You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कविता भोंडवे: 'अपंग बाई गावाचा काय विकास करणार' म्हणणाऱ्यांना कृतीतून उत्तर देणाऱ्या सरपंच
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अपंग असा शिक्का समाजाने आणि व्यवस्थेने मारलेला असतानाही नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव आणि वाघूळ या दोन गावांच्या सरपंच असणाऱ्या कविता भोंडवे यांची संघर्षमय कहाणी.
"मला सरपंच होऊन तीन-चार महिन्यांचाच काळ लोटला असेल. मी काही कामानिमित्त शाळेकडे जात होते, रस्त्यात एका ठिकाणी गावातली प्रतिष्ठित, सुशिक्षित माणसं बसली होती. मी त्यांच्याजवळून पुढे जायला लागले तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, 'या आमच्या गावच्या सरपंच'. त्याच्या बोलण्यातला कुत्सित स्वर स्पष्ट कळत होता. बाजूचे बसलेले सगळे मोठमोठ्याने हसायला लागले. मी अपंग होते, आणि त्यात सरपंच झाल्याने लोक माझी चेष्टा करत होते," कविता भोंडवे सांगत होत्या.
कविता गेल्या 9 वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव आणि वाघूळ या दोन गावांच्या सरपंच आहेत. पण सुरुवातीला त्यांना आश्वासक वातावरण नक्कीच मिळालं नव्हतं. 'जी बाई स्वतःला सांभाळू शकत नाही, स्वतः दोन पायांवर चालू शकत नाही, ती गाव काय सांभाळणार' असं त्यांच्या तोंडावर त्यांना सुनावलं गेलं होतं.
"मी त्या लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे गेले, माझं काम केलं. परत येताना मला राहावलं गेलं नाही आणि मी त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं, मी कशीही असले, अपंग किंवा अजून काही पण माणूसच आहे. तुम्हाला एकदाही माझा माणूस म्हणून विचार करावासा वाटला नाही? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या अपंगत्वामुळे मला गावचा विकास करता आला नाही तरी चालेल पण मी लोकांशी कधीच खोटं बोलणार नाही आणि जनजागृती करेन."
त्या दिवशी कविता यांनी निश्चय केला की गावाच्या भल्यासाठी, खासकरून गावातल्या महिलांच्या भल्यासाठी, आपण काहीतरी करून दाखवायचं.
कविता भोंडवे राजकारणात आल्या ते योगायोगानेच. त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता, अगदी चीड होती म्हणा. पण 2011 साली महिलांसाठी पद राखीव झालं आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना फॉर्म भरायला सांगितला. आधी कविता यांनी स्पष्ट नकार दिला, पण वडिलांनी अनेक दिवस समजूत काढली आणि त्या तयार झाल्या.
"सुरुवातीला माझ्याकडे कोणी काम घेऊन आलं की मला फार राग यायचा, की ही माणसं माझ्याकडे कशाला येतात. मी ऑफिसलाही जायचे नाही. काही काम असलं तर लोक घरी येऊन सही घेऊन जायचे. पण एकदा आमचे तत्कालीन उपसरपंच गोविंद निमसे यांनी मला सांगितलं की तुम्ही कमीत कमी निराधार वृद्ध योजनेचे फॉर्म लोकांकडून भरून घ्या. आधी अनेकदा तशा वृद्धांचे फॉर्म भरले होते पण त्यांना काही मदत मिळाली नव्हती. मीही करायचं म्हणून ते काम केलं. पण वृद्धांना त्यांचे पैसे मिळाले. एका बाईने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवून मला जवळ घेतलं आणि आशिर्वाद दिले. तो दिवस मी कधी विसरणार नाही. तेव्हापासून मी माझी जबाबदारी ओळखली," त्या म्हणतात.
'आयुष्यात संपलं तरी चालेल...'
पण सरपंच होण्याआधी कविता एका खूप अवघड मानसिक अवस्थेतून जात होत्या. बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्यांचं शिक्षण अर्धवट सुटलं होतं. त्यांना पुढे शिकायचं होतं पण परिस्थिती साथ देत नव्हती.
