ज्योती देशमुख : पती, दीर आणि सासऱ्यानं आत्महत्या केल्यावर 29 एकर शेती कष्टानं कसणारी महिला

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

घरातल्या तीन पुरुषांनी आत्महत्या केल्यानंतर स्वत: शेतीची धुरा सांभाळणाऱ्या ज्योती देशमुख यांची ही गोष्ट...त्यांचा प्रवास

विदर्भातल्या अकोल्यापासून 25 किलोमीटर अंतरावरील कट्यार गाव. ज्योती संतोष देशमुख या गावात राहतात.

ज्योती देशमुख (55) यांच्या घराचं लोखंडी दार आणि आत बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा बघून माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आणि मग आमची चर्चा सुरू झाली.

घरात आणलेली नवीन वस्तू चोरीला जाते म्हणून मग मी घराला लोखंडी दार आणि आत सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचं ज्योती सांगतात.

ज्योती देशमुख आज स्वत: 29 एकर इतक्या क्षेत्रावरची शेती कसत आहेत. शेतीनं आयुष्यात खूप काही दिल्याचं त्या सांगतात.

"शेतीमुळे मी घराचं बांधकाम केलं. नवीन ट्रॅक्टर घेतला. शेतात बोअरवेल घेतला. त्याला चांगलं पाणी लागलं. मुलाला इंजीनियर केलं. सध्या तो पुण्यात एका कंपनीत नोकरी करत आहे," ज्योती ताई हे सांगत असतानाच त्यांच्या एका बाजूला त्यांचा आणि त्यांच्या पतीचा फोटो ठेवलेला दिसून आला.

या फोटोमुळे ज्योती ताईंच्या भुतकाळात डोकावून बघणं अपरिहार्य होतं.

शेतीनं खूप काही दिलं म्हणता, पण शेती करायचं कसं ठरवलं असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "माझ्या घरात तीन आत्महत्या झाल्या. सासरे, दीर आणि पतीनं आत्महत्या केली. आम्ही पूर्वी शेतात फक्त मूग घ्यायचो. पण, 2007मध्ये खूप पाऊस झाला आणि आमचा सगळा मूग झोपला. सगळं नुकसान झालं. त्या टेंशनमध्ये माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केली."

घरातील तीन पुरुषांच्या आत्महत्येनंतर ज्योती ताई पूर्णपणे एकट्या पडल्या. रोड टच जमीन असल्याकारणाने अनेकांनी त्यांना जमीन विकण्याचा सल्ला दिला.

"लोकांचं म्हणणं होतं की, बाईनं कुठे शेती करायची असते का, देशमुखांच्या घरातल्या बाईनं शेती करणं शोभतं का, शेती विकून अकोल्याला राहायला जा. पण, माझा मुलगा तेव्हा लहान होता. तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, आई आता शेती विकली की परत घेता येणार नाही. म्हणून मग मी शेती करायचा निर्णय घेतला."

ज्योती ताईंनी शेती करायचं मनाशी ठरवलं. पण, अनेक अडचणी त्यांच्यामोर आ वासून उभ्या होत्या.

"घरातली माणसं सोडून गेल्यामुळे गावात माझी इमेज जाणूनबुजून खराब करण्यात आली. लोक उतरून-पातरून बोलायला लागले. त्यांचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटायचं. मी खूप रडायचेसुद्धा. असं वाटायचं आपणही संपवून टाकावं स्वत :ला. पण, मग माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा यायचा आणि मी असा विचार करणं सोडून द्यायचे.

"दुसरं कुणी शेतात कामाला येत नव्हतं. शिवाय मला शेतीतला काहीच अनुभव नव्हता. मी कधीच शेती केली नव्हती. पण मालक गेल्यानंतर शेतात जायला लागले. स्वत:हून कामं करायला लागले. निंदणं, खुरपणं, बैलगाडी चालवणं सगळं स्वत:च शिकले. इतकंच काय ट्रॅक्टर घेतलं आणि तेही शिकले."

ट्रॅक्टर घेण्याचं कारण...

