोर्ब्जने दखल

मतिल्दाचं काम फोर्ब्ज मासिकाच्या लक्षात कसं आलं? त्याचीही एक वेगळी गोष्ट आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ आशा वर्करच्या महासचिव विजयालक्ष्मी यांनी त्यांच्या कामाची माहिती फोर्ब्ज इंडियाच्या पत्रकारांना दिली.

त्यांनी म्हटलं, " मतिल्दा या अन्य आशा सेविकांसाठी एक उदाहरण आहेत. एक गरीब आदिवासी महिला असलेल्या मतिल्दा यांनी त्यांच्या भागात खूप चांगलं काम केलं आहे. कामाबद्दल त्यांचं जे समर्पण आहे, ते पाहून मी प्रभावित झाले."

फोर्ब्जच्या यादीत मतिल्दाचं नाव आल्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांचं अभिनंदन करणारं ट्वीट केलं आहे, "मतिल्दा हजारो समर्पित पद्धतीने कोव्हिड योद्ध्यांचं प्रतिनिधीत्व करतात, जे अमूल्य असं जीवन वाचवण्यासाठी सतत अग्रणी असतात."

राज्याचे आरोग्यमंत्री नवकिशोर दास यांनी लिहिलं, "अशा अभूतपूर्व काळात मतिल्दा यांनी केलेल्या कामासाठी ओडिशा त्यांचा आभारी आहे. त्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत."

2005 साली भारत सरकारनं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनची सुरूवात केली होती. त्याचवेळी आशा सेविकांची भरती करण्यात आली होती. देशात दहा लाखांहून अधिक आशा सेविका आहेत. कोव्हिड काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)