"तेव्हा आईवडिलांकडे गाडी नव्हती. आमच्या गावाला रस्ता नाही, इथे बस यायची नाही. म्हणजे कॉलेजला जायला मला चार-पाच किलोमीटर पायी जाऊन पुढे मुख्य रस्त्याला लागून तालुक्याला जाणारी बस पकडावी लागायची. दिवसेंदिवस ते करणं मला अशक्य होऊ लागलं होतं. मला आठवतं, माझी फर्स्ट इयरची परीक्षा होती, मे महिन्याचे दिवस होते. त्या उन्हात मला चालत जावं लागायचं. मी थकून गेले होते, मला शक्यच नव्हतं ते करणं. आपल्या अपंगत्वामुळे शिक्षण सुटणार हे स्पष्ट डोळ्यासमोर दिसत होतं आणि तसंच झालं," त्यांना जुने दिवस आठवतात.
शिक्षण सुटल्यामुळे कविता एकाकी पडल्या. आपली स्वप्नं आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत असं त्यांना वाटलं. "शिक्षण सुटलं होतं, लग्न न करण्याचा निर्णय मी आधीच घेतला होता. त्यामुळे मी पूर्ण एकाकी झाले होते. कोणाशी बोलायचे नाही, काही करायचे नाही. एक वेळ अशी आली की वाटलं आपलं आयुष्य इथेच संपलं तरी चालेल," त्या उत्तरतात.
'अपंग आणि बिनलग्नाची बाई बचतगटात चालेल?'
सरपंच झाल्यानंतर कविता यांनी महिला बचतगटांचं काम सुरू केलं. त्यायोगे महिलांचं संघटन करावं असा त्यांचा मानस होता. पण त्यांना याआधी बचतगटाचा एक वाईट अनुभव आला होता. "माझी इच्छा होती की बचतगटात सहभागी व्हावं, तेव्हा आमच्या गावात बचतगट नव्हते, मग मी दुसऱ्या गावातल्या एका बचतगटाच्या कार्यालयात गेले आणि त्यांना म्हटलं की मलाही सहभागी व्हायचं आहे. त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि माझ्या तोंडावर सांगितलं की बिनलग्नाची बाई इथे चालणार नाही. एकतर तिचा नवरा हवा, आणि विधवा असेल तर वडील किंवा भाऊ. हा माझ्यासाठी धक्का होता."
या अनुभवानंतर जेव्हा कविता भोंडवे यांनी स्वतःच्या गावात बचतगट स्थापन करायचं ठरवलं तेव्हा शेजारच्या गावातल्या महिला सरंपचांना फोन करून विचारलं की, 'बिनलग्नाची आणि अपंग बाई बचतगट चालवू शकते ना? त्यात सहभागी होऊ शकते ना?'
'माझ्याशी भांडायला ग्रामसभेत या'
बचतगटांमुळे महिलांचं जे संघटन झालं त्याचा फायदा गावात लवकरच दिसायला लागला. महिला आपल्या प्रश्नांबद्दल बोलायला लागल्या. राजकीय नेत्यांनी महिलांनी बोलणं फार लांबची गोष्ट होती, पण बचतगटांच्या मार्फत त्या कवितांकडे आपली गाऱ्हाणी मांडायला लागल्या. त्याआधीही कविता गावात घरोघरी जाऊन महिलांना सभांना यायची विनंती करायच्या.
"2011 च्या आधी आमच्या गावातल्या महिला कधीही ग्रामपंचायत ऑफिस, किंवा सरकारी कार्यालयांकडे फिरकत नव्हत्या. म्हणजे अगदी महिला निवडून जरी आल्या असतील तरी त्यांचे नवरे ऑफिसला यायचे आणि खुर्च्यांवर बसून कारभार हाकायचे. मी सरपंच झाल्यानंतर हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. महिला तोवर माझ्याकडे बोलत होत्या, आपल्या तक्रारी सांगत होत्या. पण हे बचतगटांच्या बैठकांमध्ये व्हायचं. ग्रामसभेला त्या अजूनही येत नव्हत्या. मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना परोपरीने सांगायचे, तुमचे प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडा, नेत्यांना प्रश्न विचारा. वाटल्यास येऊन माझ्याशी जोरजोराने भांडा, मला प्रश्न विचारा, पण या," त्या म्हणतात.