शेतीतल्या एका प्रसंगामुळे ज्योती ताईंनी ट्रॅक्टर घेतला. हा प्रसंग सांगताना त्यांचे डोळे अभिमानानं चमकतात.

"मला शेतात पेरणी करायची होती. सगळ्या गावाची पेरणी करून झाली, पण ट्रॅक्टरवाला काही माझ्या शेतात येत नव्हता. सकाळी 7 वाजता मी बियाणं आणून ठेवलं आणि तो रात्री आला. त्यानं रात्रभर पेरणी केली.

"ज्यावेळी पीक उगवलं त्यावेळी शेतात बऱ्याच ठिकाणी बियाणं पडलं नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मग मी ट्रॅक्टरवाल्याला म्हटलं की, तुम्ही असं कसं बी पेरलं? माझं किती नुकसान झालं? त्यावर तो ट्रॅक्टरवाला मला म्हणाला, तुला इतकंच वाटतं, तर स्वत: ट्रॅक्टर घे आणि पेरणी कर. त्यावेळी मी त्याला म्हटलं, पुढच्या पाच वर्षांत माझ्या घरी ट्रॅक्टर राहिल आणि बरोबर पाच वर्षांनी मी ट्रॅक्टर घेतलं."

पुढे ज्योतीताईंनी शेतात मूगाऐवजी सोयाबीन पेरायला सुरुवात केली. एकदा त्यांना सोयाबीनचं खूप उत्पन्न झालं, ते बघून मग गावातल्या सगळ्यांनीच सोयाबीन पेरायला सुरुवात केल्याचं त्या सांगतात.

कट्यार गाव खारपाण पट्ट्यात येतं. या गावातली संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मग ज्योती ताईंनी शेतात बोअरवेल घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याला चांगलं पाणी लागलं आहे.

त्यामुळे आता पाऊस नसला तरी पीक घेण्यासाठी लावलेला उत्पादन खर्च शेतीच्या उत्पन्नातून मिळतो, असं त्या सांगतात.

महिलेची शेती फायद्याची?

एक महिला किती काटकोरपणे शेती करते, याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात आवर्जून येतो.

"बाई खर्च कमी करते. कोणताही खर्च कमी असतो. बाहेरचा खर्च कमी असतो. माणसाला तंबाखू म्हणा कि पुडी म्हणा ही सवय असते. पण, बाईचं असं काही नसतं. जेवण केलं की काम इतकंच बाईचं असतं. कुणाला काही द्यायचं असलं की बाईचं मोजकंच असतं. की एवढं घे आणि लगेच मला माझं परत दे."

कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या मार्च ते मे 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीत 1,198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष न देता शेतीत कष्ट करून जीवन जगण्याचा सल्ला त्या देतात.

"लोकांनी मला टोमणे दिले, पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष दिलं. माझ्या शेताकडे लक्ष दिलं. आपण जर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असाल, तर घरात बसलं तरी लोक टोमणे देतात आणि नाही बसलं तरी टोमणे देतात. कसंही जगलं तरी लोक टोमणे देतात. दुसऱ्याचे टोमणे ऐकण्य़ापेक्षा स्वत: कष्ट करून जगण्यात काय हरकत आहे?"

यंदा ज्योती ताईंच्या शेतात सोयाबीन, कापूस, तर, उदीड या पिकांची पेरणी केली आहे.

आमच्याशी बोलून झाल्यानंतर ज्योती ताईंनी एका हातात पाण्याची बाटली घेतली आणि दुसऱ्या हातात एक कपडा घेऊन त्या घराबाहेर पडल्या.

शेजारच्या गल्लीत उभं केलेल्या ट्रॅक्टरकडे त्या गेल्या, एका बाजूला बाटली लटकवली आणि कपड्यानं ट्रॅक्टरवरच्या नावावरची धूळ मोठ्या प्रेमानं साफ करू लागल्या.

त्यांच्या ट्रॅक्टरवर नाव आहे...."ज्योतीताई संतोष देशमुख."

यानंतर त्यांनी ट्रॅक्टरला च्याबी लावली आणि शेताकडे निघून गेल्या...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)