You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोयाबीन : सोयापेंड आयात रोखा, अमोल कोल्हेंची मागणी - #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सोयापेंड आयात रोखण्याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घट होत आहे. दिवाळीनंतर तब्बल दीड हजार रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. शिवाय ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
मात्र, दोन दिवसांपासून 400 रुपयांनी सोयाबीनचे दर घसरलेले आहेत.
यातच पुन्हा सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर आल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण सोयापेंड आयातीची मुदत वाढवून मार्च 2022 करावी अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी विदेशी आयात महासंचालकांकडे केली आहे.
त्यामुळे सोयाबीनच्या दरात अणखीन घट होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण राहावं म्हणून सोयापेंडची आयात करण्यात आली होती. तब्बल 12 लाख टन सोयापेंड आयात केली जाणार होती. पहिल्या टप्प्यात 6 लाख 50 हजार टन सोयापेंड आयात करण्यात आली होती. आता उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंड आयातीच्या हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदाप प्रतावराव जाधव यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
लोकसभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "ऑल इंडिया पोल्ट्री असोसिएशनच्या दबावाला बळी पडून सरकार आता केंद्र सरकार उर्वरित साडे पाच लाख टन सोयापेंड आयात करण्याचा विचार करतंय. हा निर्णय सोयाबीन उत्पादकांच्या ताटात माती कालवणारा आहे, त्यामुळे माझी मंत्रालयाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार व्हावा."
तर, यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. दर वाढले तरी फक्त शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चच निघत आहे. अशा स्थितीत सोयापेंड आयातीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचं नुकसान करु नका, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी पत्राद्वारे पंतप्रधान, वाणिज्य मंत्री आणि कृषिमंत्र्यांना केली आहे.
2. देशातली सर्वांत शक्तिशाली महिला- कंगनानं स्वत:लाच दिली उपाधी
कंगना राणावतनं स्वत:लाच देशातली सर्वांत शक्तिशाली महिला म्हणवून घेतलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रोफाईल स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात तिच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. यासाठी एएनआयनं दिलेल्या एका वृत्ताचं ट्वीट देखील कंगनानं स्टोरीमध्ये दिलं आहे.
या ट्वीटमध्ये "देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंगना राणावच्या आगामी सर्व सोशल मीडिया पोस्ट सेन्सॉर करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे", असं म्हटलं आहे.
कंगनानं या ट्वीटचा फोटो तिची इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट करत वर "देशातली सर्वांत शक्तिशाली महिला" असा मेसेज लिहिला आहे. यापुढे एक मुकुटाचा इमोजी देखील तिने टाकला आहे.
3. भाजपने लावलेल्या सवयीमुळेच सरकार अडचणीत - नितीन राऊत
राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून पूर्णपणे खंडित केला जात आहे. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली आहेत. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
राऊत म्हणाले, ''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत आलं आहे. वीजबिल प्रत्येकाला भरावंच लागणार आहे. वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते.
''विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागतं, त्यासाठी बँकेला व्याज द्यावं लागतं. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे?"
4. व्हॉट्सअॅपकडून 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचं खातं निलंबीत
व्हॉट्सअॅपने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांचं खातं निलंबित केलं आहे. मेसेजिंग सेवा अॅपने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
आपल्या रिपोर्टमध्ये कंपनी म्हणाली की, आम्ही 20 लाख 69 हजार भारतीयांचं खातं निलंबित केलं आहे.
या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, भारतीय खात्याची ओळख +91 या क्रमांकाने होती. व्हॉट्सअॅप 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेज' मेसेजिंग सेवामध्ये चूकीची भाषा वापरण्यास बंधन घालण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
5. अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असताना बुधवारी (1 डिसेंबर) सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी पावसाळी वातावरण होतं. त्यामुळे द्राक्ष, भात, भाजीपाला, आंबा आणि फळ पिकांच्या बहारावर परिणाम होणार असल्याचं कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)