यामुळेच कदाचित आता दहेगाव-वाघूळच्या महिलासभा आणि ग्रामसभेला सगळ्या महिला उपस्थित असतात.
'तुम्हाला नाही जमणार काम'
कविता यांच्यात पायात व्यंग असल्याच्या कारणावरून त्यांना अनेकदा कमी लेखण्याचे प्रयत्न झाले. ऑफिसमध्ये त्यांच्या अपरोक्ष परस्पर निर्णय घेतले जायचे आणि विचारलं की म्हणायचे, 'तुम्हाला जमलं नसतं, झेपलं नसतं म्हणून आम्ही हे केलं.'
काही प्रसंग कविता सांगतात, "मी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये सुरुवातीला जात नव्हते. तर तिथे अपप्रचार झाला की आमच्या सरपंच अपंग आहेत त्यामुळे त्यांना काही करता येत नाही. मी जायला लागले तेव्हा तिथले अधिकारी म्हणाले, अरे ताई, तुम्हाला येतं की सगळं. ग्रामपंचायतीच्या कामासाठी कधी बँकेत जायचं असलं की तिथल्या अधिकाऱ्यांना लोक सांगायचे की अपंग सरपंच असल्यामुळे त्या येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावतीने आम्हीच हे काम करतोय."
कामात अडथळे, चारित्र्यावर शिंतोडे
गेल्या 9 वर्षांपासून काम करत असल्या तरी कविता भोंडवे यांच्या समोरच्या सगळ्याच समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. आता त्यांना सरळपणे कोणी विरोध करत नसलं तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर आडून आडून टीका होतेच. 'आम्ही अपंग असूनही तुला पद दिलं' अशी उपकाराची भावनाही त्यांना पदोपदी जाणवते. "खुर्ची दिली म्हणून पाय नाही फुटले ना मला, मीही गावासाठी झोकून देऊन काम केलंय," त्या ठामपणे उत्तरतात.
कविता यांच्या लग्न न करण्याच्या निर्णयामुळेही त्यांना अनेकदा टोमणे ऐकावे लागतात. "बिनलग्नाची एकटी बाई दिसली रे दिसली की तिच्याविषयी चर्चा करणार, तिचं नाव कोणाशी जोडणार किंवा चारित्र्यावर शिंतोडे उडवणार हे प्रकार घडतातच. माझ्याही बाबतीत झाले. अनेक लोक म्हणायचे, तुला आईवडील किती दिवस पुरणार, मग तुला कोण सांभाळणार? तुम्ही काळजी करू नका. स्वतःला सांभाळायला मी सक्षम आहे," त्या ठणकावतात.
'बस्स, पुढे जात राहा'
प्रत्येकाची आयुष्यात काही स्वप्नं असतात तशी कविता भोंडवे यांची पण होती. पण पोलिओमुळे आलेलं अधूपण आणि नंतर घडलेल्या गोष्टी यामुळे ती स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाहीत. "माझी खूप इच्छा होती की आपला पण एक ऑफिसचा जॉब असावा. बँकेत किंवा सरकारी, मस्त खुर्चीवर बसून आपण खुर्चीवर बसून आपण काम करावं. पण ते घडलं नाही. आयुष्य संपलंय वाटेस्तोवर दुसरी खुर्ची नशीबात आली," त्या हसतात.
आता आपलं पद राहो किंवा जावो, राजकारणात सक्रिय असो किंवा नसो महिलांसाठी आयुष्यभर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
"माझं बायांना हेच सांगणं आहे की आयुष्यात सगळं मनासारखं घडतंच असं नाही. पण तुम्ही थांबू नका, बस्स पुढे जात राहा."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)